scorecardresearch

अग्रलेख : नवे ‘हभप’!

महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचे एकापेक्षा एक नामांकित गणंग पाहिले की या सर्वाची शिसारी आल्याशिवाय राहात नाही..

महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचे एकापेक्षा एक नामांकित गणंग पाहिले की या सर्वाची शिसारी आल्याशिवाय राहात नाही..

अलीकडे महाराष्ट्रातील राजकारणात तळ गाठण्याचीच स्पर्धा सुरू आहे की काय असे वाटू लागले आहे. एकाची कृती हा नीचांक म्हणावा तर दुसरा त्यापेक्षाही आणखी खोलात जातो आणि ते पाहून तिसऱ्याचाही मोह अनावर होतो. या मंडळींस आईन्स्टाईन आदींचा दाखला देणे म्हणजे किरकिरणाऱ्या तान्ह्या बाळास सिंफनीचे महत्त्व सांगणे वा कुमार गंधर्वाचे ‘अनुपरागविलास’ वाचून दाखवणे, इतकी यांची पातळी खालावलेली आहे. तरीही आईन्स्टाईनचा दृष्टांत द्यायचा तो एका सिद्धांतासाठी. ‘‘हे विश्व अनादी अनंत आहे की नाही याविषयी मी साशंक आहे, पण माणसाच्या अथांग बिनडोकपणाबाबत मात्र मी नि:शंक आहे,’’ अशा अर्थाचे त्या द्रष्टय़ा विज्ञानवंताचे वचन विख्यात आहे. महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा किती खालावणार आहे याची कल्पना असल्यानेच त्याने बहुधा हे उद्गार काढले असावेत. तेव्हा ‘‘जबाबदार पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीने वागावे’’ ही मुंबई उच्च न्यायालयाची अपेक्षा रेताड जमिनीवरच्या लागवडीसारखी वाया जाईल यात तिळमात्रही शंका नाही. ज्या महाराष्ट्राने देशाच्या राजकारणाची दिशा ठरवली, त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचे एकापेक्षा एक नामांकित गणंग पाहिले की या सर्वाची शिसारी आल्याशिवाय राहात नाही. किमान शहाणपणाचाही अभाव असलेल्या या मंडळींच्या राजकारणास तितक्याच विवेकशून्य माध्यमांची जोड मिळते हे दुर्दैव. त्यामुळे सगळाच बट्टय़ाबोळ होत असून सामाजिक क्षेत्रात कोणी वडीलधारेही नसल्याने परिस्थिती आणखी किती खालावणार असा प्रश्न पडतो.

त्याचे ताजे निमित्त म्हणजे या कोणा राणा दम्पतीचे उद्योग. कोण हे राणा? महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात यांचा वाटा काय? एका पक्षाकडून मिळालेल्या मलिद्याचा आनंद घेत दुसऱ्या पक्षाशी संधान बांधून तिसऱ्या पक्षासाठी काम करणाऱ्या अनेक भुरटय़ांचा सध्या राजकारणात सुळसुळाट झालेला आहे. हे त्यातीलच एक नव्हेत? त्यांना अशी अचानक ‘हनुमान चालीसा’ची उबळ का आली? आली तर आली पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ‘हनुमान चालीसा’ पठणाने अधिक पुण्य लाभते असे आहे की काय? की दिल्लीतील केंद्रीय सत्ताधीश अशा वर्तनाने खूश होतात आणि प्रसाद वाढवून मिळतो, असे तर नाही? हे दोघे इतके हनुमानभक्त असल्याचे आतापर्यंतच्या त्यांच्या वर्तनातून कधी दिसले नव्हते. हे राणा महाराष्ट्रदेशीचे नागरिक. त्यांस त्यामुळे मराठीतील ‘भीमरूपी’ हे स्तोत्र माहीत असण्यास हरकत नसावी. त्यातील हनुमान ‘मंद्राद्री-सारिखा द्रोणू। क्रोधें उत्पाटिला बळें॥’ अशा ताकदीचा आहे. पण त्याचे हे भक्त म्हणवणारे इतके शेळपट कसे? या राणा यांचा वकुब काय आदी मुद्दे सोडून द्या. पण इतक्या सर्वार्थाने हलक्या जोडप्यावर महाराष्ट्र सरकारने थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा हे आणखी हास्यास्पद. आपल्या राजकीय आयुष्यात पक्षद्रोहाखेरीज काहीही माहीत नसलेल्यांवर राजद्रोहाचा आळ घेणे म्हणजे गांडुळांमुळे धरित्रीस भोक पडते असे मानण्यासारखे. तेव्हा या कोणा राणा दम्पतीचे उद्योग अधिक हास्यास्पद की महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणे अधिक हास्यास्पद हा खरेच मोठा गहन प्रश्न.

