‘सरदार’ पुरंदरे !

बाबासाहेबांनी, अगदी लहान असतानाच आपले सारे आयुष्य शिवरायांच्या चरणी समर्पित करून काम करायचे ठरवले.

‘मी नट आहे, गोंधळी आहे; शाहीर, बहुरूपी आणि खेळिया आहे.’ असे अभिमानाने सांगणाऱ्या या शिवकथाकाराने महाराष्ट्राला असामान्य तोडीच्या राजांचे महत्त्व सांगितले

जगण्याचे प्रयोजन वयाच्या पंधराव्या वर्षीच गवसलेले शिवाजी महाराज आणि त्यांच्या विलक्षण कर्तबगारीचे आख्यान सादर करणे हेच आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन याची त्याच वयात जाणीव झालेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे २४० वर्षांच्या फरकाने आकारास असलेले अद्वैत. शिवाजी महाराजांनी पाहिलेले स्वप्न भव्य होते. या मातीला तोवर अशी भव्य स्वप्ने पाहणारे अपरिचित होते आणि तसे पुढल्या काळात घडू नये या एकाच जाणिवेने बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले सारे आयुष्य देदीप्यमान शिवरायगाथा गाण्यात व्यतीत केले. अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि कमालीच्या रसपूर्ण सादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कथन करणारी वाणी आता स्तब्ध झाली आहे.

इतिहासाची नाळ वर्तमानाशी बेमालूम जोडता येणे हे कोणत्याही चांगल्या इतिहासकाराचे मोठेपण. बाबासाहेबांच्या ठायी ते पुरेपूर होते. गेली सात-आठ दशके अखंड पायपीट करत महाराष्ट्र, देश आणि जगभर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जगात असामान्य असलेल्या या राजाचे गुणगान करताना इतिहासाचे, त्यातील व्यक्तींचे, त्यांच्या स्वभावांचे, त्यांच्यातील स्नेहबंधांचे, ताणतणावांचे आणि हेव्यादाव्यांचे अतिशय रसाळ भाषेत वर्णन केले. प्रत्येक मराठी माणसाची छाती या शिवकथनामुळे गर्वाने भरून आली. भारून टाकणाऱ्या कर्तृत्वाचा इतिहास कथन करणाराही असाच भारला गेलेला असेल तर त्या इतिहासाचे मोठेपण वर्तमानात सहज झिरपते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि बाबासाहेबांची शिवरायनिष्ठा हे असे समीकरण होते. वयाच्या शंभरीत प्रवेश करतानाही पुढील दशकभरातील कामांची आखणी करण्यात मग्न असणारे बाबासाहेब छत्रपतींच्या जीवनातील प्रत्येक क्षण पुन:पुन्हा जगण्याचा प्रयत्न करीत राहिले. त्या क्षणाची महती सर्वापरी सांगत राहिले. सगेसोयरे झालेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरील त्यांची भ्रमंती आणि प्रत्येक घटनेच्या सत्यासत्यतेसाठी इतिहासाचे अवलोकन करण्याची जिद्द, त्यासाठी करावे लागणारे अपार कष्ट आणि त्याहीपलीकडे जाऊन हा जाज्वल्य इतिहास सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची धडपड, हे त्यांच्या जगण्याचे श्रेयस आणि प्रेयस होते. प्रारंभीच्या काळात त्यांना ज्या हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, खस्ता खाव्या लागल्या, अपमान सहन करावे लागले, निराशा पदरी आली, त्याबद्दल आयुष्यात कधी ‘ब्र’ही न काढता आपली लेखणी आणि वाणी एकाच कारणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्यांनी जो ध्यास घेतला, तो विलोभनीय होता.

