नवज्योतसिंग सिद्धूने काँग्रेसला दिलेला नवा झटका काय वा बाबुल सुप्रियोंचे पक्षांतर काय, यातून भारतीय राजकारणाचे आणि पर्यायाने मतदारांचेही हसेच होते आहे..

पंजाबातील सत्तांतरावरील संपादकीयात (‘शोभा झाली’, २१ सप्टेंबर) ‘लोकसत्ता’ने नवज्योतसिंग सिद्धू याचे वर्णन ‘विदूषक’ आणि ‘शाब्दिक अतिसाराचा बारमाही रुग्ण’ असे केले होते. विज्ञानात ज्याप्रमाणे प्रयोगाच्या अंती सिद्धता द्यावयाची असते त्याप्रमाणे या सत्तांतर प्रयोगाच्या अखेरी सिद्धू यांनी आपल्या वर्तनातून या वर्णनाची सिद्धता दिली. या इसमाचे वर्णन किती रास्त होते हे इतक्या तातडीने दिसून आल्याने काही अनभिज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी ‘लोकसत्ता’सारख्या राजकारणाच्या तटस्थ भाष्यकारास आपली टिप्पणी खरी ठरल्याचे अनुभव नवीन नाहीत. जे काही या निमित्ताने झाले ते अखेर आढय़ाचे पाणी वळचणीला जाण्यासारखेच. सिद्धू यांनी आपल्या कृतीतून काँग्रेसच्या राहुल- प्रियंका गांधी यांस कसे अडचणीत आणले हे पाहून काहींचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुपात असलेले जात्यातल्याचे भरडणे पाहून त्यास वाकुल्या दाखवतात तसेच हे. असे ठामपणे म्हणता येते याचे कारण विस्ताराच्या उद्दिष्टापोटी आपण किती आणि काय दर्जाच्या गणंगांना जवळ करीत आहोत याचे भान आपल्याकडे डाव्यांचा एक अपवाद वगळता अन्य राजकीय पक्षांस नाही. डाव्यांना ते आहे याचे कारण त्यांच्याकडे केवळ वैचारिक निष्ठावानच जातात. राजकीय संधीसाधूंना तो पक्ष अजिबात आकृष्ट करीत नाही कारण त्या पक्षाकडे जाऊन केरळ वा पश्चिम बंगाल वगळता अन्यत्र काही पदरात पडण्याची शक्यता नसते म्हणून. बाकी सर्व पक्ष एकाच माळेचे मणी. म्हणून सिद्धू यांच्या वर्तनाने हसे झालेच असेल कोणाचे तर ते केवळ काँग्रेस नेत्यांचे नाही; तर भारतीय राजकारणाचेच झाले आहे.

याचे कारण या पक्षांची हावरट वृत्ती. त्याचे किती दाखले द्यावेत! पश्चिम बंगालातील ताज्या निवडणूक निकालानंतर बाबुल सुप्रियो यांनी भाजपचा त्याग करून तृणमूल काँग्रेसला आपले म्हटले. आधी राजकारणात ज्या पक्षापासून सुरुवात केली त्या भाजपत काही फारसे मिळणारे नाही हे लक्षात आल्यावर माजी पत्रकार, संपादक कै चंदन मित्रा यांनीही शेवटी ‘तृणमूल’शी घरोबा केला होता. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचे एकेकाळी भाजपत केवढे प्रस्थ. हे गृहस्थ तेव्हाही नवज्योत सिद्धू यांचे ज्येष्ठ बंधू शोभावेत याच लायकीचे होते. पुढे त्यांच्या चकाकीचा वर्ख गेल्यावर भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचे काय झाले पुढे हे सर्वच जाणतात. सिन्हा यांच्याप्रमाणे तशाच कचकडय़ाच्या जगातून आलेल्या, दूरचित्रवाणी मालिकामशहूर पंडिता स्मृती इराणी यांची तर बातच और. भाजपने त्यांना थेट राज्यसभेवर तर पाठवलेच पण त्यांच्या हाती सर्व विद्वतगृहांचे नियंत्रण असलेले खाते देऊन कॅबिनेट मंत्रीही केले. बिचाऱ्या विदुषी निर्मला सीतारामन. आता भले त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद असेल. पण पक्षासाठी इतक्या खस्ता खाणाऱ्या, दूरचित्रवाणी चर्चात पक्षाचा किल्ला