हावभाव, नेत्रपल्लवी, हालचालीतील लयीचे भान, तालबद्ध पदलालित्य अशा सर्व गुणांनी मंडित झालेले बिरजू महाराज यांचे नृत्य जनसामान्यांना अभिजात अनुभव देई..

जीवनातील सगळे रंग कलात्मकरीत्या उधळण्याची रसिली वृत्ती असणारे कलावंत अशी पंडित बिरजू महाराज यांची खरी ओळख. नृत्य, गायन, कविता, चित्रकला अशा कलांच्या अनेक अंगांनी बिरजू महाराजांनी आपले सारे आयुष्य समृद्ध करता करता जनसामान्यांनाही संपन्न केले. कथ्थक या नृत्यशैलीत लखनऊ, बनारस आणि जयपूर ही तीन ठळक घराणी. प्रत्येकाच्या गोष्ट सांगण्याच्या शैलीत फरक असला तरी ‘कथा कहे सो कथक कहलावे’ ही उक्ती मात्र रसपूर्णतेने सार्थ ठरवणारी.  कथा सांगायची, तर ती साभिनय आणि स्वरलयीच्या सान्निध्यातच, हे तर कथ्थकचे वैशिष्टय़. ते लखनऊ घराण्याच्या बिरजू महाराजांनी नेमके ओळखले होते. वैष्णवांच्या काळातील हे नृत्य कालानुरूप बदलत गेले. त्यावर भवतालातील सगळय़ा सामाजिक आणि राजकीय घडामोडींचाही परिणाम झाला, त्यामुळे मोगलांच्या काळात ही नृत्यशैली नव्या कलात्मक दृष्टीला आपलेसे करत बदलत गेली. धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन ऊँचा दरबारात प्रवेश झाला. तिथून ती थेट हवेली संगीतात पोहोचली आणि नंतरच्या काळात ती जनसामान्यांसमोर सादर होत कमालीची लोकप्रिय झाली. या लोकप्रियतेचे खऱ्या अर्थाने श्रेय पं. बिरजू महाराजांना द्यायला हवे. भारतीय कलांच्या व्यापक पटलावरील त्यांची ही कामगिरी जेवढी महत्त्वाची, तेवढीच, या कलेची अभिजातता जराही ढळू न देता, तिला तिची स्वत:ची नवी वाटावळणे शोधण्यास प्रवृत्त करण्यासाठीची त्यांची धडपडही लक्षात घेण्याजोगी. संगीत आणि नृत्य या भारतीय कला गुरूच्या अस्तित्वाशिवाय साध्य करता येत नाहीत. शिकणाऱ्याला आपण जे करीत आहोत, ते बरोबर की चूक हे समजण्यासाठी समोर प्रत्यक्ष गुरूच हवा. त्याने केलेल्या कलेच्या आराधनेतून आलेल्या अनुभवाचे साक्षात दर्शन शिक्षण घेताना होणे हा खरा गुरूचा स्पर्श. बिरजू महाराज यांनी आयुष्यभर अनेक शिष्यांना ही कला हातचे न राखता भरभरून दिली. आपली कला शिष्यांपर्यंत पोहोचवता येणे हे आयुष्यातील खरे समाधान आहे, ही त्यांची भावना होती.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?

विश्वात भरून राहिलेल्या लयतत्त्वाला मूर्तरूप देणाऱ्या नृत्यकलेला अपूर्व सौंदर्याच्या कोंदणात बसवण्यासाठी कमालीची प्रतिभा हवी. सभोवतालाचे बारीक निरीक्षण हवे आणि त्याचे कलात्मक रूपांतर करण्याची क्षमताही हवी. ज्या क्षणी मानवाला आपल्या याच हातांची सहजपणे झालेली लयबद्ध हालचाल लक्षात आली असेल, तो मानवाच्या जीवनातील सौंदर्याच्या अनुभूतीचा क्षण असला पाहिजे.  ही जाणीव त्याच्या जगण्याशी निगडित होत जाणे आणि त्याचा जगण्याशी थेट संबंध जोडला जाणे, ही त्यानंतरची स्वाभाविक घटना. गळय़ातून येणाऱ्या स्वरांच्या मदतीने किंवा रंगरेषांच्या साह्यने सौंदर्यनिर्मिती करताना आपले संपूर्ण शरीर हेच या निर्मितीचे साधन करून नृत्याची संकल्पना साकार करण्याची मानवाची सर्जनक्षमता त्याचे जगणे पार बदलून टाकणारी होती. बिरजू महाराज यांना याची पुरेपूर जाणीव होती.  वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षांपासून संगीत आणि नृत्य हेच आपले जीवन असेल, अशी खूणगाठ बांधून, आपले सारे आयुष्य समर्पित करून त्यांनी आपल्या प्रत्येक आविष्कारातून लयीचे, तालमात्रांचे आणि त्यांना संगत करणाऱ्या स्वरांचे असे काही देखणे ताजमहाल उभे केले की त्याचे दर्शन घेताना प्रत्येकाला जगणे कळल्याचीच जाणीव व्हावी. भारतीय कलाजगतात बिरजू महाराजांनी आपल्या या अभिजात कलात्मक जाणिवा ज्या उत्कटतेने सादर करून समस्तांना चंद्रमाधवीच्या प्रदेशाचीच सफर घडवून आणली.

