व्हाइट हाऊसच्या बातम्या/ विश्लेषण देणाऱ्यांच्या मेळाव्यात विनोदवीराचा कार्यक्रम नको, पत्रकार नकारात्मक लिहितात, म्हणत या संघटनेला टाळणारे ट्रम्प दूर झाले..

..या बदलातून लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली ती कशी, हे मात्र ट्रेव्हर नोह या विनोदवीराने यंदा विशद केले!

पत्रकार आणि राजकारणी यांचे संबंध हे नेहमीच ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ असेच असतात. पण म्हणून ते धरून ठेवता येत नाहीत आणि सोडूनही देता येत नाहीत. ते कसे असायला हवेत आणि कसे नसावेत याचे जागतिक उदाहरण म्हणजे व्हाइट हाऊस-केंद्री वार्ताहरांच्या संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन. जवळपास पाच वर्षांच्या खंडानंतर अखेर ते एकदाचे पार पडले. पहिले महायुद्ध सुरू झाले त्या वेळी ही व्हाइट हाऊस-केंद्री पत्रकारांची संघटना अस्तित्वात आली. तत्कालीन अध्यक्ष व्रूडो विल्सन आणि पत्रकार मंडळी यांच्यातील काही व्यवसायजन्य मतभेद दूर करण्याच्या प्रयत्नांतून ही संघटना जन्मास आली आणि त्यानंतर पाच-सहा वर्षांनी संघटनेचा वार्षिक स्नेहमेळावा भरवला जाऊ लागला. म्हणजे ही संघटना शतकापेक्षाही अधिक वर्षांची परंपरा असलेली. तथापि गेली काही वर्षे या संघटनेचे हे वार्षिक स्नेहसंमेलन भरवले गेले नाही. यंदा ते झाले आणि स्नेहभोजनास परंपरेप्रमाणे अध्यक्ष जो बायडेन हे सपत्नीक सहभागी झाले. अध्यक्ष-सहभागाची परंपरा असूनही या स्नेहमेळाव्यात माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधीच सहभागी झाले नाहीत. इतकेच नव्हे तर आपल्या कार्यालयातील उच्चाधिकाऱ्यांनीही या मेळाव्यात सहभागी होण्यास ट्रम्प यांचा विरोध असे. तसे आदेशही त्यांनी काढले होते. त्यामुळे या औपचारिक मेळाव्याआधी व्हाइट हाऊसचे अधिकारी माध्यमकर्मीस शुभेच्छा देऊन जात. ट्रम्प यांचा सुरुवातीस या मेळाव्याला विरोध आणि नंतर गेल्या दोन वर्षांचा करोना कहर यामुळे हा मेळावा होऊ शकला नाही. मोठय़ा खंडानंतर भरलेले हे स्नेहसंमेलन अनेकार्थी महत्त्वाचे आणि म्हणून दखलपात्र ठरते.

 याचे कारण या कार्यक्रमाचा ढाचा. गेली काही वर्षे या स्नेहमेळाव्यात कोणी विनोदवीर येतो आणि एखादे नाटुकले वा एकपात्री कार्यक्रम सादर करून माध्यमकर्मीच्या समोर अध्यक्षांची यथेच्छ रेवडी उडवतो. यास ट्रम्प यांचा विरोध. हे असले विनोदवीर येणार असतील तर मी बहिष्कार घालीन असा इशारा त्यांनी दिला. पण अध्यक्ष यावेत म्हणून व्हाइट हाऊस वार्ताहर संघटनेने आपला पायंडा सोडला नाही. माध्यमकर्मी बधत नाहीत हे लक्षात आल्यावर ट्रम्प यांनी आपला सूर बदलला आणि ही प्रथा किती कंटाळवाणी आहे असे सांगत सहभागी होणे टाळले. पुढे जात त्यांनी माध्यमकर्मीच्या नकारात्मक वृत्तीस बोल लावायला सुरुवात केली आणि माध्यमांस चांगले कसे दिसत नाही, अशी टीका ते करू लागले. त्याचाही काही परिणाम झाला नाही. आपल्या देशप्रमुखास आनंद वाटावा म्हणून माध्यमकर्मीनी काही सकारात्मकता धारण केली नाही. परिणामी ट्रम्प काही फिरकले नाहीत. आणि नंतर तर करोनाचा कहर सुरू झाल्याने हा मेळावा होऊ शकला नाही. एप्रिल महिन्यातील शेवटच्या शनिवारची सायंकाळ हा या मेळाव्यासाठी मुक्रर केलेला दिवस. यंदा मात्र ही शनिवारची अखेरची सायंकाळ अपेक्षेप्रमाणे व्हाइट हाऊस पत्रकार संघटना आणि अध्यक्ष जो बायडेन आणि अन्य तृतीयपर्णीच्या उपस्थितीत पार पडली. तीत सादर झालेली भाषणे राजकारणी आणि पत्रकार यांतील परस्परविरोधी आणि तरीही परस्परावलंबी संबंध लक्षात घेण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात.

