लिओनेल मेस्सीचे मैदानावरील धावणे म्हणजे जणू पायांनी ताना, वळणवाटा घेत केलेले काव्यवाचन..

अर्जेटिना संघाचे भले करण्याची जबाबदारी बहुतांश मेस्सीच्याच खांद्यावर येते कारण त्याला साथ देऊ शकतील असे तगडे खेळाडू त्यांच्याकडे नाहीत. अशा वेळी मेस्सीला जेरबंद करणे ही विरोधकांची पहिली चाल असते.  सोमवारी हेच पुन्हा दिसून आले. परिणामी मेस्सी यास केविलवाणी निवृत्ती जाहीर करावी लागली.

र्अजेटिना या देशाबाबत आर्वजून लक्षात ठेवावे असे काही नाही. दक्षिण अमेरिका खंडातील हा मध्यम आकाराचा देश. जागतिक राजकारणातील त्याची ओळख दोन कारणांची. एक म्हणजे फॉकलंड युद्धात ग्रेट ब्रिटनला आव्हान देण्याचे दु:साहस करणारा आणि अलीकडच्या काळात प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला अशी. परंतु त्याही उप्पर सर्वसामान्यांसाठी अर्जेटिना म्हणजे दिएगो मॅराडोना आणि लिओनेल मेस्सी. यापैकी मॅराडोना निवृत्त आहेच पण मेस्सी यानेही अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. कोपा अमेरिका स्पर्धेत शेजारील चिली या देशाकडून सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागल्यामुळे मेस्सी याच्यावर राजीनाम्याची वेळ आली. वास्तविक कोपा अमेरिका स्पर्धा म्हणजे काही फुटबॉलचा विश्वचषक नव्हे. फक्त अमेरिका खंडातील देशांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सोमवारी चिली या चिमुरडय़ा देशाने फुटबॉलमधील महासत्ता असलेल्या अर्जेटिनाचा दुसऱ्यांदा पराभव केला आणि या पराभवाने या महासत्तेचे महाकेंद्र असलेल्या मेस्सी याच्या कर्तबगारीवर पाणी ओतले.

याचे कारण मॅराडोनानंतरचा महान खेळाडू म्हणून मेस्सी ओळखला जात असला तरी त्यास अद्याप आपल्या देशास मोठय़ा स्पर्धेत विजय मिळवून देता आलेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पेनमधील बार्सिलोना क्लबकडून खेळताना मेस्सी याने अनेक पराक्रम नोंदवले आहेत. त्याला मैदानावर खेळताना पाहणे हा आनंदाचा अनोखा आविष्कार असतो. कारण चेंडू जणू काही त्याच्या पायावर लुब्ध असल्यासारखा त्याला लगडतो आणि अनेक पायांचे अडथळे पार करीत मेस्सी आपल्याच आनंदात स्पर्धकाच्या गोलपोस्टकडे धावत असतो. क्रिकेटच्या मैदानावर मायकेल होल्डिंग, अमेरिकेचा धावपटू जेसी ओवेन्स, ब्राझीलचा रोनाल्डो आणि मेस्सी आदी काहींचे धावणे म्हणजे पायांनी केलेले काव्यवाचन. यांच्या धावण्यात तुफान वेग असतो. परंतु तरी ते जीव खाऊन धावत असल्यासारखे वाटत नाहीत. अन्यांच्या तुलनेत रोनाल्डो आणि मेस्सी यांचे धावणे एका रेषेतील नसते. त्यात ताना पलटय़ांसारख्या खूप वळणवाटा असतात. ते सर्वच अत्यानंद देणारे. परंतु हा आनंद बिगर्अजेटिनी प्रेक्षकांसाठी. र्अजेटिनींना या आनंदाबरोबर विजयही हवा असतो. नव्हे ती त्यांची गरज असते. परंतु मेस्सी यात सातत्याने अपयशी ठरला. पाच वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेला हा खेळाडू मातृभूमीसाठी खेळावयाची वेळ आली की मात्र निष्प्रभ ठरत असे. यामागील कारण जसे त्यात आहे तितकेच ते त्याच्या संघात आहे. ते म्हणजे अशा गुणी खेळाडूस सवरेत्कृष्ट कामगिरीसाठी तितक्या नाही तरी त्याच्या जवळपास जाईल इतक्या तरी गुणी संघसहकाऱ्यांची आवश्यकता असते. ती गरज र्अजेटिना फार कमी वेळा पुरवू शकला. परिणामी मॅराडोना आणि अलीकडच्या काळात मेस्सी हीच र्अजेटिनाची ओळख बनली. थोडक्यात त्या देशाचा संघ हा एकखांबी तंबू बनून गेला. या अशा एकखांबांना आधार देण्यासाठी समर्थ खांब उभे राहू शकले नाहीत तर काय होते याचा अनुभव आपण अनेकदा घेतलेला आहे. गेल्या विश्वचषकापासून तो र्अजेटिनास मिळू लागला. २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत जोमातला मेस्सी असूनही अर्जेटिनास जर्मनीकडून १-० असा पराभव पत्करावा लागला. त्या स्पर्धेत मेस्सी याने चार गोल लगावले. परंतु अंतिम सामन्यात तो एकही गोल करू शकला नाही. त्यानंतरच्या कोपा अमेरिका स्पर्धेतही तो चिलीविरोधात अगदीच निष्प्रभ ठरला. त्याही वेळी चिलीने अर्जेटिनाचा पराभव केला. आताच्या स्पर्धेत पनामाविरोधात खेळताना मेस्सी याने हॅट्ट्रिक नोंदवली. या स्पर्धेत अर्जेटिनाने अमेरिकेला ४-० असे हरवले तेव्हा तर मेस्सीचा विक्रमच झाला. त्याने र्अजेटिनासाठी नोंदवलेल्या गोल्सची संख्या ५५ वर गेली. परंतु अंतिम फेरीत चिलीविरोधात खेळताना मात्र त्याच्या पायांना जणू दातखीळ बसली. असे होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे चिली खेळाडूंचे पूर्णपणे मेस्सीकेंद्रित डावपेच. त्याच्याभोवती चिलीच्या खेळाडूंनी अशी काही भक्कम तटबंदी उभी केली होती की मेस्सी काहीही करू शकला नाही. आणि जेव्हा करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याच्या पायांनी दगा दिला. हा सामना ९० मिनिटांच्या खेळानंतर गोलशून्य अवस्थेत होता. नंतरच्या ३० मिनिटांतही काही निकाल लागला नाही. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटची वेळ आली. त्या वेळी दुसरी पेनल्टी संधी साधताना मेस्सी याने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरून प्रेक्षकांत गेला. या ऐन मोक्याच्या वेळी त्याच्या पायांनी चुकवलेला हा नेम पाहूनच अनेकांच्या छातीत धस्स झाले. ती अर्जेटिनाच्या पराभवाची नांदी होती. या धक्क्यातून हा संघ कधीच सावरला नाही. अर्जेटिना हरली आणि लहान मुलासारखा रडणारा मेस्सी जगाला दिसला.

