कुछ तो मजबूरियाँ

ऊर्दू शेर, संस्कृत श्लोक यांचा पायरव संसदेत पुन्हा उमटू लागला आहे..

संरक्षणमंत्री अरुण जेटली
हिंदी कवितांसोबतच ऊर्दू शेर, संस्कृत श्लोक यांचा पायरव संसदेत पुन्हा उमटू लागला आहे..

वेदना जेवढी सुरेख बोलते तेवढे सुख बोलत नाही, असे तुझे आहे तुजपाशीमधील काकाजी म्हणतो. खरेच असावे ते बहुधा. ज्यांना या विधानाच्या सत्यासत्यतेवर संशय आहे त्यांना आपल्या संसदीय कामकाजाचा दाखला द्यायला हवा. इंडियन एक्स्प्रेस या आमच्या दैनिक भावंडाने खासदारांच्या काव्यबहराचा आज दिलेला वृत्तांत मोठा रोचक आहे. इतका की साहित्य परिषदेस वा अन्य तत्सम संस्थेस आपली संसदीय शाखा काढावी किंवा काय असा मोह व्हावा. आपले लोकप्रतिनिधी हे अलीकडे संसदेत भाष्य करताना काव्याचा अधिकाधिक आधार कसा घेऊ लागलेत, याचा हा वृत्तांत. या वृत्तांतानुसार यंदाच्या वर्षी लोकसभेत आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधींच्या भाषणांतून तब्बल १०६ कविता आणि २६ शेर किंवा दोहेवजा काव्यपंक्ती सादर झाल्या आहेत. परंतु भाजप सत्तेवर असूनही, या पक्षात भगवे वस्त्रधारी असूनही श्लोक मात्र फक्त सहाच सादर झाले आहेत. यातील दोन श्लोक तर एकाच व्यक्तीने सादर केलेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ते श्लोक सादर करणारे गृहस्थ. बाकी सादर झाल्या त्या कविता आणि शेरोशायरी.

हे अद्भुतच म्हणायचे. संधी मिळेल त्या क्षेत्रातील घोटाळा, प्रतिस्पध्र्यास मिळेल त्या मार्गाने केवळ पराभूतच नव्हे तर नेस्तनाबूत करणारी वृत्ती, आधी पक्षांतील विरोधकांशी दोन हात आणि नंतर मतदारांशी झोंबाझोंबी, ते करताना खर्चाची मर्यादा पाळली जात असल्याचे नाटक आदी अनेक गोष्टी साध्य केल्यानंतरही या खासदार म्हणवून घेणाऱ्यांतील काव्यगुण शिल्लक राहतात हीच मुळात हर्षवायू व्हावा अशी बातमी. ती वाचून मन सद्गदित झाल्याखेरीज राहणार नाही. लोकसभेत सरासरी दहा ते १३ खासदार असे आहेत की आपल्या मुद्दय़ाची परिणामकारकता साध्य करण्यासाठी ते काव्याचा आधार घेतात. यांच्या काव्याला बहर येतो तो संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात. साहजिकच म्हणायचे ते. त्या वेळी खुद्द अर्थमंत्रीच आपल्या अचकनला गुलाबाचे फूल डकवून आलेला असतो आणि कापल्या ‘कर’वाल्यांना कवितांचा आधार देण्याचा प्रयत्न करतो. अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग आवर्जून शेरोशायरी ऐकवीत. अनेकांना कदाचित ठाऊक नसावे. परंतु मनमोहन सिंग आणि पत्नी गुरशरण कौर हे दोघेही उत्तम काव्याचे रसिले भोक्ते. नवी दिल्लीतील अनेक मुशायरे वा खासगी काव्यशास्त्र महफिलींना दोघेही आवर्जून जातात. पंतप्रधान असताना भाजपच्या विखारी विरोधाचा सामना करताना सिंग थेट गालिबची साक्ष काढत म्हणाले होते :

हमको उनसे वफा की हैं उम्मीद

जो नहीं जानते जफा क्या हैं

सिंग यांची ही काव्यपरंपरा अर्थमंत्री म्हणून यशवंत सिन्हा यांनीही चालवली. आर्थिक सुधारणांच्या आव्हान प्रवाहात सरकारला झोकून देताना सिन्हा एकदा म्हणाले होते..

वक्त का तकाजा हैं के जूझमे तूफान से

कहा तक चलोगे किनारे किनारे

त्यांच्यानंतर पी चिदंबरम यांनी संसदीय काव्यऊर्मी आपल्या स्वच्छ धवल मुंडूमध्ये लपेटली. त्यामुळे काव्यधारा दक्षिणेकडे वळवली. म्हणजे आपल्या प्रत्येक अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी काव्याचा दाखला दिला तो तामिळ कवी थिरुवेल्लुर यांचा. हा ‘द्राविडी प्राणायाम’ अनेकांच्या डोक्यावरून जाणार हे उघड असल्याने चिदंबरम हे काव्यओळींचा इंग्रजी अनुवाद देत. पण त्यातून थेट काव्यानंद मिळणे जरा अंमळ जडच जात असे. त्यांच्यानंतरचे अर्थमंत्री अरुण जेटली. त्यांच्यावर संघाचे राष्ट्रनिर्माण आदींचे संस्कार. भले जेटली यांची जीवनशैली आलिशान असेल. पण त्यांची काव्य अभिव्यक्ती ‘पद्य’ यापेक्षा अधिक पुढे गेली नसावी असे दिसते. आपल्या यंदाच्या अर्थसंकल्पात जेटली म्हणाले :

इस मोड पर ना घबराकर थम जाईये आप

जो बात नई हैं उसे अपनाइये आप.

