काँग्रेस राजकीयदृष्टय़ा जेव्हा अजेय होती तेव्हा ज्याप्रमाणे बेगडी सेक्युलरांचे पेव फुटले होते त्याप्रमाणे भाजपच्या विद्यमान यशामुळे नवहिंदूंची लाट आली आहे.

सलमान खुर्शीद उच्चविद्याविभूषित आहेत. काँग्रेसच्या काही नेमस्त नेत्यांत त्यांची गणना होते. आक्रस्ताळी भाषा वा नेतृत्व यासाठी ते ओळखले जातात असेही नाही. त्यामुळे त्यांच्या ताज्या पुस्तकात हिंदुत्ववाद्यांची तुलना ‘आयसिस’ या अमानुष, हिंसक, अत्याचारी संघटनेशी केली त्याची संभावना ‘बालिश बहु बडबडला’ अशी करता येणार नाही. ‘सनराइज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स’ हे त्यांच्या नव्या पुस्तकाचे नाव. ‘लोकसत्ता’ने त्याचे परीक्षण, मूल्यमापन करण्याआधीच त्यातील एका वाक्यावरून हा वाद उफाळला.  ग्रंथ न वाचताच त्यावर भाष्य करणाऱ्याची गणना समर्थ रामदासांनी मूर्खात केलेली आहे  याचे भान असल्याने त्यांच्या सदर पुस्तकास दूर ठेवून त्यांचे हे वक्तव्य, ते प्रसिद्ध झाल्याने चेकाळलेल्या चॅनेलीय चर्चा, त्यावर खुर्शीद यांचा खुलासा याचा समाचार घेणे आवश्यक ठरते. याचे कारण दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे अघोषित वा भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘हिंदू धर्म आणि हिंदुत्व’ असा एक शब्दच्छल करायचा प्रयत्न केला. त्यांच्या मते ‘हिंदू धर्म’ हा सहिष्णू आहे आणि ‘हिंदुत्व’ तसे नाही. ते प्रतिगामी आणि आक्रमक आहे. या दोहोंच्या भाष्यांमागील विचारांतील साम्यस्थळे आणि इतिहासाचे अज्ञान हे समान असल्याने यानिमित्ताने संबंधितांस आणि त्यावरील उभय बाजूंच्या अज्ञानी भाष्यकारांस ऐतिहासिक वास्तवाच्या कटू मात्रेचे चार वळसे चाटवणे गरजेचे आहे.

प्रथम खुर्शीद यांच्या विधानाबाबत. ते धादांत अनऐतिहासिक अशासाठी ठरते की मुदलात इस्लाम आणि हिंदू धर्माच्या स्थापनेमागील उद्दिष्टेच भिन्न आहेत. हिंदू धर्माचा एक असा कोणी स्थापक नाही आणि त्यामुळे त्याचे एकच एक विशिष्ट उद्दिष्ट, ध्येय वा धर्मग्रंथ नाही. ख्रिस्तपूर्व १५००च्या आगेमागे या धर्माच्या इतिहासाची सुरुवात असावी असे मानले जाते. त्या तुलनेत इस्लाम हा अगदीच नवा म्हणता येईल असा धर्म. मक्का-मदिनेत सातव्या शतकात प्रेषित महंमदाकडून त्याची स्थापना झाली. समस्त जग इस्लामी करणे हे त्यानेच घालून दिलेले उद्दिष्ट. असे हिंदुत्वाविषयी कधीही झाले नाही. हिंदू धर्माचा प्रसार करणे हा असा कोणी ‘प्रेषित’ या धर्मात नसल्याने हिंदूंचा विचार आणि प्रयत्न नव्हता. समस्तांस इस्लामी करणे हेच ध्येय असल्याने अंध इस्लामींनी मिळेल त्या मार्गानी धर्मप्रसाराचा प्रयत्न केला आणि त्यातून तो कमालीचा हिंसक बनला. संपूर्ण मानवजातीचे केवळ इस्लामीकरण केल्याने सर्व प्रश्न सुटतील अशा विचारशून्यतेतून या धर्मात एकाहून एक अतिरेकी संघटना निपजल्या. मुळातील उद्दिष्टच इतके क्षुद्र असल्याने या संघटना चालवणारी माणसे त्याहून क्षुद्र निघाली आणि अमानुष अत्याचार करती झाली. ‘आयसिस’ हे त्याचे ताजे उदाहरण. या सर्वास इस्लामी करून पुढे करायचे काय याचा कोणताही विचार करण्याइतकी अक्कल त्यांजजवळ नव्हती आणि नाहीही. केवळ धर्माने प्रश्न सुटत असते तर आज इस्लामी जगात जन्नत नांदती. प्रत्यक्षात तेथे काय परिस्थिती आहे, हे सांगण्याची गरज नाही. सुदैवाने हिंदुत्वाचे असे झाले नाही आणि धर्मप्रसार हे या धर्मीयांचे अलीकडेपर्यंत तरी उद्दिष्ट राहिले नाही. या धर्माच्या आद्य धुरीणांस मानवी प्रगती आणि उन्नती यांचा ध्यास होता. इस्लामचा पायाच हा पूर्ण भावनिक होता. हिंदू धर्मास आरंभी तरी बौद्धिक अधिष्ठान होते. म्हणूनच हिंदू  धर्माच्या कडव्या टीकाकारांसही या धर्मात दार्शनिकाचे मानाचे स्थान मिळाले.

