मावळ भागात आणि बहुजन समाजाच्या प्रेरणास्थानांचे पूजन करीत झालेल्या रा. स्व. संघाच्या मेळाव्याचे राजकीय इशारे ध्यानी घ्यायला हवेत..
मुळशी, मावळ परिसरात आज प्राधान्याने बहुजन समाजाचे वास्तव्य आहे. पण त्यांना कवेत घेणारी एकही राजकीय ताकद नाही. अशा ताकदीअभावी हा समाज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या वळचणीला आहे. पण ती अपरिहार्यता आहे म्हणून.

संघ आणि सरसंघचालक यांची कोणतीही चाल आणि कोणतेही भाष्य हे कधीही योगायोग नसते. मग ते बिहार निवडणुकीपूर्वी पांचजन्य साप्ताहिकात राखीव जागा धोरणांच्या फेरविचाराचे सोडलेले पिल्लू असो वा रविवारी िपपरी चिंचवडजवळ मावळ प्रांतात पार पडलेला भव्य मेळावा असो. त्यामागे दीर्घकालीन विचार असतोच असतो. अर्थात त्यात गर असे काही नाही. परंतु मुद्दा हा की संघाच्या कृतीवर भाष्य करण्याआधी हा दीर्घकालीन विचार समजून घेणे आवश्यक ठरते. त्याच भूमिकेतून संघाचा हा शिवशक्ती संगम मेळावा आणि त्यातील सरसंघचालकांचे भाषण याकडे पाहावयास हवे.
या मेळाव्याच्या स्थानापासून त्याच्या विश्लेषणाची सुरुवात होते. संघाचे या आधीचे शिबीर पुण्यातील तळजाई पठारावर भरले होते. ते पुण्यातील सहकार नगरातील मध्यमवर्गीय स्थळ. तो मेळावा अशा ठिकाणी आणि अशा काळात घेतला गेला की ज्यावेळी त्या परिसरातील अर्धीअधिक लोकसंख्या ही प्रत्यक्ष संघीय वा संघसमर्थक होती. खेरीज, आसपासच्या परिसरात साध्या वेशातील पुणेकरांप्रमाणे साध्या वेशातील संघीय मोठय़ा प्रमाणावर होते. आता तशा परिसरात तसे करण्याची संघास गरज नाही. तळजाईने आपले उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा अधिक जलद गाठले. तेव्हा परिवर्तन झालेल्याचे पुन्हा परिवर्तन करण्याची गरज नसते या उक्तीप्रमाणे तळजाई आणि पुणे शहर पादाक्रांत केल्यानंतर संघास पुन्हा तेथे काही करावयाची गरज नव्हती. संघासाठी आता सर्वार्थाने नवीन आव्हान होते आणि आहे ते म्हणजे िपपरी चिंचवड, आकुर्डी प्राधिकरण आदी परिसरातून. त्याची प्रमुख कारणे तीन.
पहिले म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रस्फोटानंतर हा परिसर या क्षेत्रात काम करणाऱ्या आस्थापनांनी भरून गेला आहे. िहजवडी हे त्याचे दृश्य उदाहरण. जवळपास दोन लाख वा अधिक तरुण दररोज या परिसरातील कंपन्यांत येतात आणि परत जातात. त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे पूर्वीचे स्वरूपही आता बदलत चालले आहे. उगम झाला त्यानंतरच्या काळात आणि अगदी अलीकडेपर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे एका अर्थाने नवब्राह्मण्याचे निदर्शक होते. कारणे काहीही असोत. परंतु मराठी, तामिळ आदी भाषकांतील ब्राह्मण तरुणांकडून हे क्षेत्र चालवले जात होते. पुढे हा वर्ग मोठय़ा प्रमाणावर अमेरिकादी देशांत स्थलांतरित झाला. त्यानंतर या क्षेत्राची लोकप्रियता आणि अनुकरणीयता बहुजन समाजाच्या लक्षात आली. हे असे नेहमीच होत असते. प्रगतीच्या नवनव्या दिशांचा शोध नेहमीच प्रस्थापितांना लागतो आणि त्यानंतर मग बहुजन समाज त्या क्षेत्राकडे आकर्षति होतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबाबतही हेच घडले. खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची झालेली प्रचंड वाढ, त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांत सुलभ झालेले प्रवेश आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झालेली स्वस्त, सुलभ मनुष्यबळाची गरज हे सर्व एकाच वेळी घडून येत होते. मुख्य शहरांलगतच्या सीमारेषांवर असलेल्या औद्योगिक पट्टय़ात हा बदल सहज दृष्टीस पडतो. पुण्याजवळील िहजवडी हे या सामाजिक अभिसरणाचे दृश्य स्वरूप. तेव्हा संघाचे शिबीर या परिसरात घेतले जाणे, यामागील एक सामाजिक आíथक कारण हे. या परिसरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण अभियंते हे बहुजन समाजातील आहेत. ग्रामीण पाश्र्वभूमी घेऊन कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या या तरुणांना लवकरात लवकर प्रस्थापित व्हावयाचे आहे. त्यासाठी लागणारी आíथक रसद त्यांना रोजगारातून मिळते. ती किती आहे, ते या परिसरात उभ्या