लढवणाऱ्या निर्मलाबाईंना आधी राज्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते, हा इतिहास आहे. थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळवणाऱ्या पंडिता इराणींइतकी काही त्यांची पुण्याई नव्हती म्हणायची! असो! राजवर्धन राठोड, क्रिकेटपटू कीर्ती आझाद, चेतन चौहान आणि झालेच तर गौतम गंभीर अशा खिलाडूताऱ्यांनाही भाजपने थेट सत्तापदे दिली. हेमवतीनंदन बहुगुणा यांच्यासारख्या मुरलेल्या राजकारण्याच्या पराभवासाठी काँग्रेसने अमिताभ बच्चन यांना पुढे आणले खरे! पण काँग्रेसच्या आणि देशाच्या राजकारणात पुढे या बच्चन यांचे योगदान काय? राम नाईक यांना हरवण्यासाठी काँग्रेसने नाचऱ्या गोविंदासही वापरून घेतले. त्याच्या पदन्यासाचे पुढे काय झाले? तोच प्रश्न स्वप्नसुंदरी हेमामालिनी, अभिनयाच्या मुद्दय़ावर भारतभूषण, प्रदीपकुमार यांनाही लाजवेल असा कलावंत धर्मेद्र, आता त्यांचा मुलगा सनी देओल, पडत्या काळातला राजेश खन्ना अशा अनेकांबाबत विचारता येईल. यातील काही गुमान ज्या पक्षाने आपले म्हटले त्यास धरून राहिले तरी.

पण प्रश्न या असल्या थिल्लरांच्या राजकारण प्रवेशाचा नाही. ही लोकशाही आहे. कोणी काय करावे आणि कोणाकडून काय करवून घ्यावे हा ज्या आणि त्या करणाऱ्या-करवून घेणाऱ्यांचा प्रश्न. त्यात इतरांना पडण्याचे कारण नाही. पण या असल्या बुभुक्षित वृत्तीमुळे राजकारणाचे मनोरंजनीकरण होते त्याचे काय? हे तारेतारका राजकारणात येतात ते आपापला तोरा घेऊन. ते एकाअर्थी साहजिकही. पण त्यांना राजकारणात उच्चपद देऊन आपले राजकीय पक्ष स्वपक्षातील जुन्याजाणत्या, निष्ठावानांवर अन्यायच करीत असतात. आपल्याकडे पक्षांतर्गत लोकशाही किती मजबूत आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे बाहेरून आलेल्या या तारेतारकांमुळे पक्षांतर्गत नेतृत्व उपेक्षितच राहते. आताही वास्तव हे आहे की पश्चिम बंगालातील कलाकार वस्तीतून बाबुल सुप्रियो यास विधानसभा निवडणुकीतही यश मिळवता आले नाही. म्हणजे त्याचे राजकीय वजन काय होते हे दिसते. अशा वाचाळास भाजपने जवळ केले त्यावेळी या मतदारसंघातील पक्षाचे जुनेजाणते कार्यकर्ते, अनुभवी नेतृत्व यांच्याकडे दुर्लक्षच झाले. इतके करून परत भाजपवर ‘बाबुल मोरा’ म्हणत ‘नैहर छूटो ही जाय’ पाहायची वेळ आलीच. तीच गत काँग्रेसची. कोणत्याही कोनातून पाहिले तरी नवज्योतसिंग सिद्धू हा इसम गांभीर्याने घ्यावा असा नाही. तरीही त्यास महत्त्व देऊन जुन्याजाणत्या अमिरदर सिंग यांना काँग्रेसने सत्तात्याग करायला लावला. अमिरदर यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे कारण नाही. पण त्यांना कोणाच्या आग्रहासाठी सत्ता गमवावी लागली, हे वेदनादायी खरेच. बारा नाही पण निदान तीन पक्षांचे पाणी प्यायलेल्या नवज्योतामुळे काँग्रेस नेतृत्वाचे डोळे दिपले हा खरे तर त्या पक्षालाच नव्हे तर आपल्या समस्त राजकीय संस्कृतीसाठीच लाजिरवाणा प्रसंग. कारण या सुप्रियो, सिन्हा, सिद्धू आदींमुळे राजकीय पक्षांचे वैचारिक आणि मानवी साधनसंपत्तीतील दारिद्रय़ तेवढे समोर येते. परत हे सर्व सर्वपक्षीय सत्य आहे. मग मुद्दा असा की हे असे पुन:पुन्हा का होते?