याचे भान काँग्रेसी नेत्यांस अलीकडेपर्यंत होते. त्यामुळे पाश्चात्त्य जीवनशैलीवादी असूनही पं. नेहरू यांच्या अंगावर गंगादर्शनाने रोमांच येत आणि तसे व्यक्त होणे म्हणजे हिंदुत्ववादी असे ते मानत नसत. इतकेच काय भारतीय समाजमनावरील राम-कृष्ण यांचा प्रभाव नमूद करण्यात समाजवादी विचारसरणीचे अध्वर्यू राम मनोहर लोहिया यांसदेखील हिंदुत्ववादी ठरवले जाण्याची भीती वाटत नसे. त्यांचे याबाबतचे लिखाण जिज्ञासूंनी मुळातच वाचावे. इंदिरा गांधी यांचेही गंगाप्रेम सर्वश्रुत होते आणि ती शुद्ध करण्याची गरज राजीव गांधी यांनाच प्रथम वाटली. फक्त त्यांनी वा या सर्वानी आपल्या गंगाप्रेमाचे बटबटीत प्रदर्शन कधी केले नाही. कारण ‘सेक्युलर’चा खरा अर्थ या सर्वाच्या जगण्याचा भाग होता आणि पृथ्वीवरील कोणत्याही धर्मात ‘गर्व से कहो’ असे काहीही नाही आणि असेल तर प्रत्येक धर्मीयांना आपापल्या धर्माबाबत तसे वाटू शकते हे ते जाणत. दुर्दैवाने राजीव गांधी यांच्याच बेसावध अयोध्या कृतीने धर्म हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. त्यामुळे नेत्यांचीही हिंदुत्ववादी वा विरोधक अशी विभागणी झाली. वास्तविक रा.स्व. संघाचे संस्थापक हेडगेवार वा अलीकडे हिंदुत्ववाद्यांनी ‘आपले’ मानलेले मदनमोहन मालवीय आदी मंडळी काँग्रेसचीच अपत्ये. आपल्या पक्षाचे नेते अल्पसंख्याकांस झुकते माप देतात असे वाटल्याने ही मंडळी या पक्षातून बाहेर पडली आणि त्यांनी विविध संघटना काढल्या. खरा इतिहास असा की काँग्रेसचे जन्मवेळचे स्वरूपच मुळात उच्चभ्रू एतद्देशीयांची संघटना असे होते. आज अनेकांस विसर पडला असल्याने हे सांगावयास हवे की त्या संघटनेस ‘काँग्रेस’ हे नाव दिले ते हिंदू धर्माचे गाढे भाष्यकार, प्रकांडपंडित न्या. महादेव गोविंद रानडे यांनी. त्यांच्या बुद्धिवैभवाचे अफाट कौतुक पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते ही बाबही सांप्रतकाळी लक्षणीय. अलीकडे सरदार पटेलांस ‘आपल्याकडे’ ओढण्याचा आटोकाट प्रयत्न हिंदू धर्मीय नेते वा संघटना यांच्याकडून होतो. पण सरदार कधीही हिंदुत्ववादी नव्हते. रा.स्व.  संघाविरोधात ठाम कारवाई त्यांनीच केली होती आणि उलट अखंड भारत टिकविण्यासाठी मुसलमानांस विभक्त मतदारसंघ, विशेष अधिकार, राखीव जागा इत्यादी देण्याची त्यांची तयारी होती. नरहर कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे ‘सर्व मुसलमानांस पाकिस्तान मिळाल्यानंतरसुद्धा बरोबरीचे अधिकार असावेत यावर त्यांनी कधीही खळखळ केली नाही’.