त्याहून अतर्क्य बाब म्हणजे या राणा दम्पतीच्या केकावलीची दखल थेट लोकसभा सचिवालयाने घेणे आणि त्याबाबत महाराष्ट्र सरकारकडे खुलासा मागणे. देशाच्या लोकशाही रक्षणासाठी हे राणा दम्पती इतके महत्त्वाचे आहेत याची जाणीव लोकसभा सचिवालयाच्या या तत्परतेने व्हावी. तथापि या जोडप्यास असलेला भाजपचा पाठिंबा हे तर कारण लोकसभा कार्यालयाच्या या संवेदनशीलतेमागे नसावे? जे जे भाजपचे ते ते राष्ट्रहिताचे असे सध्या असल्यामुळे या जोडीच्या ख्यालीखुशालीची गरज सर्वांनाच लागली असावी. पण या संदर्भात मूळ प्रश्न असा की इतक्या बलाढय़, कार्यक्षम आदी पक्षास या असल्या मेहुणास पाठिंबा द्यायची गरजच का मुळात वाटावी? यातून राजकारणातील अतिबालिशपणा आणि अतिउतावीळता तेवढी दिसते. राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो हे खरे. पण म्हणून राज्य सरकारला वाकुल्या दाखवणाऱ्या प्रत्येक हौशा-गवशा-नवशास भाजपने आपले म्हणण्याची गरज नाही. यातून त्या पक्षाचे घायकुतीस येणे तेवढे अधोरेखित होते. कोणी सुशांतसिंग- रिया चक्रवर्तीपासून ते राणा दाम्पत्य व्हाया नबाब मलिक, समीर वानखेडे इत्यादी प्रकरणांतून काय दिसते? परत मधे मधे तोंडी लावण्यास दाऊद वगैरे ठसकेदार घटक आहेतच. विद्यमान राज्य सरकारची नालायकता सिद्ध करण्यास या मंडळींची मदत घ्यायला लागत असेल आणि तरीही अपयशच पदरी येत असेल तर त्यातून केवळ या मार्गाचीच निरुपयोगिताच सिद्ध होत नाही काय?

या मंडळींच्या या उद्योगांपुढे खरे तर दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रमातील (खरे तर हास्यास्पद) टुकार कलाकारदेखील प्रतिभाशाली वाटण्याचा धोका आहे. या अशा राजकारण्यांस माध्यमांचीही साथ मिळत असल्याने या मंडळींची नवनवोन्मेषशाली प्रतिभा आणखीनच फैलावते. गेल्या आठवडय़ात दिल्लीत काही अतिउत्साही माध्यमवीर बुलडोझरवर स्वार होऊन पाडापाडीचे चित्रीकरण सादर करताना पाहून धन्य धन्य झाले. ते या मोहिमेचे धावते समालोचन करीत होते. आपल्याकडे कोणत्याही शहरातील रस्त्यावर काहीही सुरू असले की ते पाहात बसणारे रिकामटेकडे बरेच दिसतात. माध्यमांचे हे असे झाले आहे. फरक इतकाच की माध्यमांतील हे पाहणारे इतरांनाही ते दाखवतात, इतकेच. बाकी गुणात्मक वेगळेपण म्हणावे तर शून्य. माध्यमांच्या या मनोरंजनीकरणाचा परिणाम असा की कॅमेरे दिसले रे दिसले की किरीट सोमय्या वा राणा दम्पतीसदृशांना चेव येतो आणि त्यांना चेव आला की माध्यमांचा हुरूप वाढतो. असे हे परस्परपोषी.. म्हणजे एकमेकांच्या आधारे एकमेकांचे पोषण सुरू ठेवणारे वास्तव. उभयतांतील या असल्या उथळय़ांमुळे कोणताही मूळ मुद्दा, नागरिकांसमोरील आव्हाने आदींची चर्चाच होऊ शकत नाही. अशा कोणत्याही गंभीर विषयांत या मंडळींस रस नाही. त्यावर त्यांचे म्हणणे असे की लोकांनाच काही महत्त्वाच्या गंभीर विषयांत रस नसेल तर त्यास आम्ही काय करणार? गंभीरतेस ‘टीआरपी’ नसतो हेदेखील सत्यच. त्यापेक्षा हे हनुमान चालीसी प्रदर्शन अधिक दिलखेचक. खरे तर या कोणा राणा द्वयीस हनुमान चालीसा म्हणता येणे वा न येणे यात कसले आले आहे व्यापक हित? या हनुमानात या उच्छृंखलास खरा रस असता तर त्यांनी ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज स्थानकासमोर तरी म्हणायचे. त्याच्या श्रवणातून ‘मातोश्री’तील सदस्यांपेक्षा जास्त जणांस पुण्यप्राप्ती होऊ शकली असती. इतकेच नव्हे तर आवर्तने मोजण्याच्या पद्धतीनुसार तेथील इतक्या सर्व प्रवाशांनीही हनुमान चालीसा म्हटले असा सोयीस्कर समज करून घेत या दम्पतीसही अधिक पुण्य जमा करता आले असते. पण तसे करते तर प्रसिद्धी मिळती ना. तेव्हा जे काही सुरू आहे ते सर्व काही प्रसिद्धीसाठी. त्याची या सर्वाना इतकी आस की आपले वर्तन हे पवनसुतातील देवत्वापेक्षा त्याच्या मूळ रूपातील उद्योगास अधिक जवळचे आहे हेदेखील त्यांस कळेनासे झाले आहे. यातूनच महाराष्ट्रात या हनुमान चालीसा भक्त परायणांची नवी तुकडी दाखल झाली असे मानण्यास जागा आहे. हे नव‘हभप’ आणि त्यांच्या उडय़ांमुळे काही काळ मनोरंजन होईल; पण राजकारण वा समाजकारणाचा पोत काही सुधारणार नाही. पण मनोरंजनातच आनंद मानायचे ठरवले असेल तर त्यांस कोण, काय, कसे सुधरवणार?

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Politics over hanuman chalisa in maharashtra sedition fir on rana couple zws

ताज्या बातम्या