मराठीचे दुर्दैव हे की अनेक विषयशाखांतील मराठी तज्ज्ञांनी मराठीत लिखाण करणे टाळले. ते त्यांच्या अभिजनत्व मिरवण्याच्या आड येत असावे.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने जयंत नारळीकर यांच्या भाषणाचे महत्त्व अधोरेखित करण्यापूर्वी एक खुलासा. जयंत नारळीकर यांच्या विशुद्ध विज्ञानवादाचा, त्यांच्या सात्त्विक नैतिक मूल्यांचा आणि त्या मूल्यांस प्रत्यक्ष जीवनात सहजपणे उतरवण्याच्या कौशल्याचा एक निस्सीम चाहता असूनही साहित्य संमेलनाचे आयोजक या नात्याने कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलेल्या मतांशी असहमत होणे अवघड. मराठी साहित्य संमेलनात कधी नव्हे  इतक्या उच्च दर्जाचा विज्ञानाचा पाईक सहभागी होत असताना वैज्ञानिक तो ‘दिसतो कसा आननी’ हे जाणण्याची उत्सुकता दूरवरच्या मराठी रसिकांस असणे साहजिक. परत जयंतराव अन्य संमेलनाध्यक्षांप्रमाणे गावगन्ना भाषणे झोडणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांचे सार्वजनिक दर्शन (सुदैवाने) तसे दुर्मीळ. त्यामुळे या संमेलनास त्यांनी सदेह उपस्थित राहणे हे ते जी मराठी भाषेची समृद्धता अपेक्षितात त्यासाठी तरी आवश्यक होते. तसे न झाल्याने आयोजकांचा आणि त्याहीपेक्षा लक्षावधी मराठी रसिकांचा जो हिरमोड झाला असेल तो कमी महत्त्वाचा नाही. प्रकृतिअस्वास्थ्य लक्षात घेऊनही त्यांनी या संमेलनाच्या उद्घाटनास तरी हजेरी लावणे हे अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर दुणावणारे ठरले असते. ही बाब नम्रपणे नोंदवल्यानंतर आता त्यांनी मांडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ांविषयी.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
NCPCR bans sale of Horlicks Boost Bornvita Complan as health drinks
‘आरोग्यदायी’ लेबल लावून विकता येणार नाहीत चवदार पेये?

जयंतरावांचे भाषण आटोपशीर आहे. शंभर-सव्वाशे पानांचे ज्ञानामृत पाजणारे अध्यक्ष मराठी जनांनी पचवलेले असल्याने त्यांचे हे नेमके भाषण पाहता विज्ञानविषयक दृष्टिकोन अंगी बाणलेली व्यक्ती कशी सुलभपणे मुद्दय़ांस हात घालते हे लक्षात येते. सांस्कृतिक जीवनातील आपला अनावर  अघळपघळपणा लक्षात घेतल्यास याचे महत्त्व जाणवेल. विज्ञान, त्याआधारे होणारे ललित लेखन, या नव्या शाखेची कसलीही जाण नसणारे प्राध्यापकी कुंठित समीक्षण विश्व, अलीकडे भयावह गतीने प्रसरण पावणारे छद्मविज्ञान आणि त्याहीपेक्षा या निर्बुद्धतेचा स्वीकार करणारे सुशिक्षित अशा अनेक मुद्दय़ांस ते स्पर्श करते. महाराष्ट्र संस्कृतीस गणिती केरोनाना छत्रे, शंकर आबाजी थत्ते, विमानोड्डाणाचे स्वप्न सत्यात आणू पाहणारे शिवाकर बापूजी तळपदे, लोकमान्य टिळक, खुद्द नारळीकरांचे वडील, त्यांचे मामा, विद्यमान विख्यात गणिती नरेंद्र करमरकर (ही नावे केवळ वानगीदाखल. अशी अनेक आहेत. स्थलाअभावी त्या सर्वाचा उल्लेख अशक्य) अशी समृद्ध परंपरा असली तरी विज्ञानाचे हे मूळ या समाजात रुजले नाही हे खरेच. लोकमान्यांच्या वैदिक गणितापेक्षाही त्यांच्या ‘गीतारहस्या’चीच चर्चा अधिक हे त्याचे उदाहरण. हे असे का झाले असावे याचे उत्तर नारळीकरांच्या भाषणात आढळते. ‘साहित्याचे विषय काहीही असो. ते लिहिणारा परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही,’ असे जयंतराव म्हणतात. पण मराठीचे दुर्दैव हे की अनेक विषयशाखांतील