scorecardresearch

Premium

आधी आणि नंतर..

या शतकात जन्मलेल्या कुणाला या नावाचा महिमा आणि त्याची जादू कदाचित लक्षातही येणार नाही,

आधी आणि नंतर..

चित्रपटांत अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील रेष अन् रेष जशी दिसते, तसाच त्याचा आवाजही अतिशय स्पष्टपणे पोहोचतो; या नव्या तंत्राचे भान भारतास देणारे दिलीपकुमार पहिले..

भारतात अभिनयाच्या शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या किती तरी दशके आधी दिलीपकुमार यांनी भारतीय चित्रपटांतील ‘अभिनय विद्यापीठा’चे कुलगुरुपद पटकावले होते. सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि पूर्णविरामी कारकीर्दीनंतरही तीन दशके हा अभिनेता आपला आब राखून होता आणि त्याच्या अभिनयाची ताकद, चित्रसृष्टीत येणाऱ्या प्रत्येक उमद्या कलाकारासाठी आदर्श मानली जात होती. दिलीपकुमार यांच्या अभिनयाने भारतीय चित्रसृष्टीचा रंग आणि नूर बदलून गेला आणि त्याच्या मांडणीपासून ते त्यातील आशयापर्यंत सगळ्याच घटकांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे त्यांच्यासारखा अभिनय करता यावा, यासाठी त्यानंतरच्या प्रत्येक पिढीतील बहुतेक अभिनेत्यांनी भरपूर कष्ट घेतले. चित्रपटासारख्या माध्यमात अभिनय कसा करता येऊ शकतो आणि करायला हवा, याचे एक अभिजात उदाहरण दिलीपकुमार यांच्या रूपाने उभे राहिले. पण दिलीपकुमार आणि अन्य यांत एक फरक कायमच राहिला. अन्य अनेकांस- अर्थात अलीकडचे नसिरुद्दीन शहा, इरफान खान, मनोज बाजपेयी, पंकज कपूर वा पंकज त्रिपाठी आदी सन्माननीय अपवाद वगळता- अभिनय ‘करावा’ लागतो. दिलीपकुमार भूमिका साकारत, अभिनय ओघाने होई. नसरीन मुन्नी कबीर यांनी दिलीपकुमार यांच्यावरील माहितीपटात उल्लेखल्याप्रमाणे दिलीपकुमार आणि इतर यांतील फरक हा ‘डूईंग’ आणि ‘बीईंग’ यातला फरक होता.

Santacruz murder case
सांताक्रुझ हत्येप्रकरणी आरोपीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
sai paranjpye to direct new play again
सई परांजपे पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; नव्या नाटकाचा दसऱ्याला मुहूर्त
kidnapping of minor girl
१५० सीसीटीव्ही निरीक्षणातून अपहरणाचा छडा; ४ वर्षीय चिमुरडीची सुटका, आरोपीला अटक
4 year child beat with horrific cigarette burns
धक्कादायक! ‘दोन्ही मुले माझी नाहीत’,असे म्हणत चिमुकल्याला द्यायचा सिगारेटचे चटके