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांना ऐन तारुण्यात शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कार्याने अक्षरश: झपाटून टाकले. वडील चित्रकलेचे शिक्षक आणि घरातील आवक यथातथाच. परंतु बाबासाहेबांची जिद्द या सगळ्याला पार करून जाणारी. भारत इतिहास संशोधन मंदिरात ज्येष्ठ इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या सान्निध्यात आल्यानंतर इतिहासाकडे बघण्याची त्यांची दृष्टीच बदलली. सतत पुस्तकांमध्ये किंवा कागदपत्रांच्या रुमालांमध्ये जाड भिंगाचा चष्मा लावून कपाळावरील आठय़ांचे सुरकुतलेपण जराही ढळू न देणारे संशोधक अशी त्यांनी आपली ओळख कधीच होऊ दिली नाही. इतिहास घडून गेलेला असला तरी नव्याने सापडलेल्या प्रत्येक कागदपत्रानुसार तो बदलत राहतो. इतिहासातील या सर्जनासाठी, शिवाजी महाराज जेथे जेथे पोहोचले, त्या सगळ्या ठिकाणी अशी कागदपत्रे शोधण्यासाठी अनेकांच्या घरांचे उंबरठे त्यांनी झिजवले. एखादे चिठोरे सापडले तरी अपार आनंदाने न्हाऊन जाणाऱ्या बाबासाहेबांनी, अगदी लहान असतानाच आपले सारे आयुष्य शिवरायांच्या चरणी समर्पित करून काम करायचे ठरवले. तेव्हापासून इतिहासाशी त्यांचे जडलेले नाते वर्षांगणिक घट्ट होत गेले. संशोधकाच्या अंगी केवळ कष्ट करण्याची वृत्ती असून भागत नाही. त्यासाठी वेडच असावे लागते, बाबासाहेब हे याचे मूर्तिमंत उदाहरण.

निसर्गदत्त अफाट स्मरणशक्तीमुळे, प्रत्येक घटनेचे सगळे पदर, तारीखवार साद्यंत उलगडून दाखवण्याचे त्यांचे कसब वादातीत होते. वेगळेपण असे की, हा इतिहास पाठय़पुस्तकांप्रमाणे केवळ सनावळ्यांमध्ये अडकवून निरस होऊ न देता, जणू तो आत्ता, इथे, आपल्यासमोरच घडतो आहे, अशा कथनात्मक शैलीत सादर करण्याचे कसब त्यांच्या ठायी होते. त्यांच्यातील जन्मजात कथेकऱ्यास लहानपणी आसपास झालेल्या संस्कारांनी घडवले. तितकीच बोलकी त्यांची लेखणीही होती. त्यामुळे शिव इतिहास कथन आणि लेखन हे दोन्ही त्यांनी तितक्याच उत्कटतेने केले. सुरुवातीस राजा शिवछत्रपती हे दहा खंडांचे चरित्र घरोघरी पोहोचवण्यासाठी बाबासाहेब सायकलीला गठ्ठे बांधून, शाळाशाळांमध्ये जात. तेथील अध्यापकांना गळ घालून वर्गात प्रवेश मिळवत आणि त्या मुलांना या अथांग व्यक्तिमत्त्वाची ओळख इतक्या नाटय़पूर्ण रीतीने करून देत, की विद्यार्थ्यांचे भान हरपून जाई. नंतरच्या काळात त्यांच्या शिवचरित्र व्याख्यानमालेबाबत असेच घडले. कायिक आणि वाचिक सादरीकरणाचा तो वस्तुपाठच. हजारोंचा समुदाय मंत्रमुग्ध करण्याची त्यांची शैली, त्यातील उत्कटता आणि भावपूर्णता यामुळे या व्याख्यानमालेचे कार्यक्रम पाच-सहा वर्षे आधी ठरवावे लागत असत.

