scorecardresearch

Premium

देउळे म्हणजे नाना शरीरे ..

मनमोहन सिंग सरकारविरोधात जनभावना तापवण्यासाठी अण्णांचा वापर भाजपने खुबीने केला होता.

देउळे म्हणजे नाना शरीरे ..

महाराष्ट्रात सर्व काही -त्यातही आधी देवळे- सुरू करण्याच्या मागणीसाठी शंखनाद करणारा भाजप दिल्लीत सारे सुरू करू नका म्हणतो, हे कसे?
महाराष्ट्रात देवळे उघडावी यासाठी राज्य भाजपने शंखनाद आंदोलन हाती घेतले आहे. महाभारतात युद्धभूमीवर दोन्ही बाजूंचे रणवीर सज्ज झाल्यावर श्रीकृष्ण शंखनाद करीत असे, अशी नोंद आहे. म्हणजे ती युद्ध सुरू झाल्याची खूण. महाभारताचा काळ इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षे असा साधारण मानला जातो. म्हणजे आजपासून किमान साडेचार हजार वर्षांपूर्वी. त्यानंतरच्या मधल्या काळात मानवी संस्कृतीत बरेच बदल झाले आणि जगणे आधुनिक झाले. तसे ते झाले असे मान्य केले तरी आपली समाजजीवनातील अनेक प्रतीके अजूनही आदिमच आहेत. राजकीय नेत्यांस अजूनही समारंभपूर्वक तलवारी दिल्या जातात आणि तो नेताही म्यानातून त्या काढत समोरच्यांस अभिवादन करतो. अनेकदा ही तलवार म्यानातून निघत नाही. मग अनवस्था प्रसंग ओढवतो. पण तरीही तलवारी भेट देणे काही बंद झालेले नाही. या तलवारींचे हे राजकीय नेते नंतर करतात काय, हा खरेतर एक प्रश्नच. असेच दुसरे प्रतीक म्हणजे हा शंख. आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या अनेकांस शालेय वयात गुरुजनांनी ‘शंख’ असे संबोधल्याचे स्मरत असेल. नसेल तर सदर गृहस्थ या उपाधीसाठी अगदी रास्त ठरावा. त्या काळात शंख म्हणवून घेण्यास आवश्यक बुद्धिवैभवाचे साधम्र्य आज शंखनाद करणाऱ्यांत भासत असले तरी या प्रसंगी शंखनाद हा युद्ध प्रारंभ निदर्शक म्हणावा लागेल.

यातून आपल्या समाजमनाची मानसिकता दिसते हे खरेच. पण त्याच वेळी राज्यातील विरोधी पक्षीय भाजप हा युद्ध, शंख, घंटा, देवळे या प्रतीकांपलीकडे जाण्यास कसा तयार नाही, हेदेखील यातून ठसठशीतपणे दिसून येते. हे भाजपचे युद्ध आहे ते राज्यातील देवळांचे दरवाजे भक्तगणांसाठी सताड उघडले जावे याकरिता. करोनाचे कारण पुढे करीत महाराष्ट्र सरकारने अजूनही देवळे खुली न केल्यामुळे भावभक्तांचे प्राण कंठाशी येत असल्याचे भाजपस वाटते. सबब देव आणि त्यांचे भक्त यांची अधिक ताटातूट होऊ नये अशी त्या पक्षाची मागणी आहे. आता हे खरे की हिंदू धर्मातील नवविधा भक्तिमार्ग दृश्य मूर्ती नसतानादेखील परमेश्वराची आराधना कशी करता येते हे सांगतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा या नऊ प्रकारच्या भक्तिवाटांनी सश्रद्धांस परमेश्वराची आराधना करण्याची सोय आहे. त्यासाठी मंदिर आवश्यक असे नाही. पण हिंदू धर्माच्या पुरस्कर्त्यां भाजपस हे मान्य नसावे. म्हणून त्यांनी या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात युद्ध छेडले आहे. खरेतर युद्ध छेडण्यासाठी भाजपस अन्य अनेक सबळ कारणे आहेत. उदाहरणार्थ चीन. समोर चॅनेलीय कॅमेऱ्यात दिसतो की नाही याची खातरजमा करीत शहरी देवळांसमोर प्रसिद्धीसाठी शंख फुंकण्याऐवजी (की करण्याऐवजी?) भाजपच्या या नेत्यांनी भारत-चीन सीमेवर एकसमयावच्छेदे शंखनाद करायला हवा होता. अन्य कशाने नाही तरी या शंखनादाने कानठळ्या बसून तरी भारतीय भूमीत घुसलेल्या चिनी सैनिकांनी कानात बोटे घालून कदाचित मायभूमीचा मार्ग धरला असता. पण राज्य भाजपच्या नेत्यांस चीनच्या घुसखोरीपेक्षा मुंबईतील मंत्रालयात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षीयांच्या सरकारी घुसखोरीची चिंता अधिक असणार. हे त्रिपक्षीय सरकार हे भाजपच्या डोळ्यात गेलेले तूस आहे. त्यामुळे सतत डोळे भरून येत असल्याने त्या पक्षास समोरचे काही दिसेनासे होणे साहजिकच म्हणायचे.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