खुद्द अध्यक्ष जो बायडेन यांचे या समारंभातील प्रांजळ कथन लक्षात घ्यावे असे. लोकप्रियतेच्या निकषांवर सध्या अमेरिकेत आपण अत्यंत तळाला असू असे नमूद करत बायडेन यांनी आपणास वास्तवभान असल्याचे दाखवून दिले. अवघ्या काही महिन्यांत अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांचा हंगाम सुरू होईल. तीत बायडेन यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षासमोर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे मोठे आव्हान उभे राहात असल्याचे मानले जाते. स्वत: ट्रम्प या फेरीत आपल्या पुनरागमनाचा प्रयत्न करतील असे मानले जाते. पण तरीही त्यांच्या पक्षाविषयी काहीही राजकीय भाष्य करणे बायडेन यांनी टाळले. बायडेन यांचा भर होता तो जगभरच एकंदर लोकशाही व्यवस्थेसमोर निर्माण झालेले आव्हान आणि त्यास सामोरे जाण्याची चर्चा करण्यावर. या संदर्भात त्यांनी समाजमाध्यमांतून हेतुपुरस्सर पसरवल्या जात असलेल्या ‘माहिती’चा (?) दाखला दिला आणि यामुळे प्रचलित माध्यमांवर वाढू लागलेल्या दबावाची दखल घेतली. माध्यमांचा कल हल्ली मनोरंजनाकडेच अधिक असतो. त्याचा संदर्भ बायडेन यांच्या ‘अमेरिकी लोकशाही म्हणजे रिअ‍ॅलिटी शो नव्हे. ती रिअल डेमॉक्रॅसी आहे’ या उद्गारांत असावा. यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे माध्यमांस त्यांनी कोणताही उपदेश वगैरे केला तर नाहीच; पण उलट सळसळत्या उत्साही माध्यमांमुळेच लोकशाही कशी जिवंत आहे याबाबत माध्यमकर्मीस धन्यवाद दिले. या सोहोळय़ाचे आकर्षण होते अमेरिकी विनोदवीर ट्रेव्हर नोह या विनोदवीराचे सादरीकरण. ‘‘आता मी ट्रेव्हरकडून टिंगल करून घेण्यास सज्ज आहे’’ असे विधान करीत बायडेन यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 ट्रेव्हरने अध्यक्षांचा अजिबात हिरमोड केला नाही. ट्रेव्हर अफ्रिकी. कृष्णवर्णीय. ‘‘समारंभात एखादा असा कृष्णवर्णीय बाजूला असला की नेत्यांची स्वीकारार्हता वाढते म्हणून मला येथे बोलवले असावे’’ ही ट्रेव्हरच्या सादरीकरणाची जळजळीत सुरुवात. त्यास टाळी न मिळती तरच नवल. ट्रेव्हर हा मूळचा दक्षिण अफ्रिकी. आज अमेरिकी राजकारणावरचा अत्यंत जळजळीत भाष्यकार म्हणून तो ओळखला जातो आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील त्याचे एकपात्री सादरीकरण हे अत्यंत लोकप्रिय ठरते. व्हाइट हाऊस वार्ताहर मेळाव्यातील हे सादरीकरण यास अपवाद नाही. ट्रम्प यांचे अराजकी राजकारण, विल स्मिथ या कलाकाराचे ऑस्कर सोहोळय़ातील दुर्वर्तन, ट्विटरची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे जाणे ते सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध अशा अनेक विषयांस या विनोदवीराने अत्यंत गांभीर्याने स्पर्श केला. जिज्ञासूंनी स्वत: अनुभवावे इतके त्याचे हे सादरीकरण उत्कट म्हणावे असे. पण त्याचा गाभा होता अमेरिकेतील माध्यमस्वातंत्र्य. राजकीय शेरेबाजी वा टिंगलटवाळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या विनोदवीराने ज्येष्ठ-श्रेष्ठ माध्यमकर्मीस ‘खऱ्या’ लोकशाहीचे महत्व समजावून सांगणे हेच मुळात आश्चर्यकारक.

 ‘‘तुम्ही लोकशाहीच्या खऱ्याखुऱ्या बालेकिल्ल्यात आहात. तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. ती किती याबाबत जरा जरी संशय तुमच्या मनात आला तर युक्रेन-रशिया यांकडे पाहा. तुमच्यातीलच अनेक पत्रकार युक्रेनमध्ये काय सुरू आहे त्याचे सत्यदर्शन जगास घडवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. पण तरी भाग्यवान तुम्ही आहात. कारण सत्यदर्शन करवण्याचा आणि सत्ताधीशांस सत्य सुनावण्याचा अनिर्बंध अधिकार तुम्हाला आहे.. भले त्यामुळे सत्ताधीश आणि तुमचे प्रेक्षक-वाचक अस्वस्थ होत असतील. पण तुम्ही तुमचा अधिकार विनासायास वापरू शकता. तुमच्या हक्कावर गदा येत नाही हे विलक्षण आनंददायी आहे. मी आज अध्यक्षांसमोर त्यांची टिंगल उडवत आहे आणि तरीही मला काही धोका नाही. हे वास्तव किती अवर्णनीय आहे! हा लोकशाहीने तुम्हास दिलेला आशीर्वाद आहे. त्याच्या अतिपरिचयामुळे तुमच्याकडून या आशीर्वादाची अवज्ञा कदाचित होत असेल. अशा वेळी एकच विचार करा :  रशियातील तुमचे समव्यावसायिक त्यांचे अध्यक्ष पुतिन यांस असे सत्य सुनावू शकतात काय?’’

 ट्रेव्हर याने उपस्थित केलेला हा प्रश्न आणि एकंदरीतच त्याचे भाषण अमेरिकी समाजजीवनात चांगलेच चर्चेचा विषय झाले असून भले भले त्याची यासाठी मुक्तकंठाने स्तुती करताना दिसतात. असे गंभीर विनोदवीर किती महत्त्वाचे असतात हे लक्षात यावे यासाठीच हा प्रपंच.