 महाराष्ट्राच्या इतिहासात ते इतके आकंठ बुडालेले होते की समोर आलेल्या कोणत्याही व्यक्तीने त्याचे आडनाव सांगताच, बाबासाहेबांकडे त्याच्या घराण्याची सारी कुंडली तयार असे. लहान-थोर, जातपात, धर्म असा भेदभाव करण्याची गरजही त्यांना कधी वाटली नाही. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या निमित्ताने झालेल्या वादाबाबत त्यांनी कधी जराही खंत व्यक्त केली नाही. (त्या वादाचा समाचार ‘लोकसत्ता’ने ‘पुरोगाम्यांचे मौजीबंधन’ या १५ ऑगस्ट २०१५ या दिवशी प्रकाशित संपादकीयात घेतला होता.) अलीकडे त्यांच्यावर इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाची टीका झाली. ती विद्यमान सामाजिक कप्पेकरणाशी सुसंगत असली तरी हास्यास्पद ठरते. कारण महाराजांच्या कर्तृत्वापेक्षा बाबासाहेबांस ब्राह्मण्य अधिक प्रिय असते तर त्यांनी पेशवाईचे गोडवे गायिले असते. अशा टीकाकारांच्या तोंडी बाबासाहेब कधीही लागले नाहीत. ते कधी क्वचित व्यथित होत, परंतु क्षणार्धात त्यांना राहिलेल्या कामांची प्रचंड मोठी यादी आठवे आणि मग ते पुन्हा आपल्या व्यापात व्यग्र होत. शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासणे इतके भव्य ध्येय असते तेव्हा त्याच्या पाठपुराव्यात मग्न असलेल्यास आसपासचे टीकाकार अदखलपात्र वाटणे साहजिकच. यातूनच प्रसिद्धी, पैसा, मानमरातब अशा मर्त्य मानवी घटकांवर त्यांनी सहजपणे मात केली. महाराजांच्या अनुपम शतकाला विसाव्या शतकात पुन्हा साकार करण्याची किमया त्यांना साध्य झाली. शिवराय हाच श्वास आणि केवळ तोच विचार. त्यांच्या सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि उत्साहाने अक्षरश: भारावून जाई. साहित्य, रंगभूमी, इतिहास या क्षेत्रांतही त्यांची मुशाफिरी होती. ‘माणूस’ हे नियतकालिक त्यांचे मेहुणे श्री. ग. माजगावकर यांनी सुरू करायचे ठरवले, तेव्हा त्याच्या स्थापनेत बाबासाहेबांचा सहभाग होता तरी त्यात गुंतून न राहता, त्यातून अलगदरीत्या बाजूला होत बाबासाहेबांनी आपल्या कार्याला दशदिशांनी वाढवले. संशोधन, लेखन, भाषणे, रंगमंचीय आविष्कार अशा अनेक प्रकारे ते सतत समाजात राहिले. ‘मी नट आहे, गोंधळी आहे; शाहीर, चित्रकथी, कीर्तनकार, बहुरूपी आणि खेळिया आहे.’ असे अभिमानाने सांगणाऱ्या या शिवकथाकाराने महाराष्ट्राला या असामान्य तोडीच्या राजाचे महत्त्व सांगितले. ‘आयुष्यात एकही चूक न केलेला राजा,’ अशी इतिहासातील नोंद जनतेच्या मनात बिंबवली जावी यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.  शिवाजी महाराजांचा इतिहास वर्तमानात आणण्याची त्यांची आस इतकी की प्रसंगी त्यात ते देहभान विसरून जात. ‘भवानी तलवार’ भारतात आणण्याचा कथित प्रयत्न हे त्याचे उदाहरण. माजी मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांच्या काळात शालिनीताई पाटील ही तलवार मायदेशी आणणार होत्या. त्या वेळी शालिनीताईंना मुजरा करून बाबासाहेबांनी टीका ओढवून घेतली. पण त्यास इलाज नाही. कारण जगण्याचा प्रत्येक क्षण शिवमय व्हावा, यासाठीच त्यांची आयुष्यभराची तपश्चर्या होती. छत्रपतींचा इतिहास त्यांच्या तोंडून खासगी बैठकांत ऐकणे हा अभूतपूर्व आनंद असे. तो इतिहास ते जगत. ‘हे असे महाराज येथून निघाले..’ वगैरे ते सांगू लागले की खरोखरच महाराज त्यांना दिसत. हे ‘दिसणे’ समोरच्यानेही ‘पाहावे’ असा त्यांचा प्रयत्न असे. तो लाघवी वाटे. त्या अर्थाने बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे शिवकालातून कधीच बाहेर आले नाहीत. शक्य असते तर इतिहासात मागे जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात त्यांनी सरदारकी केली असती. ती ऐतिहासिक उणीव त्यांनी वर्तमानातील शिवप्रेमाने भरून काढली. त्या अर्थाने बाबासाहेब हे छत्रपतींच्या दरबारातील सरदार होते. आज त्याच शिवसृष्टीकडे त्यांनी प्रयाण केले. त्यांच्या स्मृतींस ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे मानाचा मुजरा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta editorial on eminent historian and author babasaheb purandare zws

Next Story
अग्रलेख : चांदणे शिंपीत जा..
ताज्या बातम्या