मराठी तज्ज्ञांनी मराठीत लिखाण करणे टाळले. ते त्यांच्या अभिजनत्व मिरवण्याच्या आड येत असावे. अर्थशास्त्राचे नोबेल मिळवणारे अमर्त्य सेन आयुष्याच्या या टप्प्यावरही ‘मी मनातल्या मनातली आकडेमोड बंगालीतच करतो,’ असे सांगतात/लिहितात. तरीही त्याने त्यांच्या आंतरराष्ट्रीयत्वास काहीही बाधा येत नाही. प्रत्यक्षात मराठीची स्थिती काय? नोबेल वगैरे सोडा. पण आज इंग्रजी वाहिन्यांवर अर्थविश्लेषण करणाऱ्या अनेक नामांकित मराठीजनांस त्यांच्या मातृभाषेतून चार ओळी लिहिता येत नाहीत. ‘माय मरो अन् मावशी जगो’ असे मानणाऱ्या या अभिजनांकडून मराठीचे होणारे नुकसान हे अपरिमित आहे. त्यामुळेच नारळीकर म्हणतात त्याप्रमाणे मराठी असमृद्ध राहते. तथापि जयंतराव मोठे ठरतात ते या सर्वास ते अपवाद आहेत म्हणून.

तेव्हा हे सत्य लक्षात घेतल्यानंतर विज्ञान साहित्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आदींवर त्यांनी या भाषणात मांडलेल्या मुद्दय़ांमागील पोटतिडीक जाणवते. ‘तुम्ही फलज्योतिषास विज्ञान मानत नाही कारण तुमची वृत्ती पूर्वग्रहदूषित आहे,’ असे सुनावणाऱ्यांमुळे नारळीकरांना ‘हसावे की रडावे’ हा प्रश्न पडतो. प्रत्यक्षात त्यांची वेदना त्यापेक्षाही अधिक असेल. ‘बुडती हे जन, देखवेना डोळा’ या संत तुकारामांच्या शब्दांतून ती अधिक व्यक्त होईल. ती पाहिल्यावर जयंतराव सद्य:स्थितीत समाजापासून दूर आहेत तेच बरे, असे म्हणावे लागेल. जयंतराव, तुम्ही फलज्योतिष काय घेऊन बसलात.. आजचा मराठी माणूस गणेशास दूध पाजण्यापासून गर्भसंस्कार, कोणा बाबा- बापू- महाराजांचा प्रकट दिन वगैरेपर्यंत जाऊन पोहोचला आहे! तुम्ही म्हणता पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे वगैरेतून त्या लेखकांची कल्पनाशक्ती दिसते ते खरेच. आपल्या पूर्वजांनी खरोखरच पुष्पक विमान हवेत उडवले हे खरे असेल तर ते एकमेवच कसे? आणखी दोन-चार विमाने बनवून अन्य अनेकांनाही हा उड्डाणानुभव द्यावा असे का वाटले नाही, हा साधा तर्काधिष्ठित प्रश्नही आजच्या मराठी माणसास पडत नाही. तेव्हा ‘जर पुरातन समाज वैज्ञानिकदृष्टय़ा अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब त्या साहित्यात सापडायला हवे’ हे तुमचे निरीक्षण सांप्रती कसे लक्षात घेतले जाणार? हाच निकष तुम्ही ऐतिहासिक कादंबऱ्या आणि त्यातील इतिहास यांसही लावू इच्छिता ही आशावादाची हद्दच ठरावी. इंग्रजी साहित्यात ‘पॉप्युलर हिस्टरी’ असा एक प्रकार आहे. शुद्ध इतिहास हा सामान्य वाचकांस कंटाळवाणा वाटू शकतो. म्हणून विज्ञानात केले जाते त्या कथागुंफणाप्रमाणेच इतिहासही सादर केला जातो. म्हटल्यास हे साहित्य ललित. पण म्हणून त्याने इतिहासापासून फारकत घेतलेली नसते. मराठीत धड इतिहासही नाही आणि कादंबरी तर नाहीच नाही असे ‘साहित्य’(?) प्रसवणारे अनेक लेखकराव केवळ माध्यमांतील पुरवणी संपादक, प्रकाशकविश्व यांस उपकृत करून साहित्यिकांच्या कळपात बेमालूम घुसलेले दिसतात त्यांचे काय करायचे हा प्रश्न जयंतराव, तुम्हास पडत नाही हे तुमच्या आदरणीय अलिप्तपणाचे निदर्शक. तेव्हा लोकप्रिय विज्ञान साहित्यात विज्ञान दुय्यम आणि कल्पनारम्यता अधिक असेल तर ते लिखाण निकृष्ट हा तुमचा विज्ञान साहित्याचा निकष ऐतिहासिक म्हणवून खपवल्या जाणाऱ्या लिखाणासही लावला जावा हे मत कितीही योग्य असले तरी ते प्रत्यक्षात येणे अंमळ अवघडच.

