scorecardresearch

अग्रलेख : नेमस्तपणाची किंमत

बायडेन यांच्या विनंतीला मान देऊन सभागृहातील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी उभे राहून मारकारोव्हा यांच्यासमक्ष युक्रेनला पािठबा दर्शवला.

अग्रलेख : नेमस्तपणाची किंमत
(संग्रहित छायाचित्र)

युक्रेन पेचप्रसंगाचा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळी पाश्चिमात्य देशांनी दिलेले युक्रेनची पाठराखण करण्याचे आश्वासन पाळले नाही, हे ठळकपणे नमूद होईल.

हा सभ्य, सुसंस्कृतांपेक्षा असभ्य, असंस्कृतांचा काळ! ‘‘व्लादिमीर पुतिन हे ‘स्मार्ट’ आहेत तर अध्यक्ष जो बायडेन असहाय’’ हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान हे विद्यमान कालनिदर्शक असेच. अशा वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन जानेवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनवर आक्रमण करण्याच्या तयारीत होते, तेव्हाची गोष्ट. त्या वेळी त्याची जाणीव झाल्यामुळे सावध बनून पुतिन यांना तसले दु:साहस करण्यापासून परावृत्त करणाऱ्या पाश्चिमात्य नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आघाडीवर होते. किंबहुना, युद्ध सुरू होईपर्यंत तरी पुतिन यांच्याशी संवाद सुरू ठेवलेल्या अगदी मोजक्या नेत्यांपैकी बायडेन एक. त्या वेळी चर्चेतून काही निष्पन्न होत नसल्यामुळे उद्या पुतिन यांनी खरोखरीच युक्रेनवर आक्रमण केल्यास, त्या देशाच्या मदतीसाठी फौजा पाठवणार का या प्रश्नावर बायडेन उत्तरले, ‘अमेरिका आणि रशियाचे सैनिक परस्परांच्या दिशेने गोळय़ा झाडू लागतील तेव्हा ते युद्ध राहणार नाही, ते जागतिक युद्ध ठरेल!’ बायडेन यांच्या त्या सावध भूमिकेत पुतिन यांच्या आक्रमणानंतरही बदल झालेला नाही हे मंगळवारी रात्री वॉशिंग्टनमध्ये (भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी) त्यांनी केलेल्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ या पारंपरिक वार्षिक भाषणात स्पष्ट झाले. अमेरिकी अध्यक्षांकडून गतवर्षांचे सिंहावलोकन आणि पुढील वर्षांचे धोरण दिशादर्शन असे ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणाचे सर्वसाधारण स्वरूप असते. पण सध्या जगातील राजकीय, वैचारिक, धोरणात्मक अवकाश युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाने व्यापला आहे. बायडेन यांचे भाषणही याला अपवाद नव्हते. या भाषणातील सुरुवातीची १५ मिनिटे ते केवळ युक्रेन आणि रशियावर बोलले. त्या १५ मिनिटांच्या भाषणतुकडय़ाचा मथितार्थ इतकाच, की पुतिन यांच्याशी लष्करीदृष्टय़ा भिडण्याऐवजी त्यांची विविध मार्गानी मुस्कटदाबी करण्यास अमेरिकेचे प्राधान्य राहील. ते कसे, हे समजून घ्यावे लागेल. 

