अन्य मातीत फुलण्याची स्वप्ने पाहणारा आधी आपल्या मातीत रुजलेला असावा लागतो. हिंदी चित्रपटसृष्टीत लताबाई व अनेक मराठी भाषकांची मुळे अशी रुजली होती..

अपघातात झालेल्या जखमा बऱ्या व्हायच्या आत विषमज्वराने गाठल्यास त्या व्यक्तीचे जे होईल ते लताबाईंच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर तेलुगू चित्रपटसृष्टीने ‘बॉलीवूड’ मागे टाकल्याच्या वृत्ताने मराठी समाजाचे होईल. गेल्या दोन वर्षांत एकंदर भारतीय चित्रपटांच्या गल्ल्यामधील २९ टक्के वाटा तेलुगू चित्रपटांचा होता, तर बॉलीवूड नावाने ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट उद्योगांची कमाई २७ टक्के इतकीच राहिली. ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ या दैनिकात प्रकाशित अभ्यासपूर्ण तपशिलानुसार तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या चार दक्षिणी भाषांची व्यवसायवृद्धी गेल्या दोन वर्षांत ३६ टक्क्यांवरून ५९ टक्क्यांवर गेली तर त्या तुलनेत हिंदीचा व्यवसाय ४४ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर घसरला. मराठीजनांनी या तपशिलाकडे लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पाहिल्यास एक सुन्न करणारा प्रश्न आ वासून समोर ठाकतो. तो आहे बॉलीवूडमध्ये कमालीच्या वेगाने घसरत गेलेल्या मराठी टक्क्याचा. तेलुगू वा मल्याळम चित्रपटास जे जमले ते मराठीस कधी जमणार? आज हिंदीच्या कथित मोठेपणास हे दक्षिणी चित्रपट हिंग लावून विचारत नाहीत आणि तरीही देशातील आणि परदेशातील समस्त चित्रपटप्रेमी हे चित्रपट पाहातात. आणि त्याच वेळी मराठी कलाकार मात्र हिंदीचे भ्रष्ट अनुकरण करीत चोप्रा/जोहर वा तत्समांच्या निमंत्रणाकडे डोळे लावून असतात, हे कसे? आणि का? मातीतील संस्कृतीत खोलवर रुजलेल्या लता मंगेशकर यांच्या निधनानंतर तर बॉलीवूडमधील ही मराठी पोकळी खायला उठेल इतकी भयाण भासते. विशेषत: ज्या उद्योगाची स्थापना मराठी माणसाने केली आणि ज्याच्या नावाने या क्षेत्रातील गौरवाचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार केंद्र सरकार देते त्या उद्योगात आज मराठी माणूस नावापुरताच उरलेला दिसतो. लताबाईंच्या निधनाने या विषयास भिडण्याची तातडी निर्माण झाली आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

 अत्यंत आशयसंपन्न चित्रपट देणारी ‘प्रभात’, व्ही. शांताराम, संगीतकार रामचंद्र चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र, वसंत देसाई, विजय तेंडुलकर, स्मिता पाटील, सुलोचना, त्यांच्यानंतर बॉलीवूडच्या ‘आई’ची जबाबदारी काही काळ पार पाडणाऱ्या रिमा लागू, स्वत:चे वेगळेच घराणे तयार करणाऱ्या सई परांजपे, श्रीराम लागू, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, अभिनय आणि चित्रपटनिर्मितीच्या वेगळय़ा वाटा चोखाळणारे अमोल पालेकर, अलीकडचे स्वानंद किरकिरे, आशुतोष गोवारीकर, अतुल कुलकर्णी, एकदाच चमकून गायब झालेल्या स्नेहा खानविलकर वा अजय-अतुल, नव्या दमाचे आश्वासक चैतन्य ताम्हाणे ही काही मोजकी प्रातिनिधिक मराठी नावे. आणि या सर्वावर डोंगराएवढय़ा लता मंगेशकर. मराठी लेखक, संगीतकार, निर्माता दिग्दर्शक, काही उत्कृष्ट अभिनेते यांचा या चित्रपटसृष्टीत एके काळी दरारा होता. आता त्या दराऱ्याचा अंश नाना पाटेकर यांच्यापुरता तेव्हढा उरलेला दिसतो. त्यात नाना पाटेकर यांच्या अभिनयाइतकाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही मोठा वाटा आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. ‘‘मी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही ज्येष्ठ आहे,’’ असा दावा करणारे मराठी कलाकार असतील. पण त्यातून फक्त त्यांचा बावळटपणा दिसतो. ज्येष्ठ ते असतीलही. पण पुढे? हिंदी उच्चारणात अजूनही अडखळणाऱ्या शर्मिला टागोर या हिंदी चित्रसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करतात. हे मराठी अभिनेत्रींस का जमत नसेल? बंगाल काय पण त्रिपुरासारख्या राज्यातील लोकसंगीतास सचिनदेव बर्मन देशभर लोकप्रिय करू शकतात, पण मराठी संगीताचे असे का होऊ शकत नाही? या प्रश्नांस भिडण्याचे आणि प्रामाणिक उत्तर शोधण्याचे प्रयत्न मराठी चित्रविश्वात होणार का?