जे करायचे आहे, त्यावर प्रेम असायला हवे. तरुणपणी बिरजू महाराज अंधारात घुंघरू बांधून तासन् तास रियाज करत. फक्त घुंघरांचा आवाज आणि शरीराची सळसळ एवढेच. हा रियाज शारीरक्षमतेचा नव्हता. तर मनाच्या आतल्या गाभाऱ्यात काय आणि किती पोहोचत आहे, याचा होता. शहनाईसम्राट बिस्मिल्ला खान त्यांना एका म्हणाले होते की, मंचावरील तुझे नुसते उभे राहणेही माझ्या डोळय़ात आनंदाश्रू उभे करते. गोपींना आपल्या अवखळ लीलांनी बेज़ार करणाऱ्या कृष्णाने त्यांच्यावर एक छोटासा खडा मारण्याच्या त्यांच्या अभिनयानेही समोरचे प्रेक्षक क्षणभर दचकून जात. महाराज जेव्हा रंगमंचावर नृत्य सादर करत, तेव्हा, ते पाहणाऱ्याला कृष्ण, राधा आहेत, असाच भास होई. ही किमया केवळ नृत्यदर्शनाची. कथ्थक नृत्यात पदन्यासाला फ़ार महत्त्व. पायाला बांधलेल्या घुंघरांमधून लयदार आणि सौंदर्याने भारलेल्या नादाचा आविष्कार करणे, ही नर्तकाची खरी परीक्षा. पायात कितीही घुंघरू असले, तरीही एकाच घुंघराचा आवाज ऐकवता येण्याएवढे पावलांवरील नियंत्रण ही त्याची अंतिम सीमा. हावभाव, नेत्रपल्लवी, हालचालीतील लयीचा न सुटणारा पदर, पदलालित्य आणि कायिक अभिनय, अशा सर्व गुणांनी मंडित झालेले बिरजू महाराज यांचे नृत्य ही प्रेक्षकांसाठी अक्षरश: पर्वणी असे.

अभिजाततेशी कधीही काडीमोड न घेता, अन्य कोणत्या कलाप्रकारांशी कुरघोडीचे राजकारण न करता, केवळ गुणात्मकतेच्या आधारे कथ्थक लोकप्रिय करण्यासाठी बिरजू महाराजांनी केलेले प्रयत्न मोलाचे होते. गेली नव्वद वर्षे मुख्य प्रवाहातील भारतीय चित्रपटाचा नृत्य हा अतिशय महत्त्वाचा आधार राहिला आहे. गोपीकृष्ण यांच्यासारख्या नर्तकाने त्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीयच. चित्रपटांमुळे नृत्यदर्शन अधिक विशाल रूपात साकार झाले. त्याची लोकप्रियता अधिक वाढली आणि त्यामुळे होणारा आनंद लाखोंपर्यंत पोहोचला. बिरजू महाराजांनीही चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले. ती नृत्ये लोकप्रियही झाली, परंतु त्याचे वेगळेपण एवढेच नाही. चित्रपटाची गरज म्हणून त्यांनी आपल्या कलात्मक दृष्टीशी कुठेही तडजोड होऊ दिली नाही.  आजकालच्या नृत्यकवायतींपेक्षा नृत्यातील सर्जनाचा आनंद अधिक वरचा, याची जाणीव पुढील पिढीतही पोहोचवण्यासाठी बिरजू महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत जे प्रयत्न केले, ते अधिक नेमके होते. दिल्लीतील त्यांच्या गुरुकुलात नृत्य शिकण्यासाठी येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी केवळ नृत्य आणि त्यातील बारकावे शिकवले नाहीत. त्या सगळय़ांना जगण्यातील सौंदर्याची अनुभूती दिली. वडील अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज (म्हणजे ‘मुगल-ए-आजम’मधील ‘मोहे पनघट पे नंदलाल’ या अजरामर ठुमरीवर मधुबालास नृत्य दिग्दर्शन करणारे) अशा त्या काळातील दिग्गज कलावंतांच्या घरात जन्मलेल्या महाराजांनी आयुष्यभर केवळ सौंदर्याची पूजा केली. पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, कालिदास सन्मान यासारखे सन्मान म्हणजे त्यांच्या कलाजीवनाची फलश्रुती नव्हे. अतिशय सहजपणे ‘तिहाई’ घेत समेवर येताना मिळणारी ती उत्स्फूर्त दाद होती. ‘‘नृत्याविष्कार हा परमेश्वराशी नाते सांगणारा हवा. तसा तो असेल तर तो केवळ चित्रपटात आहे म्हणून त्यात मला सहभागी व्हायला, दिग्दर्शनास काही कमीपणा वाटत नाही. पण उगाच उत्तान, देहप्रदर्शन करणे म्हणजे नृत्य नव्हे’’ असे बिरजू महाराज मानत. त्यामुळे दीपिका पदुकोणला ‘बाजीराव-मस्तानी’तील ‘मोहे रंग दो लाल’साठी किंवा त्याआधी नवीन ‘देवदास’मध्ये माधुरी दीक्षित हिला ‘काहे छेड मोहे’ या ठुमरीसाठी मार्गदर्शन करण्यात बिरजू महाराजांना आनंद-अभिमानच होता. उलट बिरजू महाराजांच्या स्पर्शामुळे या दोन्ही ठुमऱ्या आणि दोन अभिनेत्रींचे त्यावरील सादरीकरण यांची उंची वाढली. त्यांच्या जाण्याने या नृत्यप्रकारावर प्रेम करणाऱ्यांची भावनाही ‘काहे छोड मोहे.. ’ अशीच झाली असणार. या

अभिजात कलाकारास ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.