खरे तर बायडेन यांचे भाषण एका अर्थाने ऐतिहासिक. भाषणादरम्यान त्यांच्या मागे बसलेल्या दोन्ही पीठासीन अधिकारी व्यक्ती महिला होत्या! उपाध्यक्ष व सेनेट सभापती कमला हॅरिस आणि प्रतिनिधिगृहाच्या सभापती नॅन्सी पलोसी. पण तो ऐतिहासिक क्षण साजरा करण्याच्या मन:स्थितीत बायडेन किंवा त्यांचे डेमोक्रॅट सहकारी साहजिकच नव्हते. कारण एका विशाल देशाने दुसऱ्या एका विशाल, लोकशाही, सार्वभौम देशावर कोणत्याही चिथावणीविना हल्ला करणे हे दुर्मीळ अघटित काही दिवसांपूर्वी घडले. हे दोन्ही देश युरोपातील असावेत हे तर दुर्मीळातूनही दुर्मीळ. अशा प्रसंगी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात ‘नाटो’चा एक संस्थापक आणि सर्वात बलाढय़ देश या नात्याने, भौगोलिक आणि राजकीयदृष्टय़ाही या संघटनेच्या परिघावर असलेल्या एका देशाच्या रक्षणासाठी काही एक भूमिका अमेरिकेला निभावावी लागणारच आहे. संयुक्त राष्ट्र संघातील विविध ठरावांवर सोयीस्करपणे तटस्थ राहण्याची मुभा या देशाला नाही! दोनच दिवसांपूर्वी जर्मनी या ‘नाटो’तील आणखी एका सहकारी देशाने तटस्थतेची झूल झुगारून देत युक्रेनच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्यानंतर अमेरिकेवरील जबाबदारी अधिकच वाढते. या संदर्भात बायडेन यांनी दिलेली आश्वासने त्यांची बलस्थाने दर्शवतात आणि मर्यादाही! एखाद्या युरोपीय देशाने दुसऱ्या युरोपीय देशावर म्हणजे जर्मनीने पोलंडवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करण्याची यापूर्वीची घटना ८०हून अधिक वर्षांपूर्वी घडली होती. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्या युद्धात अमेरिका विलंबाने दाखल झाली, तरी त्याचा शेवट अमेरिकेकडून अणुबॉम्ब वापरण्यात झाला. या इतिहासाशी बायडेन अवगत आहेत. त्यामुळेच युक्रेनमध्ये थेट फौजा पाठवण्यास त्यांनी याही भाषणात नकार दिला. मात्र युक्रेनच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी, या भाषणासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये युक्रेनच्या राजदूत ओक्साना मारकारोव्हा यांना खास निमंत्रित केले होते. बायडेन यांच्या विनंतीला मान देऊन सभागृहातील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी उभे राहून मारकारोव्हा यांच्यासमक्ष युक्रेनला पािठबा दर्शवला. अनेक अंतर्गत मुद्दय़ांवर राजकीयदृष्टय़ा दुभंगलेल्या अमेरिकेमध्ये असा एकोपा युक्रेनच्या मुद्दय़ावर दिसून यावा हे बायडेन यांच्या मुत्सद्देगिरीचे यशच. ही मुत्सद्देगिरी पुतिन यांना वेसण घालण्यात कितपत पुरेशी ठरेल, याविषयी शंका तरीही उरतेच.