तसे झाल्यास त्रिशंकू अवस्थेत लोंबकळणारी मराठी चित्रसृष्टी डोळय़ांस दिसेल. त्या काळी वर उल्लेखलेल्या व्यक्तिमत्त्वांस हिंदी चित्रपटसृष्टीत कमालीचा मान होता. कारण या सर्वच्या सर्व कलावंतांची मुळे आपल्या मातीतील संस्कृतीत घट्ट रुजलेली होती. मग ते शांताराम वणकुद्रे असोत की रामचंद्र चितळकर. आता खरी समस्या आहे ती ही. धड एका संस्कृतीचे ममत्व नाही आणि दुसऱ्याच्या मागे पळायचे, हे वास्तव. उच्चभ्रू होण्याच्या अट्टहासाने इंग्रजी माध्यमात शिक्षण. बरे तेथेही काही शेली- कीट्स-शेक्सपिअर वगैरे वाचत असतील असे म्हणावे तर यातील बऱ्याच जणांची मजल हॅरी पॉटरपलीकडे जात नाही. म्हणजे इंग्रजी शिकून घेतले काय? तर फक्त चटपटीत बोलण्याच्या लकबी. मॅनेरिझम्स. पण भाषेत मांडण्यासारखे मुदलात डोक्यातच काही नसल्याने इंग्रजीत बोलणार काय? त्यात मधल्या मध्ये झालेली मराठी भाषेची बोंब. ‘हे अवॉर्ड अ‍ॅक्सेप्ट करताना एकदम प्राऊड फील येतो’ ही यांची अतिभिकार भाषिक अभिव्यक्ती. त्यातील काही दोनपाच गायक/ गायिका चित्रपटात गाणी मिळाली की जुन्या चित्रपटगीतांच्या चॅनेलीय ऑर्केस्ट्रात जुनीच गाणी गात ‘लताबाईंचा माझ्यावर कसा लोभ होता’, वगैरे प्रतिक्रिया देण्यास रिकामे. लोभ असेलही. पण त्याचे आपण पुढे केले काय, हा प्रश्न यांस कधी पडणार नाही आणि मनोरंजनी माध्यमे तो कधी विचारणार नाहीत. एकमेकांच्या महानतेचे गोडवे एकमेकांच्या व्यासपीठावर गाण्याचा छछोरपणा करणारे हे पाहिले की पूर्वसुरींच्या उत्तुंगतेने डोळे दिपतात. आणि मग एमिल झोला ते रवींद्रनाथ टागोरकर, चिं. त्र्यं. खानोलकर, विंदा, गदिमा, नामदेव ढसाळ अशा अनेक प्रतिभावंतांनी सिद्ध केलेले एक सत्य लक्षात येते.

अन्य मातीत फुलण्याची स्वप्ने पाहणारा वृक्ष आधी आपल्या मातीत रुजलेला असावा लागतो. स्वत:च्या मातीतसुद्धा ज्याची मुळे नाहीत असा वृक्ष अन्यत्र वाढेलही कदाचित. पण तो फळणे/फुलणे अवघड. अशांची अवस्था ना इकडचे ना तिकडचे अशीच होते बहुधा. मराठी चित्रसृष्टीचे हे असे झाले आहे. मराठी माती, संस्कृतीत हे कधी रुजले नाहीत. स्वत:च्या संस्कृतीपासून अस्पर्शच राहिलेले हे मग जागतिक, ते नाही जमल्यास गेलाबाजार किमान हिंदीत तरी काही मिळावे या आशेवर राहतात. तसे काही मिळालेच तर तो तुकडा प्राणपणाने सांभाळत मिरवू पाहतात. आणि यातले काहीच नाही मिळाले तर मराठीपणा, मराठी बाणा वगैरे मिरवत गळय़ातील झोळय़ांतून आपल्याच कलाकृती वाटत फिरतात. आणि शेवटी मराठी माणसावरील अन्यायाचे रडगाणे आहेच! लताबाई आणि वर उल्लेखलेले आणि तसे काही अशांवर असे रडगाणे गाण्याची कधी वेळ आली नाही. हिंदी चित्रपटगीतांत लोकप्रिय होत असतानाही त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शुद्ध मराठी पद्ये वा ना. धों. महानोर आदींची तितकीच शुद्ध ग्रामीण गीते गाण्याचे प्रयोग करावे असे वाटले. चंद्रकांत काळे/ माधुरी पुरंदरे, अशोक रानडे आदींचे सन्माननीय अपवाद वगळता अन्य बरेच ‘मंतरलेल्या चैत्रबना’तच रममाण. अशा परिस्थितीत लताबाई आणि वरीलांस राष्ट्रीय स्तरावर इतके स्थान मिळाले ते एकाच कारणाने. ते म्हणजे त्यांच्याकडील स्वत:चे सांस्कृतिक संचित. वास्तवात जागतिक वा राष्ट्रीय असे काही नसते. प्रश्न असतो तो मजकुराचा म्हणजे ‘कंटेन्ट’ या घटकाचा. मोठेपण मोजले जाते ते या मजकुरामुळे. शिवाजी पार्कावरील अंत्यसंस्कार अथवा दुखवटय़ाची सुट्टी यामुळे नव्हे. ‘पाथेर पांचाली’, ‘मेघे ढाका तारा’ , ‘शंकराभरणम्’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘सिंहासन’ वा आताचा ‘पुष्पा’ हे सारे राष्ट्रव्यापी(?) भाषेतील नाही. पण तरीही ते राष्ट्रीयच काय पण आंतरराष्ट्रीयही झाले. तेव्हा यातून काही शिकायचे असेल तर मराठी कलासृष्टीने आत्मपरीक्षण करावे. अन्यथा मराठीचे दु:ख हे तीन दिवसांच्या दुखवटय़ानंतरही कायम राहील.