राहणाऱ्या मॉल्स वा हॉटेल यांवरून कळू शकते. तेव्हा प्रस्थापित होण्यासाठी अन्य मागासांची होते तशी या समाजाची आíथक उपेक्षा अजिबात नाही. प्रश्न आहे तो सांस्कृतिक रसदीचा. या वर्गास व्यवसायसंधीच्या निमित्ताने परदेशांचेही दर्शन घडते. तेथील शिस्तबद्ध समाज, आखीव जगणे आपल्याकडेही यावे अशी नसíगक मनीषा या वर्गाची असते. संघाचे भव्यदिव्य, शिस्तशीर, चोख आयोजनयुक्त शिबीर याच परिसरात का, याचे हे दुसरे कारण. त्यास पूरक म्हणून संघाने याआधीच माहिती महाजालात चांगलेच हातपाय पसरलेले आहेत. प्रत्यक्ष मदानावर भरणाऱ्या संघ शाखांच्या बरोबरीने, किंबहुना अधिकच, संघाच्या ऑनलाइन शाखा भरतात. हेही कारण शिवशक्ती संगम याच परिसरात घडवून आणण्यामागे निश्चितच असणार. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या परिसरास सांस्कृतिक इतिहास नाही. या परिसराचे उत्तम शहरीकरण झालेले असले तरी तेथील नागरिक हे बहुसंख्येने विस्थापित तसेच स्थलांतरित आहेत. हे दोन्ही अर्थातच स्वेच्छेने झालेले. म्हणजे मुंबई वा तत्सम शहरांतील आपली चाकरी संपवून अनेकांनी निवृत्तीनंतरच्या जगण्यासाठी या परिसराची निवड केली. त्या वर्गास बांधून ठेवणारे असे काही हवे होते. संघ शाखा या परिसरात फोफावताना दिसतात ते याच कारणांनी.
या खेरीज एक कारण संघाच्या स्थळनिवडीमागे असणारच असणार. परंतु राजकीयदृष्टय़ा गरसोयीचे वा अडचणीचे असल्याने त्या विषयी उघडपणे काही बोलले जाणार नाही. ते कारण म्हणजे या परिसराचे सामाजिक वास्तव. मुळशी, मावळ परिसरात आज प्राधान्याने बहुजन समाजाचे वास्तव्य आहे. पण त्यांना कवेत घेणारी एकही राजकीय ताकद नाही. अशा ताकदीअभावी हा समाज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या वळचणीला आहे. पण ती अपरिहार्यता आहे म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे स्वरूप मराठा महासंघ असे झाले आहे. तोंडी लावण्यापुरता असलेला एखादा छगन भुजबळ यांचा अपवादवगळता राष्ट्रवादी हा मराठा समाजातील नेत्यांचा आणि त्यातही धनदांडग्या, सहकारी चळवळीत आणि म्हणून सत्ताकारणात मुरलेल्यांचा पक्ष बनलेला आहे. मराठा समाजातील सामान्यांना तेथे स्थान नाही. या समाजासाठी फुटकळ संघटना आजमितीस बऱ्याच आहेत. विनायक मेटे वगरेंचे नेतृत्व हे त्यातून आले. परंतु प्रस्थापित राजकारण्यांना लोंबकळण्याइतकेच त्यांचे स्थान. त्या खेरीज अशांना कोणताही प्रस्थापित पक्ष अधिक अवकाश देण्यास तयार नाही. परिणामी राजकीय नेतृत्वाच्या अभावी हा वर्ग अत्यंत सरभैर आहे.
त्या वर्गास योग्य वेळी आकर्षति करून घेण्याचा चतुर मार्ग म्हणजे हा शिवशक्ती संगम. तसे करणे अर्थातच काही गर आहे असे नाही आणि याआधी संघाने तसे केलेले नाही, असेही नाही. अल्पसंख्य आणि क्षत्रिय समाजास काँग्रेस आकर्षून घेत असताना संघाचे ज्येष्ठ राजकीय विचारवंत कै. वसंतराव भागवत यांनी ‘माधव’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवून दाखवली. तीद्वारे माळी, धनगर आणि वंजारी या इतर मागास जमातींना संघाने मुख्य प्रवाहात आणले. नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, उमा भारती, कल्याणसिंग आदी अन्य मागास जमातीचे नेते पुढे आले ते या ‘माधव’ समीकरणामुळे. आज ओबीसी म्हणून ओळखले जाणारे अन्य मागासवर्गीय भाजपच्या अंगणात दिसतात ते संघाच्या या नियोजनामुळे. त्यानंतर देशभरातील- त्यातही महाराष्ट्रातील- मराठा समाजास आकर्षून घेईल असे कोणत्याही राजकीय पक्षाकडून काही घडलेले नाही. अपवाद फक्त निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांचा.
तेव्हा शिवशक्ती संगम घडवून आणला गेला तो या पाश्र्वभूमीवर. ही पाश्र्वभूमी एकदा समजून घेतली की मग महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या कार्यक्रमातील पूजनाचा अर्थ लगेच उलगडेल. तो तसा उलगडला तर प्रस्थापित मराठा आणि बहुजन समाजास संघाच्या या कार्यक्रमामागील गांभीर्य जाणवावे. ते जाणवले नाही आणि जाणवूनही त्यांनी हातपाय हलवले नाहीत तर मात्र आजपासून साधारण दहा वर्षांनी हा परिसर भाजपचा बालेकिल्ला झालेला असेल.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट