लताबाई आणि आपण यातील नक्की नाते काय, हा प्रश्न पडतो; कारण या नात्यास केवळ गायक आणि श्रोता इतकेच अल्पजीवी परिमाण नाही..

लता मंगेशकर यांच्या जाण्याने आपण नक्की काय गमावले आहे याचे भान ‘प्राणवायू मिळाला नाही तर आपण काय गमावू’ या प्रश्नाच्या उत्तरातून येईल. जन्मत:च ज्या अलगदपणे आपण श्वासोच्छ्वास करू लागतो त्याप्रमाणे लता मंगेशकर यांचे स्वर ऐकू लागतो आणि जन्मास आल्यानंतर श्वसनासाठी हवा मिळणारच आहे हे जसे गृहीत धरलेले असते त्याप्रमाणे लता मंगेशकर यांचा स्वरही आपण गृहीत धरलेला असतो. आज त्या स्वराच्या देहाकाराने विश्वाच्या उगमाकडे प्रस्थान ठेवले. देश, राज्य, धर्म, भाषा, जात, काळ आदी क्षुद्र मानवी सीमाबंध पुसून श्रवणशक्ती असलेल्या भूतलावरील प्रत्येकाच्या हृदयास स्पर्श करू शकलेले आधुनिक भारतातील हे स्वरश्रीमंत व्यक्तिमत्त्व यापुढे आपल्यात नसेल. केवळ आनंद आणि हवीहवीशी वेदना यांची आपल्या चाहत्यांवर आजन्म पखरण करणारा या देशात जन्मलेला हा सर्वात मोठा कलाकार. त्यांच्या वैश्विकतेची तुलना फक्त महात्मा गांधी यांच्या लोकोत्तरतेशीच व्हावी. या देशाच्या सर्वधर्मी सांस्कृतिकतेवर लता मंगेशकरांच्या स्वराचे शिंपण इतके सर्वदूर आणि इतके खोल गेलेले आहे की त्यांचा देह आपल्यात नाही या वेदनेची जाणीव होण्यासही काही काळ जावा लागेल. हवेचे महत्त्व जसे ती मिळेनाशी झाली की कळते तसेच हे. यासंदर्भात विख्यात कवी वर्डस्वर्थ याचा अनुभव हा आपला अनुभव असेल. या कवीस आपल्या प्रिय कन्येच्या निधनाचे अत्यंत दुर्दैवी वृत्त कळले तेव्हा हृदय दग्ध झालेला वर्डस्वर्थ इतकेच उद्गारला: ओह.. आय थॉट शी वॉज इम्मॉर्टल! लताबाईंच्या जाण्याने आज आपल्या सर्वाची भावना हीच असेल.

model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…

कारण जगण्याच्या प्रत्येक श्वासात गुंतून राहिलेल्या लताबाईंच्या स्वरांनी आपले सारे जगणे श्रीमंत करून टाकलेले आहे. चित्र, शिल्प, रंग आदी कलांत काडीचीही गती नसणाऱ्यापासून ते उस्ताद आणि पंडितांवरही गारूड करण्याची लताबाईंची क्षमता अलौकिक. असे सहसा होत नाही. पंडितांनी मोठे मानलेल्यास सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान असतेच असे नाही आणि तेथे स्थान असलेल्यांना पंडित आणि अभिजनांची मान्यता मिळतेच असे नाही. लता दीनानाथ मंगेशकर हा या सर्वाचा आदरणीय अपवाद. या स्वरांची अपूर्वाई, त्यातून सहजपणे पोहोचणारा भाव, त्यातील स्वरांनी भारून टाकलेले शब्दांचे अर्थ यामुळे या श्रीमंतीला गर्भरेशमी साज चढतो आणि प्रत्येकाचे जगणेच लपेटून घेतो. गळय़ातून येणाऱ्या प्रत्येक स्वराला चिरंजीवित्व प्राप्त करून देण्याची लताबाईंची क्षमता अगाध आणि थक्क करायला लावणारी आहे. १९३८ साली त्या पहिल्यांदा गायल्या. म्हणजे त्यांच्या गाण्याचे वय देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक. आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना एकविसाव्या शतकातील पिढीलाही त्या भावतात. हे अद्भुत आहे. खेमचंद प्रकाश ते ए. आर. रेहमान इतक्या अवाढव्य काळावर मात करणारा त्यांचा सांगीतिक प्रवास. एका अर्थी संपूर्ण विसाव्या शतकाच्या मध्यापासून या स्वराने साऱ्या जगाला आपल्या कवेत घेतले. स्वरसंस्कार घडवले. अत्युच्च अनुभव म्हणजे काय, हे अतिशय सोपेपणाने समजावून सांगितले. निसर्गदत्त लाभलेल्या गळय़ावर प्रयत्नपूर्वक संस्कार करून त्याला स्वरसिद्धी प्राप्त करून देणे, ही कष्टसाध्य गोष्ट लताबाईंना साध्य झाली. आयुष्यात बालपणापासूनच भोगाव्या लागलेल्या दु:खाला आपल्या स्वरांतून कारुण्याचे कोंदण देणाऱ्या या कलावतीने या देशातील पिढय़ापिढय़ांमधील अंतर जवळजवळ नाहीसे करून टाकले. स्वरांच्या या अद्भुत साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राज्ञीपद आठ दशके टिकवून ठेवताना घेतलेले परिश्रम, खाल्लेल्या खस्ता आणि आयुष्यभर घेतलेला ‘सर्वोत्कृष्टते’चा वसा याचे अपूर्व दर्शन त्यांच्या प्रत्येक गीतातून पाझरत राहते. ललित संगीतात शब्दांना असलेले स्वरांचे अस्तर संगीतकार शोधतो हे खरे, परंतु त्या संगीतकाराच्याही मनातले खरेखुरे गाणे ओळखण्याची शक्ती लताबाईंकडे होती. या देशातल्या प्रत्येकाच्या एकटेपणाला तसेच सहजीवनालाही या स्वरांची साथ लाभली.

अगदी लहान वयात कुटुंबाची पडलेली जबाबदारी पेलण्यासाठी करावे लागलेले प्रचंड कष्ट सोसतानाही आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, याबद्दल पूर्ण जाणीव असणाऱ्या लताबाईंना संगीताच्या क्षेत्रातील अत्युच्च शिखर तेव्हाच दिसत होते. अंगी असलेल्या गुणांना ओळखून त्यांची मशागत करण्यासाठी जवळपास कोणीच वडीलधारे नाही; पण या जगात गुणवत्ताच उपयोगी पडते, यावर दृढ विश्वास ठेवून त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. ज्या रुपेरी दुनियेत त्यांनी पाऊल ठेवले, तिथे, पन्नासच्या दशकातही कमालीची स्पर्धा होती. हेवेदावे होते. एकमेकांना पाण्यात पाहण्याची वृत्ती होती. वशिलेबाजी होती. परंतु या सगळय़ाच्या पलीकडे तो एक व्यवसाय होता आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक प्रेक्षक आणि रसिक होता. तिथे केवळ गुणांचीच कदर होत होती. लता मंगेशकर या नावाभोवती हे सोनेरी रसिकप्रियतेचे वलय फक्त आणि फक्त  त्यांच्यातील कलागुणांनीच मंडित होते. प्रत्येक स्वर आणि त्याच्याभोवती असणाऱ्या श्रुती यांचा नेमकेपणा हुकमीपणाने व्यक्त करता येण्यासाठी सारे आयुष्य वेचावे लागते. लताबाईंनीही त्यासाठी आपले सारे आयुष्य पणाला लावले. नुसते स्वर नेमके लागणाऱ्या कलावंतांची संख्या या देशात मुळीच कमी नसेल. परंतु त्या स्वरांना सुयोग्य भावनेची शाल पांघरण्याची सर्जनशीलता हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढय़ाच कलावंतांकडे असते. शिवाय त्यासाठी आपले प्रत्येक ध्वनिमुद्रण ही आपली अस्तित्वाचीच परीक्षा आहे, याचे भान ठेवून त्यातील बारीकसारीक तपशिलाची नोंद घेणारे कलावंत तर आणखीनच विरळा. त्यामुळे पदार्पणातच सारे जग आपल्या स्वरांच्या मिठीत सामावून घेणाऱ्या या कलावतीला त्यानंतरचा प्रत्येक क्षण त्या शिखरावर घट्ट पाय रोवून उभे राहण्यासाठी व्यतीत करावा लागला. तो करताना स्वत:ला आणि या विश्वातील प्रत्येकाला स्वरसंपन्न करण्याची जिद्द अंगी बाळगावी लागली. त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. हे सारे आपल्या नजरेसमोर घडण्याचे भाग्य लाभलेल्या भारतातील अनेक पिढय़ा त्यामुळे सर्वार्थाने समृद्ध झाल्या. लताबाईंच्या स्वरांच्या या जादूने भारतवर्षांचे सारे आयुष्यच बदलून गेले. त्या नीरस, पुनरुक्तीने भरलेल्या दिनक्रमाला एक सुंदर कारण मिळाले आणि श्वासाच्या पलीकडे जाऊन जगण्याची ऊर्मी  प्राप्त झाली. भारतीय चित्रपटांतील कित्येक हजार गीते, त्याशिवाय अभंग, भजन, भावगीत, विराणी यांसारख्या संगीतातील प्रत्येक प्रकारात लताबाईंची एक ठाशीव नाममुद्रा आहे. मराठी माणसाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला जाज्वल्य अभिमान त्यांच्या ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिमुद्रिकेत किती उत्कटतेने साकार झाला आहे! ‘चाला वाही देस’मधील मीरेच्या जगण्यातील भक्तिमय जग आपल्या संवेदना कितीतरी  तरलपणे जाग्या करतात. लताबाईंनी गायलेल्या विराण्यांमुळे संत ज्ञानेश्वरांना सारा महाराष्ट्र किती प्रेमाने समजावून घेऊ शकला! स्वत: उत्कृष्ट संगीतकार असतानाही, मोजकेच कलात्मक दागिने घडवून शांतपणे बाजूला होणारे ‘आनंदघन’ हे त्यांच्यातील व्यक्तिमत्त्व जेवढे लोभस तेवढेच सौंदर्यपूर्ण.

ज्या कलेमध्ये अर्थाने अनेकानेक पदर असतात आणि प्रत्येक वेळी ते नव्याने समजून येतात, ती कला श्रेष्ठ मानली जाते. लता मंगेशकरांच्या स्वरदर्शनाने नेमका हाच अनुभव येतो. तेच ते गीत कितीही वेळा ऐकले, तरी त्याची खुमारी संपत नाही. त्यातील स्वरशब्दांचे नवे अर्थ प्रत्येक वेळी उलगडत जातात. एकदा ऐकून मन शांत होत नाही आणि पुन्हा ऐकूनही नव्याने ऐकण्याची इच्छा संपत नाही, असा अनुभव या कलावतीने अखंडपणे दिला. चित्रपट संगीत म्हणजे गीतकार, संगीतकार, सहगायक, संगीत संयोजक, वाद्यवादक या सगळय़ांच्या प्रतिभांचा संगम. प्रत्येकाच्या सर्जनाने परिपूर्णतेचा घेतलेला ध्यास हे त्या संगीताचे खास वैशिष्टय़. लताबाईंचे वेगळेपण असे की, त्यांनी या सगळय़ांना बरोबर घेऊन केवळ आपल्या स्वरांनी त्या कलाकृतीला आणखी उंचीवर पोहोचवले. संगीताचे हे अजब रसायन त्यामुळेच कित्येक दशके कानामनांत रुंजी घालत राहिले. स्वर कालातीत असतात. त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्याच्या चौकटीत बांधून ठेवता येत नाही. लता मंगेशकर या सम्राज्ञीने या स्वरांनाही अर्थ प्राप्त करून दिला. जगण्याचे सारे अर्थ स्वरांच्या चिमटीत पकडण्याची किमया या देशाला कृतार्थ करणारी आहे. कलावंताला इतके भरभरून प्रेम मिळणे आणि त्या प्रेमाची उतराई होण्यासाठी प्रत्येक क्षण वेचण्याचे मनोधैर्य अंगी असणे, हा योग दुर्लभ. लताबाईंसाठी मात्र हा सहजयोग होता. गाणे म्हणजे काय? ती फक्त कंपने. पण हवेतून आपल्यापर्यंत येणाऱ्या या अदृश्य कंपनांवर लता मंगेशकर यांची स्वरस्वाक्षरी उमटली की ती अमूर्त कंपने सोन्याची होत आणि त्यांना अमरत्व मिळे. हा अनुभव गेली आठ दशके आपण घेत राहिलो. तो यापुढेही मिळेल. पण तो देणारी व्यक्ती आपणात नसेल. आपल्या निकटवर्तीयांच्या जाण्याने आपल्याही अस्तित्वाचा काही अंश जात असतो. त्या अस्तित्वाचा मोठा हिस्सा लताबाईंबरोबर आपण गमावलेला असेल. तेव्हा लताबाई गेल्या म्हणजे नक्की काय झाले? सहस्रस्वरांनी तो अनुभव देणाऱ्या लताबाई आणि आपण यातील नक्की नाते काय? हा प्रश्न पडतो कारण या नात्यास केवळ गायक आणि श्रोता इतकेच अल्पजीवी परिमाण नाही. हे नाते जसे आणि जितके कालातीत तसे आणि त्यापेक्षाही अधिक ते शब्दातीत. गुलजारजी म्हणतात त्याप्रमाणे यास शब्दांनी स्पर्श करून ‘रिश्तों का इल्जाम’ न देणेच बरे. आता तर ‘सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो’ हेदेखील सत्यात आणावे लागणार. ही जखम वागवण्याखेरीज पर्याय नाही. त्या वेदनेस ‘लोकसत्ता’ परिवाराची मानवंदना !