याचे कारण विचारशक्ती हरवून बसलेले मतदार. राम नाईकांसारख्या कष्टाळू लोकप्रतिनिधीस नाकारून गोविंदासारख्या उटपटांगास मत देताना, बहुगुणा यांना नाकारून अमिताभच्या मागे धावताना, फुकाच्या आढय़तेखोर शत्रुघ्न सिन्हास पाठिंबा देताना, हेमामालिनी, राजेश खन्ना, सनी देओल आदींस निवडून देताना नागरिक आपली अक्कल अशीच गहाण टाकणार असतील तर आपणास राजकारणी म्हणून या भुक्कडांनाच सहन करावे लागणार. लोकप्रतिनिधी या नात्याने या वावदुकांशी आपला संबंध कसा असणार आहे, असा प्रश्नही नागरिकांच्या डोक्यात मत देताना येणार नसेल तर त्याचा दोष या मंडळींना कसा काय देणार? लोकशाही म्हणजे केवळ पाच वर्षांतून एकदा मतदानाचा हक्क बजावणे इतकेच नव्हे. या व्यवस्थेत मत देणारा आणि मागणारा यांच्यात एक बंध निर्माण होऊन त्याचा उपयोग व्यापक जनकल्याणासाठी होणे अपेक्षित असते. नळाला पाणी यावे यासाठी झगडणारे, रस्त्यावरच्या खड्डय़ांनी कंबर मोडून घेणारे, आरोग्य व्यवस्थेअभावी आप्तेष्टांचा गुदमरता जीव असहायपणे पाहणारे नागरिक आणि हे तारेतारका उमेदवार यांचे कसले आले आहे नाते? मतदान झाले की हे आपल्या महालांत आणि मतदार आपापल्या छळछावण्यांत! तेव्हा आपले राजकीय पक्ष सुधारावेत अशी नागरिकांची इच्छा असेल तर आधी नागरिकांस स्वत:स सुधारावे लागेल. हे सुधारणे म्हणजे लोकशाहीकडे, सरकारकडे पक्षविरहित नजरेतून पाहणे. इतका शहाणपणा मतदारांठायी नाही हे ठाऊक असल्याने राजकीय पक्ष आपणास सहज गृहीत धरतात. त्यांच्यात काही सुधारणा होण्याची शक्यता नाही कारण लाटांवर हेलखावे खाण्यात आनंद मानणारे मतदार आहेत तोपर्यंत सुधारण्याची गरजच त्यांना नाही. तेव्हा राजकारणातील या विमुक्त भटक्यांस आवरण्याची जबाबदारी सुजाण नागरिकांवरच येते आणि आपले लोकशाहीचे घोडे या सुजाणतेवरच पेंड खायला जाते. तेव्हा बदलासाठी तूर्त प्रतीक्षा अपरिहार्य.