या शतकात जन्मलेल्या कुणाला या नावाचा महिमा आणि त्याची जादू कदाचित लक्षातही येणार नाही, परंतु आज नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाला, येथील आजचे बुजुर्ग ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहायला सांगतात, ते नाव दिलीपकुमार यांचे असते. आजच्या पाकिस्तानातील पेशावर येथे जन्मलेल्या युसूफ खान यांनी आपले नशीब अजमावण्यासाठी त्या काळातील मुंबईतील ‘स्टुडिओ’ नामक कंपन्यांच्या दारात कधी हेलपाटे घातले नाहीत. सगळे आपोआप जमून आले आणि आलेल्या रुपेरी संधीचे त्यांनी अक्षरश: सोने केले. मुंबईच्या खालसा महाविद्यालयात राज कपूर हा त्यांचा सहाध्यायी होता. हे दोघे महाविद्यालयीन मित्र. पण त्यांना चित्रपटात आणण्याचे श्रेय देविकाराणी यांचे. युसूफ खान यांना दिलीपकुमार करण्याचे श्रेयही त्यांचेच. ‘ज्वार भाटा’ या १९४४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने या अभिनेत्याकडे कुणाचेच फारसे लक्ष गेले नाही. त्या वेळचे विख्यात चित्रपट समीक्षक बाबूराव पटेल यांनी ‘ज्वार भाटा’तील दिलीपकुमारची यथेच्छ रेवडी उडवली. ‘‘याला पुढचा चित्रपट देण्याआधी कोणी खायला घालायला हवे,’’ हे त्यांचे दिलीपकुमारांच्या पहिल्या पडद्यावरच्या दिसण्याचे वर्णन. खरा कलाकार हा समीक्षकांना नेहमी पालथे पाडतो. दिलीपकुमार यांनी तितकेच केले नाही. सर्व समीक्षकांना त्यांनी चारीमुंडय़ा चीत केले. पुढच्याच त्यांच्या ‘जुगनू’ या चित्रपटाने दिलीपकुमार यांचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. पण दिलीपकुमार हे दिलीपकुमार झाले मेहबूब खान यांच्या ‘अंदाज’मुळे. एका बाजूला नर्गिस आणि दुसरीकडे कोवळा, उत्फुल्ल राज कपूर आणि त्यांच्यासह कोवळाच पण पोक्त दिलीपकुमार हा त्रिवेणी संगम १९४९ सालातला. आणखी तीन वर्षांनी त्यास ७५ वर्षे होतील. पण या संगमावर चित्रपट चाहत्यांचा कुंभमेळा आजही तितक्याच उत्साहाने भरतो. त्यातला या तिघांचा घरातल्या जिन्यावरचा प्रसंग वा दिलीप (चित्रपटात त्यांच्या व्यक्तिरेखेचे नावही दिलीपच आहे) आपल्यावर प्रेम करतो हे कळल्यावर विवाहित नर्गिसचे कासावीस होणे, ‘आज की रात अजीब है..’ अशा साध्या संवादातून कमालीची परिणामकारकता आपल्यापर्यंत पोहोचवणारे दिलीपकुमार या सगळ्या रसिकांच्या मर्मबंधातल्या ठेवी. अशातील सगळ्यात मखमली म्हणजे ‘तराना’मध्ये हुशार करारी डॉक्टर दिलीपकुमारसमोर वेंधळ्या मधुबालाचे गडबडणे आणि बडबडणे. यातले दिलीपकुमार यांचे दिसणे प्रत्येक तरुणासाठी जीव लावणारे (आजही) आणि त्यातील मधुबालाचे दिसणे जीव घेणारे- अर्थातच आजही. हा ‘तराना’ स्वातंत्र्यानंतरच्या चार वर्षांतला आणि त्यानंतर तीन वर्षांनी याच दोघांचा ‘अमर’. पण हे दोघे अनेकांच्या लक्षात राहतात ते ‘मुगल-ए-आझम’साठी. पण हे म्हणजे म्हैसूरचे वृंदावन गार्डन लक्षात ठेवण्यासारखे. प्रत्यक्षात अशी बाग बांधण्याचे स्वप्नही आपण पाहू शकत नाही. तसाच ‘मुगल-ए-आझम’मधला सलीम, त्याचे मागे वळून पाहणे वगैरे सर्वोत्तमच. ते ठीक. तो केवळ इतिहासातील. पण ‘नया दौर’मध्ये ‘उडे जब जब ज़ुल्फे तेरी’ गाताना ‘पानी लेने के बहाने आजा..’ असे सरळ सांगणारा दिलीपकुमार आपल्या ‘बस की बात’ वाटतो (या गाण्यातील ‘जब ऐसे चिकने चेहरे’ म्हणताना दिलीपकुमार यांच्या हाताच्या हालचाली गरजू आणि दारिद्रय़रेषेखालच्या अभिनेत्यांनी आवर्जून पाहाव्यात). या अथवा ‘गंगा जमुना’मधल्या ‘नैन लड जई है’ या गाण्यातले त्यांचे नाचणे आजही नायकाच्या नर्तनातले पायाभूत सत्य बनून गेले आहे. या दोन्ही चित्रपटांत वैजयंतीमाला(च) होत्या या वेदनेवर दिलीपकुमार फुंकर घालतात.