या काव्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर किती झाला ते आपण पाहतोच आहोत. पण त्या ओळी नितीश कुमार यांनी मनावर घेतल्या असाव्यात. ते न घबराकर एकदम नई बात अपनायला तयार झाले. वास्तविक नितीश कुमार यांच्या बिहारातील राजकारणी मोठे रसाळ. पण अलीकडच्या काळात संसदीय आयुध म्हणून त्यांच्यातील कोणी काव्याचा आधार घेतल्याचे स्मरत नाही. ही अलीकडची मंडळी काव्यपंक्ती सादर करतात खरी.. परंतु त्यात काव्याचा तोल नैसर्गिकरीत्या सांभाळलेला असतोच असे नाही. काव्याचे प्रेम वृत्तीत असावे लागते. तर ते वक्तृत्वात सहज व्यक्त होते. अशा सहजतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. त्यांचे साधे वक्तृत्वही मुळात नादमय. गेयता नैसर्गिकच. त्यामुळे वाजपेयी बोलू लागले की राजकीय शत्रूंना देखील त्यांचे भाषण ऐकत राहावे असे वाटे. त्यांच्याइतका काव्यमय पंतप्रधान पाहायला मिळणे अवघडच. त्यांचे उत्तराधिकारी- एक काव्यसंग्रह नावावर असलेले नरेंद्र मोदी हे कधीक्वचित कवितेचे बोट धरताना दिसतात. उदाहरणार्थ अलीकडे त्यांनी निदा फाजली (हो हो.. तेच ते विख्यात उर्दू शायर) यांच्या काव्यपंक्तीचा आधार घेतला. मोदी म्हणाले :

सफर में धूप तो होगी, जो चल सको तो चलो

सभी हैं भीड में, तुम भी निकल सको तो चलो..

यावरून दिसते ते हेच की मोदी कवितेशीही ‘येतेस तर ये.. नाही तर हा मी चाललो’ याच सुरात बोलताना दिसतात.

भाजपमध्ये असूनही अलीकडच्या काळातील सर्वाधिक काव्याधार घेणारा राजकारणी म्हणजे डॉ. रमेश पोखरियाल ऊर्फ ‘निशंक’. हे मुळात साहित्याचेच विद्यार्थी. तीसेक पुस्तके आहेत त्यांच्या नावावर. संसदेत होते तेव्हा सर्वाधिक कविता सादर करणारा खासदार अशीच त्यांच्या नावावर नोंद आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना हे पोखरियाल एकदा म्हणाले :

तुम क्या जानो आजादी क्या होती हैं

तुम्हें मुफ्त में मिली है, न कोई कीमत चुकाई हैं.

तसे पाहू गेल्यास स्वातंत्र्यलढय़ात भाजप वा त्याआधीच्या जनसंघ आदींचा तसा वाटा कमीच होता. त्यामुळे भाजप नेत्याने दुसऱ्यास फुकट स्वातंत्र्य मिळाल्याचे बोल लावावेत हे जरा अतिच म्हणता येईल. परंतु आपल्याकडे जे नाही ते आहे असे वाटायला लावणे हेच काव्यशक्तीचे वैशिष्टय़ नव्हे काय?

बहुधा आपल्या लोकप्रतिनिधींना याच गुणापोटी काव्याचा आधार घेण्याची गरज वाटत असावी. उदाहरणार्थ सीताराम येचुरी. हे कडवे डावे. तरीही वेद उपनिषदांना उद्धृत करण्यात सर्वात पुढे असतात ते येचुरी. ग्रीक ते भारतीय परंपरा यांचा इतिहास हा येचुरी यांचा अभ्यास विषय आणि त्याची प्रचीती त्यांच्या विविध भाषणांतून येते. कपिल सिबल, ममता बॅनर्जी हे देखील बा वर्तनातून काव्याशी काहीही संबंध न राखणारे राजकारणी; पण वैयक्तिक आयुष्यात काव्यप्रेमी आहेत. कवी आहेत. त्यांच्या भाषणात कविता येतात. असेच दुसरे कश्मिरी गुलाम नबी आझाद. सध्या जे रस्त्यावर गोप्रेमाचे हिंसक राजकारण सुरू आहे, त्यावर काळजी व्यक्त करताना आझाद यांनी शकील बदायुनी यांच्या..

मेरा अज्म इतना बुलंद है

कि पराये शोलों का डर नहीं

मुझे खौफ आतिश ए गुल से है

ये कही चमन को जला न दें..

या एकमेवाद्वितीय अशा बेगम अख्तर यांचा स्वर लाभलेल्या अजरामर गजलेचा दाखला दिला.

एरवी ही अशी उदाहरणे कमीच. या मंडळींच्या काव्यप्रेमाचा सुसंस्कृत आणि सालंकृत नजारा भारतीयांना तसा क्वचितच अनुभवायला मिळतो. कायम समोर येते ते घृणास्पद राजकारण, त्यातील स्पर्धा आणि राजकीय चर्चेची दिवसागणिक घसरत जाणारी पातळी. हे असे का होत असावे? यांच्यातील ही सुसंपन्न काव्यश्रीमंती एरवी कुठे गायब होत असावी? त्याचे उत्तर बहुधा..

कुछ तो मजबूरिया रही होंगी..

आदमी यूँही बेवफा नहीं होता

या काव्यपंक्तीतच दडलेले असावे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shayari in the parliament by ministers

ताज्या बातम्या