दुसरा मुद्दा जयंतराव, तुम्ही इंग्रजी शब्दांच्या वापराविषयी उपस्थित करता. तो अत्यंत रास्त. आपल्याकडे अनेकांचे मराठीप्रेम हे इंग्रजीविषयीच्या अपंगत्वातून आलेले आहे हे कटू सत्य आधी लक्षात घ्यायला हवे. अशा अपंगत्वाचा स्पर्शही न झालेले आपल्यासारखे काही थोडे मान्यवर चांगल्या, रसाळ मराठीत संवाद साधू शकतात. अन्यांचे मात्र हे अपंगत्व लपवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात मराठी उघडे पडते आणि त्यांना इंग्रजीचे पांघरूण मिळत नाही. अशी भीती नसलेली इंग्रजी भाषा योगा, गुरू असे अनेक अन्यभाषी शब्द आपलेसे करते आणि आपले कथित शुद्ध मराठीवादी आपल्याला इंग्रजीही कसे चांगले येते याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. तेव्हा मराठीत विज्ञान लिखाण करणे सोडाच, पण सुमधुर मराठी गाण्यांवर भाष्य करणाऱ्या अनेकांस गाण्यातील ‘फीलिंग्ज’ आणि त्यातील ‘मेलडी’ कशी हृदयाला ‘टच’ करते हे अशा मराठीत सांगावे लागते, तेव्हा काय बोलणार? म्हणून तुमच्या कथांतील पात्रे खूपदा इंग्रजीचा वापर करतात याबाबत तुम्ही अजिबात वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कथेच्या ओघात झालेले देहदर्शन ज्याप्रमाणे अश्लील वाटत नाही, त्याप्रमाणे वातावरणाशी सुसंगत परभाषाप्रयोग हा अजिबात भाषिक अपमान नसतो. मात्र त्यासाठी विचारात आणि मांडणीत पुरेपूर सच्चेपणा हवा. तो तुमच्या ठायी पुरेपूर आहेच. त्याच सच्चेपणाने जगणाऱ्या कुसुमाग्रज नगरीतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपणास मिळाले हा योगायोग खूपच हृद्य. खंत ही की वाङ्मयीन मूल्ये ही जीवनमूल्येही असायला हवीत असे मानणारे आणि तसे आचरणात आणणारे आपल्याकडे फार नाहीत. तुम्ही वाचकांस ‘विज्ञानाची भीती’ आहे असे म्हणता. ते तसे नाही. खरे कारण विचारांची भीती हे आहे. म्हणून ललित आणि ललितेतर अशी एक अदृश्य दरी आपल्याकडे निर्माण होते आणि आर्थिक, वैज्ञानिक, जागतिक आदी विषयांवर लिहिणाऱ्यास साहित्य संमेलनादी लोकप्रिय उत्सवांपासून दूर ठेवले जाते. नाशकातील हे संमेलन मात्र यास अपवाद. जयंतरावांच्या पुस्तकात ‘वामन परत न आला’. पण साहित्य संमेलनाबाबत मात्र असा ‘वामन’ परत यायला हवा.