अलीकडे हिंदू तेवढे राष्ट्रभक्त आणि अन्य, विशेषत: मुसलमान, राष्ट्रद्रोही अशी बिनडोक मांडणी फारच जनप्रिय झाल्याचे दिसते. म्हणून काश्मिरी राजकारणी फुटीरतावादी आणि हिंदू सर्व राष्ट्रवादी असे सुलभीकरण होते. वास्तविक या भूमीचा इतिहास असा की रामस्वामी मुदलियार हे हिंदू धर्मीय होते आणि तरीही आपले त्रावणकोर संस्थान भारतात विलीन करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्या वेळी काश्मीरचे राजे, पंतप्रधान, इतकेच काय अनेक लहानमोठे संस्थानिकही हिंदूच होते. सरदार त्याही वेळी या व अशा हिंदूंविरोधात ठामपणे उभे राहिले. याच अंगाने आता सलमान खुर्शीद यांचा जाहीर निषेध प्रथम करणारे गुलाम नबी आझाद हे खुर्शीद यांचे समधर्मी आणि काश्मिरी आहेत ही उभय धर्मातील चटपटीत चतकोर चर्चाकारांनी लक्षात घ्यावी अशी बाब. राहुल गांधी यांनीही ती लक्षात घ्यायला हवी. याबाबत भाष्य करताना राहुल गांधी यांचा नेम चुकला, असे म्हणावे लागते. याचे कारण त्यांच्या टीकेचे लक्ष्य असलेले अलीकडचे ‘नवहिंदू’ आहेत, खरे हिंदू नाहीत. काँग्रेस राजकीयदृष्टय़ा जेव्हा अजेय होती तेव्हा ज्याप्रमाणे बेगडी सेक्युलरांचे पेव फुटले होते त्याप्रमाणे भाजपच्या विद्यमान यशामुळे ही नवहिंदूंची लाट आली आहे. बेगडी आणि बाटगे हे नेहमीच अतिरेकी आक्रमक असतात हे सत्य लक्षात घेतले की या नवहिंदुत्ववादी आक्रमकतेचा अर्थ लागेल. त्या वेळी राजकीय समीकरणांच्या रेटय़ात ‘सेक्युलर’चे विकृतीकरण झाले. आता ते ‘हिंदुत्व’ या संकल्पनेचे होताना दिसते.

अशा वेळी बुद्धी आणि विचारक्षमता शाबूत असणाऱ्यांनी तरी टोकाची भूमिका, विधाने करणे टाळायला हवे. कारण त्यामुळे उभय बाजूंच्या अतिरेक्यांचे तेवढे फावते. धर्मातिरेक हा अविचारींस आकृष्ट करण्याचा सोपा मार्ग असतो आणि एकाने केले म्हणून दुसराही तोच मार्ग निवडतो. यातून मनोरंजन तेवढे होते. पण उभय धर्मीय जनता मागासच राहते. हा इतिहास आणि हेच वर्तमानही. तेव्हा जनानुनयासाठी उभय बाजूंनी अजून किती धर्मच्छल होणार, हा खरा प्रश्न. विकासाच्या वाटेने जाण्यासाठी धर्माची गरज लागावी यातच मुळात अविकसितता आहे. त्याचा विचार व्हावा.