भारतीय चित्रपट बोलू लागला, तरीही त्यामध्ये अभिनय करणाऱ्या नटांचा संच नाटकांमधूनच आलेला होता. त्यामुळे बटबटीत म्हणता येईल, अशा अभिनयाने सुरुवातीचे सगळेच चित्रपट उभे राहात होते. तेव्हा चित्रपटातील कलावंतांनाच गायनही करावे लागत असे, कारण चित्रपटाच्या फिल्मवर आवाजाची वेगळी ध्वनिपट्टी निर्माण करण्याचे तंत्रज्ञान अवतरले नव्हते. पार्श्वध्वनिमुद्रणाचे हे तंत्रज्ञान आले, तेव्हा अभिनय मोकळा झाला. या नव्या माध्यमात अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेष अन् रेष जशी दिसते, तसाच त्याचा आवाजही अतिशय स्पष्टपणे पोहोचतो. या नव्या तंत्राचे भान येणारे दिलीपकुमार हे पहिले अभिनेते. त्यांनी आपल्या आवाजाची पट्टीच मुळी खालची ठेवली. उंच आवाजात बोलण्याची आवश्यकता नाही हे जसे त्यामागील कारण होते, तसेच, या पट्टीतील आवाजाने चेहऱ्यावरील अभिनयाची खुमारी अधिकच वाढते, असे त्यांचे सूत्र होते. सगळेच प्रयोगाच्या पातळीवर असताना, एक मानदंड प्रस्थापित करण्याचा हा मान दिलीपकुमार यांनी मिळवला. ‘उत्कट प्रसंगी शिरा ताणून, गगनभेदी आवाजातील अभिनयाची अजिबात गरज नसते, त्याऐवजी पुटपुटले तर उलट समोरचे कानात तेल ओतून ऐकतात,’ हा त्यांचा सिद्धांत होता. तो त्यांच्या अभिनयात शेवटपर्यंत दिसतो. अत्यंत संयत अभिनय हे त्यांचे कायमचे वैशिष्टय़ राहिले. ‘प्रेक्षकांना भरपूर द्यायचे. पण ते दिल्यानंतरही अभिनेत्याकडून आणखी काही हवेहवेसे त्यांना वाटायला हवे’ हे त्यांच्या अभिनयाचे सूत्र. रुपेरी जगात त्याच काळात वावरत असणाऱ्या आणि तेवढय़ाच लोकप्रिय असलेल्या राज कपूर, देव आनंद यांच्यासारख्या अभिनेत्यांनाही त्यांचा हेवा वाटावा, अशा दिलीपकुमार यांनी आपल्या जवळपास सहा दशकांच्या कारकीर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका साकार केल्या. गंभीर ते अवखळ आणि विनोदी म्हणता येतील अशा अनेक चित्रपटांना तिकीट खिडकीवर अमाप यश मिळाले, परंतु तरीही त्यांची ओळख शोकात्म नायक अशीच राहिली. ‘देवदास’ ही त्यांची ओळख त्यांच्याबरोबर सावलीसारखी राहिली आणि त्यांनीही या प्रतिमेचा कधी अव्हेर केला नाही. हे शोकात्मपण त्या वेळी त्यांच्या फारच मानगुटीवर बसले आणि त्याचा त्रास होऊ लागल्यावर तो संपवण्यासाठी त्यांनी काही काळ ठरवून विनोदी चित्रपट केले.

साठ व सत्तर या दोन दशकांत रुपेरी पडद्यावर अनभिषिक्तपणे वावरणाऱ्या दिलीपकुमार यांच्या मागे यश धावत होते. नया दौर, उडन खटोला, मधुमती, दाग, मुगल-ए-आझम, गंगा जमुना यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्या काळातही अभिनेता हे वर्णन त्यांनाच लागू पडते. कारण त्यांना तो ‘करावा’ लागला नाही कधी. दुसरे म्हणजे उत्तम अभिनेताही प्रचंड लोकप्रिय होतो असा भारतीय चित्रपटसृष्टीचा मानदंड त्यांनी निश्चित केला. १९४४ मध्ये सुरू झालेली कारकीर्द १९९८ मध्ये थांबली. तरीही दिलीपकुमार यांच्यामागे असलेले अभिजात अभिनयाचे वलय जराही कमी झाले नाही. १९७० नंतरच्या दहा वर्षांत भारतीय चित्रपट बदलत होता आणि प्रेक्षकांची रुचीही बदलत होती. हा बदल लक्षात घेत या अभिनेत्याने ऐंशीच्या दशकात नव्या दमाने पुनरागमन केले आणि आपले अढळस्थान अधिक पक्के केले. क्रांती, विधाता, मशाल, कानून अपना अपना, कर्मा, सौदागर यांसारख्या चित्रपटांतून दिलीपकुमार यांनी चरित्र अभिनेता म्हणून आपल्या अभिनयाची ताकदही सिद्ध केली. एवढय़ा प्रदीर्घ कालावधीत या अतिशय फटकळ चित्रसृष्टीत संख्येने अतिशय कमी परंतु दर्जाने खूप वरचे चित्रपट दिलीपकुमार यांनी केले. केवळ पैसा आणि प्रसिद्धीमागे धावण्यापेक्षा आपल्या कलेवर अधिक ममतेने प्रेम करणारा हा कलावंत नंतरच्या अनेक पिढय़ांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभासारखा उभा राहिला! त्यांचा घनगंभीर आवाज आणि चेहऱ्यावरील प्रत्येक रेष, शरीराची प्रत्येक हालचाल हा अभिनयाच्या शाळेतील वस्तुपाठ ठरला आहे.

त्यांच्याविषयी सांगावे तितके कमीच. पण ते सांगताना चित्रपटांची जंत्री वगैरे देण्याची काही गरजच नाही. दिलीपकुमार तसेही लक्षात राहतात. एखाद्याच्या कार्याचे, अस्तित्वाचे महत्पण कालगणना त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर अशी असे होण्यात असते. हिंदी चित्रपटांचा इतिहास असा दिलीपकुमार यांच्या आधीचे चित्रपट आणि नंतरचे असा विभागला जाईल. हे अत्यंत वास्तववादी वर्णन अमिताभ बच्चन यांचे. यापेक्षा मोठी श्रद्धांजली असू शकत नाही. संजीवकुमार, अमिताभ ते इरफान, शाहरूख खान अशा अनेक नायकांत ज्यांचे अंश उतरले आणि तरीही जे उरले ते महंमद युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार आज दिवंगत झाले. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta editorial paying tribute to legendary actor dilip kumar zws

First published on: 08-07-2021 at 03:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×