तेव्हा यानंतर त्यास असे काही तरी टोकाचे पाऊल उचलावे लागणार अशी अटकळ बांधली जात होतीच. ती खरी ठरली. खासगी संघातून खेळताना विक्रमावर विक्रम नोंदवणारा मेस्सी देशासाठी खेळताना मात्र निष्प्रभ ठरतो ही त्याची जशी शोकांतिका आहे तशीच ती त्या देशाचीही आहे. मेस्सी खासगी क्लबसाठी खेळताना प्रभावी ठरतो, कारण त्याच्या आसपास त्याचे साथीदारही असेच तगडे असतात. तुलनेने अर्जेटिनाच्या संघात काही इतके तगडे खेळाडू नाहीत. त्यामुळे संघाचे भले करण्याची जबाबदारी बहुतांश मेस्सीच्याच खांद्यावर येते. तेव्हा त्यास जेरबंद करणे ही विरोधकांची पहिली चाल असते. ती यशस्वी झाली की र्अजेटिनाचा संघ किती सामान्य भासतो ते सोमवारी पुन्हा दिसून आले. परिणामी मेस्सी यास केविलवाणी निवृत्ती जाहीर करावी लागली. मेस्सीमध्ये नेतृत्वाचे गुण नाहीत अशी टीका याआधी मॅराडोना याने केली होती. जे काही झाले त्यावरून मॅराडोना चाहत्यांना ती खरी वाटू शकते. तसे झाल्यास तो मेस्सीवर अन्याय ठरेल.

याचे कारण मॅराडोना आणि मेस्सी या दोघांच्या शैलीत पूर्ण फरक आहे. कारण त्यांची जीवनशैली भिन्न आहे. मॅराडोना गरीब घरातून आलेला आणि प्रत्येक टप्प्यावर त्यास स्वत:ला सिद्ध करावे लागले. त्याच्या आसपास कोणी फुटबॉलपटू होते, असेही नाही. याउलट मेस्सीचे बरेचसे आयुष्य बार्सिलोनात फुटबॉलमधील दिग्गजांना पाहण्यातच गेले. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तो बार्सिलोना क्लबसाठी निवडला गेला. त्यानंतर फक्त तीन वर्षांनी ज्येष्ठांसह खेळण्यासाठी त्याची निवड झाली. ही घटना २००३ सालची. तेव्हापासून फुटबॉलप्रेमींना त्याने मोहवून ठेवले आहे. मॅराडोना याची परिस्थिती अगदी याउलट होती. अर्जेटिनातील गरीब, कामगार वस्तीतून वाट काढत त्यास स्वत:ला सिद्ध करावे लागले. पाश्र्वभूमी अशी असेल तर त्या व्यक्तीच्या अंगी आपोआपच एक प्रकारचा त्वेष असतो. याउलट बालपण समाधानी असलेली व्यक्ती संयत असते. मेस्सी त्या अर्थाने संयत आहे. पण हे संयत असणे हे काही अपंगत्व नव्हे. उलट या संयततेमुळे मेस्सीचे खेळणे कधी धसमुसळे झाले नाही. अर्थात तरीही तो आपल्या देशाला विजयी करू शकला नाही, हे सत्य उरतेच.

ताज्या कोपा अमेरिका स्पर्धेने अशी दोन कटुसत्ये पाहिली. ब्राझीलच्या संघास अंतिम फेरीतही प्रवेश न मिळवता आल्याने या संघाचा प्रशिक्षक डुंगा यांस नारळ देण्यात आला. मेस्सी याने तशी वेळ येऊच दिली नाही. त्याने यापुढे देशासाठी न खेळण्याचा निर्णय जाहीर केला. म्हणजे तो अन्य संघासाठी, म्हणजे बार्सिलोना वगैरे, खेळत राहील. मेस्सी आज अवघा २९ वर्षांचा आहे. अशा वयातील निवृत्तीमागे अतृप्त असहायता असते. गेले काही दिवस भारतीय फुटबॉलप्रेमींचे जग दोन प्रहरांत आणि दोन खंडांत विभागलेले होते. भल्या पहाटे कोपा अमेरिका आणि उत्तररात्री युरो कप. भारतीय वेळेनुसार पहाटेच्या सामन्यात मेस्सीवर निवृत्तीची वेळ आली. पहाटप्रहरी झालेली ही सायंकाळ फुटबॉलप्रेमींना चटका लावून जाणारी आहे.