भारतीयता ही वैविध्यानेच सिद्ध होते, असा आपल्या संगीताचा सांगावा आहे.. मग अमुकच प्रकारचे संगीत विमानांत वाजवण्याच्या मागणीस अर्थ काय?

पंजाबी ठेक्याचे, उडत्या चालीचे एखादे गाणे सुरू आहे. सारेजण खुर्च्याभोवती धावताहेत. मध्येच गाणे थांबवले जाते. जवळच्या खुर्चीत बसण्याच्या स्पर्धेतून एकेकजण बाद होत राहतात. समाजमाध्यमे, इव्हेन्ट मॅनेजमेंट वगैरे काही नव्हते, तेव्हा हा खेळ फार लोकप्रिय असे. निमित्त कोजागिरी पौर्णिमेचे असो की २६ जानेवारीचे किंवा अगदी नववर्ष स्वागताचे; हा खेळ कुठे ना कुठे चाललेला दिसे. कालौघात या खेळातील गाणी बदलली. पंजाबी ठेक्यातली ओपी नय्यर वगैरेंची गाणी जाऊन डिस्को गाणी याच खेळासाठी वाजू लागली. हल्ली तर हा खेळच अस्तमान ठरला. पण संगीत ऐकण्याची आवड असलेल्यांचा या खेळाबद्दलचा एक प्रश्न कायम राहिला. तो असा की, खुर्ची पकडण्याच्या या स्पर्धेदरम्यान वाजवले जाणारे संगीत कोणी ऐकते का? कोणत्या गाण्याच्या वेळी आपण जिंकलो, हे जिंकणाऱ्यांना तरी आठवते का? संगीत केवळ नावापुरतेच, कधीही गचकन थांबवण्यासाठी काहीतरी हवे म्हणून? .. साधारण हे असेच प्रश्न, विमानतळावर किंवा विमानात वाजवल्या जाणाऱ्या संगीताबद्दलही पडणे स्वाभाविक. ते संगीत कितीही मंजूळ असले, तरी मध्येमध्ये उद्घोषणा होत राहतात. कधी इतक्या की, दोन उद्घोषणांच्या मधली जागा भरण्यासाठी संगीताचा वापर सुरू आहे की काय, असे वाटू लागते. या संगीताकडे थेट नागरी हवाई वाहतूकमंत्र्यांचे लक्ष ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ अर्थात आयसीसीआर या केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेने गेल्या आठवडय़ात वेधले. देशभरातील विमानतळ तसेच सर्व भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये भारतीय संगीत वाजवले जावे, ही मागणी संगीतक्षेत्रातील काही कलाकारांच्या उपस्थितीत या संस्थेमार्फत करण्यात आली, तीस मंत्र्यांची अनुकूलता दिसल्याचे पडसाद आठवडाभर उमटत राहिले. एवढे काय आहे त्यात?

मुळात ही मागणी आताच का करावी लागली, हेही लक्षात घ्यावे लागेल. आजवर कधी भारतीय संगीत विमाने वा विमानतळांवर वाजतच नव्हते, असे काही नाही. रविशंकरांची सतार, शिवकुमार शर्माचे संतूर किंवा हरिप्रसाद चौरसियांची बासरी, या ‘शिव हरीं’सह ब्रिजभूषण काबरांनी गिटारवर हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीताचे सूर छेडलेली १९७२ सालापासूनची सदाबहार ‘कॉल ऑफ द व्हॅली’.. असे संगीत वाजतच होते. अनेक तरुण गायकवादकांनीही मैफलींच्या दौऱ्यांसाठी भारतात वा परदेशी विमानप्रवास करताना हे संगीत भारतीय विमानतळांवर ऐकलेच असणार! पण हल्ली करोनाकाळात दौरेच कमी झाले, लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी शब्दश: ‘दुरावली’ आणि अर्थकारणावरही परिणाम झाला, अशा काळात ही मागणी होणे, ती आयसीसीआरमार्फत करणाऱ्या आठ कलावंतांपैकी एकटे अनु मलिक हे साठीच्या पुढले, इतरांपेक्षा व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी आणि उर्वरित ८७.५ टक्के कलावंत वयाने ५५च्या आतबाहेरचे  – ज्याला ‘मिड करिअर’ म्हणतात असे कारकीर्दीच्या मध्यावरले – असणे, हेही लक्षात घेतले पाहिजे.  कलावंतांनी कितीही नाकारले, तरी विमानतळांवर किंवा भारतात नोंदणी झालेल्या सर्व खासगी विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये अमुकच प्रकारचे संगीत वाजवण्याच्या मागणीला अर्थकारणाची किनार नक्कीच आहे. या कलावंतांनी किंवा त्यांच्या वतीने आयसीसीआर या संस्थेने याच आठजणांचे संगीत वाजवा अशी मागणी अजिबात केलेली नाही. किंबहुना, मंत्र्यांकडे आम्ही केली ती औपचारिक मागणी नव्हतीच, ती तर फक्त अनौपचारिक विनंती होती, असेही म्हणण्याची सोय ती मागणीवजा विनंती करणाऱ्यांना आहेच. पण ही जी काही विनंती होती ती इतकी विसविशीत कशी काय असा पुढला प्रश्न उपस्थित झाला आणि त्याची चर्चा अधिक झाली.