त्यामुळे आपले स्वत:चे हास्यास्पद विरोधाभासी वर्तनही त्या पक्षास आता कळेनासे झाले असावे. महाराष्ट्रात सर्व काही -त्यातही आधी देवळे- सुरू व्हावी म्हणून राज्यभर घंटा वा शंखनाद करणारा भाजप बरोब्बर याच्या विरोधी कारणांसाठी दिल्लीत आंदोलन करताना दिसतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा प्रयत्न आहे जनजीवन जास्तीत जास्त पूर्वपदावर आणण्याचा. त्याच हेतूने त्यांनी शालादी शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर तिकडे मात्र भाजप करोनाचे कारण पुढे करीत सर्व काही सुरू करू नका अशी मागणी करतो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व काही सुरू करू नये या मताचे. तर इथे मात्र भाजपचा आग्रह वेगळा. हे फक्त केजरीवाल यांच्याच बाबत होते असे नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे गृहसचिव राज्यास गर्दी होईल असे काही करू नका, अशी तंबी देतात. रात्रीच्या संचारबंदीचे सल्ले देतात. आणि त्याच मोदी यांचा भाजप मात्र या सगळ्या सूचना खुंटीवर टांगतो, हे कसे? एका बाजूने वाढत्या करोनाचे, तिसऱ्या लाटेचे इशारे द्यायचे आणि त्याच वेळी ‘जन आशीर्वाद यात्रा’ आखायच्या; यात आरोग्यविषयक शहाणपणापेक्षा राजकीय अगतिकताच अधिक म्हणावी लागेल.

तथापि आपले हे वर्तन किती हास्यास्पद आहे हे कळण्याइतकेही भान त्या पक्षास राहिले नसेल तर परिस्थिती गंभीर ठरते. त्यात त्यांना देवळे उघडा या मागणीसाठी पाठिंबा देणाऱ्यांत कोण? तर अण्णा हजारे. आता यात अण्णांचा पाठिंबा मागणारा भाजप अधिक केविलवाणा की आपल्याला अजूनही लोक गांभीर्याने घेतात असा भ्रम असणारे अण्णा हे अधिक विनोदी याचे उत्तर देणे अवघड. मनमोहन सिंग सरकारविरोधात जनभावना तापवण्यासाठी अण्णांचा वापर भाजपने खुबीने केला होता. त्यानंतर केंद्रात आणि लगोलग महाराष्ट्रातही सत्ता आल्याने अण्णांची गरज सरली. म्हणून मग अण्णांची गठडी पुन्हा यादवबाबा मंदिरात वळली गेली असणार. पण २०१९च्या विधानसभा निवडणुकांत घात झाला आणि इतके दिवस ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी नेतृत्वाने महाराष्ट्रात अण्णांचा प्रतिपाळ केला होता त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून ज्या पक्षाने अण्णांस राष्ट्रीय स्तरावर उंचावले त्या भाजपस कात्रजचा घाट दाखवला. म्हणून त्या पक्षास आता अण्णांची आठवण आली. पण सध्या अण्णा हजारे हे शेंदूर खरवडले गेलेले आणि चिमूटभर होती ती पुण्याई धुपून गेलेले स्वत:चेच व्यंगचित्र म्हणून तेवढे उरलेत. तेव्हा त्यांच्या पाठिंब्याने मंदिरे उघडण्याची मागणी आणि ते करणारे अधिकच विनोदी ठरतात. या विनोद निर्मितीत आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ही सामील झाली. या पक्षाच्या ठाणे सुभेदारांनी दहीहंडीसाठी आंदोलन केले. हा ‘सण’ (?) समजा इतका राष्ट्रीय महत्त्वाचा आहे तर त्याच्या साजरीकरणाचे आंदोलन फक्त ठाणे आणि मुंबईत. ज्याचे नवनिर्माण करायचे त्या महाराष्ट्रात अन्यत्र हे ‘मनसे’ आंदोलन दिसत नाही, हे कसे? या अशा दोनशहरी आंदोलनामुळे आपला पक्षही दोनशहरी असाच गणला जाईल हे या पक्षांच्या प्रमुखांस कळत नसेल तर आश्चर्यच!

‘पहिले ते राजकारण’ असे म्हणणारे समर्थ रामदास हे महाराष्ट्राचे एक प्रमुख संत. राष्ट्रीय स्तरावरील अनेकांस त्यांच्या लिखाणाचा परिचय नसला तरी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांस तो असायला हवा. मूर्खाची लक्षणे सविस्तरपणे उलगडून दाखवणारा हा संत देवळाविषयी लिहितो- देउळे म्हणजे नाना शरीरे। जेथे राहिजे जीवेश्वरे। नाना शरीरे नाना प्रकारे। अनंत भेदे॥ देवळे उघडा या मागणीसाठी शंख करणाऱ्यांनी आपल्या अमूल्य वेळेतील काही भाग संतवाङ्मयाच्या परिशीलनासाठी खर्च केल्यास काही एक शहाणपण येऊन राज्य तसेच देशाचे भले होण्यास मदत होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta editorial on bjp double standard over temple reopening zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×