कारण बायडेन यांच्या भाषणाच्या काही तास आधी युक्रेनची राजधानी कीव्ह बेचिराख करण्यासाठी आणि त्या देशाचे निर्भीड अध्यक्ष वोलोदिमीर झेलिन्स्की यांना नेस्तनाबूत करण्यासाठी रशियन फौजांचा अजस्र ताफा कीव्हच्या वेशीपर्यंत पोहोचलेला होता. आम्ही लष्करी तळांनाच लक्ष्य करू असे आश्वासन गत सप्ताहात युद्धाच्या सुरुवातीला देणाऱ्या रशियाने आता सरसकट मोठय़ा शहरांना, नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका हल्ल्यात मंगळवारी एका भारतीय विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला. बायडेन यांचे भाषण उलटून झाल्यावर काही तासांनीच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हारॉव यांनी अण्वस्त्रयुद्धाचा थेट इशारा दिलेला आहे. तेव्हा आजचा पुतिनप्रणीत रशिया हा गतशतकातील सोव्हिएत रशियापेक्षाही अधिक आक्रमक आणि युद्धखोर आहे हे बायडेन जाणतात. एरवी परस्परांकडे सतत संशयाने पाहणाऱ्या अमेरिकी व सोव्हिएत नेत्यांनी गतशतकात अण्वस्त्रयुद्धाचा भडका उडू नये म्हणून किमान काही मुद्दय़ांवर समेटाची भूमिका घेतली होती. पुतिन तसे करायला तयार नाहीत, त्यामुळे बायडेन यांच्यावरील जबाबदारी अधिकच वाढते. रशियाचे गणित चुकले असे बायडेन म्हणतात. रशियन फौजांची वाटचाल ज्या वेगाने सुरू आहे, ते पाहता पुतिन यांचे गणित चुकलेले नाही. उलट अमेरिका आणि ‘नाटो’ आकडेमोडीतच वेळ घालवत असून, त्यांचेच गणित चुकण्याची चिन्हे दिसतात! अमेरिकी आकाश रशियन हवाई वाहतुकीसाठी प्रतिबंधित करणे, रशियन धनदांडग्यांच्या अमेरिकेतील मत्तांवर टांच आणणे, स्विफ्ट देयक प्रणालीतून रशियाच्या बहुतेक बँकांची हकालपट्टी करणे, वगैरे उपाय पुतिन यांच्यासाठी दीर्घकालीन डोकेदुखी ठरू शकते. पण त्यांना आत्ता रोखायचे कसे, याविषयी फारसे दिशादर्शन बायडेन यांच्याकडून झालेले नाही. ‘नाटो’च्या कळपात युक्रेनला समाविष्ट करून घेण्याच्या प्रयत्नांमुळे पुतिन बिथरले होते. कारण युक्रेनच्या माध्यमातून रशियाच्या सीमेवर ‘नाटो’चे अस्तित्व निर्माण होणे त्यांना मंजूर नव्हते. त्या वेळी ‘नाटो’मध्ये युक्रेनचा समावेश होणारच आणि तो पुतिन रोखू शकत नाहीत अशी भूमिका अमेरिकेसकट ‘नाटो’च्या इतर देशांनी घेतली. पण आज ‘नाटो’च्या भावी बंधुराष्ट्राला लष्करी मदत करण्यास त्या देशातील एकही सदस्य देश तयार नाही. तेव्हा किमान या मुद्दय़ावर थोडी सबुरीची भूमिका घेऊन अधिक उसंत मिळवण्याची मुत्सद्देगिरी बायडेन यांनी करायला हवी होती. ‘पुतिन यांना असा धडा शिकवू’ वगैरे आश्वासने, रशियन शासकाचे हात ज्यांच्या गळय़ाशी आले आहेत त्या झेलेन्स्कींसाठी संजीवनी ठरू शकत नाहीत. ‘नाटो’च्या कोणत्याही विद्यमान सदस्याच्या विरोधात रशियाने आगळीक केली, तर आम्ही सर्व शक्तिनिशी युद्धात उतरू असे बायडेन यांनी जाहीर केले. पण हे युक्रेनच्या पतनपश्चातच घडू शकते. ते बायडेन यांनी गृहीत धरले असे मानायचे काय? झेलिन्स्की यांना देश सोडून जाण्यासाठी साह्य करण्याचा प्रस्ताव अमेरिकेने मांडला त्या वेळी ते उत्तरले, की मला सवारी (राइड) नको, दारूगोळा हवा! युक्रेन पेचप्रसंगाचा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळी पाश्चिमात्य देशांनी त्या देशाची पाठराखण करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही, हे ठळकपणे नमूद होईल. या पाश्चिमात्य देशांचे, ‘नाटो’चे आधिपत्य अमेरिकेकडे आहे. त्या देशाचे अध्यक्ष बायडेन हे सुसंस्कृत परंतु नेमस्त व्यक्तिमत्त्व. आज त्या नेमस्तपणाची जबर किंमत युक्रेनला मोजावी लागत आहे. यामुळे असभ्य, असंस्कृत दांडगेश्वरांचा उच्छाद अधिकच वाढण्याचा धोका संभवतो. पण त्यास तूर्त तरी इलाज नाही, असे दिसते.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2022 at 01:01 IST

संबंधित बातम्या