‘भारतीय संगीत वाजवा’ ही विनंती  केली आणि मंत्र्यांनी तात्काळ तिचा स्वीकारही केला, पण ‘भारतीय संगीत’ म्हणजे काय हे खासगी विमान कंपन्यांनी कसे ठरवायचे, हा तो पुढला प्रश्न. बॉलीवूड अथवा हिंदूी सिनेसंगीताला एकवेळ बाद करू. पण हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच कर्नाटक संगीत, गझलसारखे उपशास्त्रीय मानले जाणारे प्रकार, प्रांतोप्रांतीचे लोकसंगीत हे सारे भारतीयच संगीत नव्हे काय? गोव्याचे गायक रेमो र्फनडिस हे गेली तीन दशके भारतीय अनुभव साकारणारी इंग्रजी गाणी सादर करीत आहेत. त्यांना देशात, देशाबाहेर रसिकमान्यताही आहे. पण त्यांच्या संगीताचा बाज पाश्चात्त्य आहे! अभिजीत पोहनकर, त्रिलोक गुर्टू, शिवमणी असे अनेक कलावंत भारतीय संगीताचा विश्वसंगीताशी मेळ घालत आहेत. ते फ्यूजनसंगीतही यातून बाद होणार असेल तर मग उदाहरणार्थ पूर्बायन चटर्जी हे सतारवादनाची हिन्दुस्तानी शास्त्रीय तालीम घेतलेले, पण सतारीवर ते मोझार्ट वा बीथोवनची धूनही लीलया वाजवतात आणि लयीच्या अभिजाततेची पाश्चात्त्य व भारतीय जाणीव यांत फरक नसतो असेही सिद्धच करतात, त्यांनाही दूर लोटायचे का? माळव्याच्या लोकधुना गाणारे कुमार गंधर्व स्वीकारायचे; पण राजस्थानच्या लांगा-मंगनियारांचे संगीत नाकारायचे का? पंजाबच्या हीर-गायकीने रावीनदीच्या तीरावरच अडकून राहायचे का? कर्नाटक संगीत फक्त हंसध्वनीसारख्या रागांपुरतेच स्वीकारायचे का? कर्नाटक संगीताचे एमएस सुब्बलक्ष्मी वा बालमुरलीकृष्णा हे दिवंगत दिग्गज केवळ स्तोत्रांपुरतेच नव्हते, त्यांनी गायलेल्या त्यागराजांच्या ‘कृती’ही का नाही ऐकायच्या ? बरे, या ‘कृती’च ऐकायच्या असतील तर त्यांच्या नंतरच्या पिढीतल्या अरुणा साईराम, त्याहीनंतरच्या सुधा रेघुनाथन यांना दूर का म्हणून ठेवायचे? टी. एम. कृष्णा हे तुकारामांपासून त्यागराजांपर्यंत अनेकांच्या कृती गातात, संगीताच्या कथित संकेतांचे राजकारण मोडण्याचा प्रयत्न यशस्वीपणे करतात. पण त्यांची राजकीय मते केंद्रातील सत्ताधाऱ्यांना धार्जिणी नाहीत, म्हणून मध्यंतरी दिल्लीत त्यांच्या कार्यक्रमाला जागाच मिळू न देण्याचा प्रकार झाला होता.  यापुढे बहुधा, त्यांच्या सुरांना विमानतळांवरून वा विमानांतून हद्दपार ठरवण्याची खरी कारणे लोकांना कळणारच नाहीत की काय? हे आणि असे अनेक प्रश्न, ‘भारतीय संगीत’ या एका शब्दप्रयोगाच्या अनुषंगाने उपस्थित होतात. कदाचित, केवळ वाद्यसंगीतच वाजवायचे असा उपाय यावर काढलाही जाईल. पण तिथेही परत विश्वमोहन भट्टांची मोहनवीणा, सुलतान खानांची सारंगी ऐकता येणार का, यासारखा प्रश्न येणारच. भारतीयता ही वैविध्यानेच सिद्ध होते, असा आपल्या संगीताचा सांगावा आहे. काय खायचे, काय ऐकायचे, काय गायचे , कुणाला भजायचे याच्या परंपरा निरनिराळय़ा असणारच हे जणू या भूमीने गृहीतच धरले. तरीसुद्धा ही अशी मागणीवजा विनंती हवाई वाहतूकमंत्र्यांकडे केली जाते याचे आयसीसीआरच्या प्रसिद्धीपत्रात नोंदवलेले एक कारण तर अधिकच शोचनीय. ते असे की, ‘‘भारतीय संगीताची लोकप्रियता जगभर वाढत असली तरी आपलेच लोक, त्यातही  विशेषत: समाजातील उच्च स्तरीय लोक, या संगीतापासून दुरावताहेत’’ .. संगीताला धनाचा आश्रय हे कथित उच्च थरातले लोक देत असतील, पण संगीत केवळ त्यांच्यामुळे नव्हे तर सामान्यजनांमुळे टिकते आणि बहरत राहते. अर्थात, म्हणून लगेच कोणी मुंबईच्या लोकलगाडय़ांत किंवा एकंदर भारतीय रेल्वेत ‘भारतीय संगीताला प्रोत्साहन द्या’ अशी मागणी करायला जाऊ नये हे बरे. असल्या मागण्या संगीतखुर्चीच्या खेळासारख्या ठरतील; जिथे संगीताचा निखळ आनंद चाखण्याऐवजी खुर्ची वा उद्दिष्ट गाठणे महत्त्वाचे मानले जाते.