आतला आवाज, पंतप्रधानपद नाकारणे वगैरे मुद्दय़ांमुळे सोनिया गांधी यांनी आपल्या प्रतिमेला कोठेही धक्का लागणार नाही, अशी व्यवस्था केली होती. हेराल्ड प्रकरणामुळे ती व्यवस्थाच उद्ध्वस्त होईल, इतके ते नैतिकदृष्टय़ा गंभीर आहे..

काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांचे आजेसासरे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राची मालकी अपारदर्शकपणे हस्तांतरित केल्याबद्दल सोनिया गांधी आणि पं. नेहरू यांचा पणतू चि. राहुलबाबा यांना १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. हे न्यायालयात जाणे टळावे यासाठी त्यांनी केलेली याचिका वरिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे हे दोघे नाराज आहेत. काँग्रेस पक्षात नेता नाराज असला की अनुयायांनाही सुतक पाळावे लागते आणि आपण ते पाळत असल्याचे दाखवावे लागते. आपली नाराजी आणि निष्ठा प्रदíशत करण्याचा सोपा, सुरक्षित आणि स्वस्त मार्ग संसदेच्या सभागृहातून जातो, हे काँग्रेसजनांना माहीत असल्याने त्यांनी आपला राग लोकसभा कामकाजावर काढला. संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यात काँग्रेसजनांनी अडथळे आणले असून हा सरकारच्या दमनशाहीचा निषेध आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गेले काही दिवस मोदी सरकार वस्तू आणि सेवा कराच्या मंजुरीसाठी काँग्रेसजनांच्या नाकदुऱ्या काढत होते. त्यातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संबंध मधुर नाही तरी निदान कामचलाऊ सुसंवादी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. बिहार विधानसभा निवडणुकांनी दिलेला दणका आणि पाठोपाठ गुजरातेतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत बसलेला फटका यामुळे नाही म्हटले तरी मोदी सरकार नरमले होते. त्यामुळे कधी नव्हे ती पडती बाजू घेऊन त्यांनी विरोधकांकडे, म्हणजे काँग्रेसजनांकडे, मदतीचा हात पुढे केला. त्यातूनच सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी यांच्या निवासस्थानी गेल्या आठवडय़ात चर्चा केली. त्यातूनच संसदेचे तुंबलेले कामकाज मार्गी लागेल अशी आशा होती. त्यात आता या नॅशनल हेराल्ड प्रकरणाने खोडा घातला. वास्तविक ते काढण्यामागे सरकारचा काही हात नाही. त्यामागे आहेत सुब्रमण्यम स्वामी हे उचापती गृहस्थ. ते सध्या जरी भाजपमध्ये असले तरी गांधी मायलेकांविरोधात त्यांनी याचिका केली तेव्हा ते जनता पक्षात होते. तेव्हा त्या अर्थानेही गांधी मायलेकांना भाजपला दोष देता येणार नाही. आणि दुसरे असे की या सगळ्या प्रकरणाशी संसदेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तेव्हा पूर्वायुष्यातील कोणा एका आíथक व्यवहारासाठी न्यायालयाने हजर राहण्याचा आदेश दिला म्हणून संसदेस वेठीस धरणे ही शुद्ध लबाडी झाली. ती केल्याबद्दल सोनिया गांधी आणि चि. राहुलबाबा यांना काही प्रश्न विचारणे हे कर्तव्य ठरते.
यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हजारो कोटी रुपये किमतीची ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ या कंपनीची मालकी काहीही कारण नसताना ‘यंग इंडियन्स’ नावाच्या कंपनीकडे वर्ग करताना सोनिया गांधी यांचा जगप्रसिद्ध आतला आवाज अचानक गायब कसा झाला? या ‘यंग इंडियन्स’ नावाच्या कंपनीत सोनिया आणि चि. राहुलबाबा यांचीच ७६ टक्क्यांची मालकी आहे. ‘असोसिएटेड जर्नल्स’ या कंपनीतर्फे ‘नॅशनल हेराल्ड’ हे दैनिक प्रसिद्ध केले जात होते. त्याची कंपनी ‘यंग इंडियन्स’कडे वर्ग झाल्यामुळे या वर्तमानपत्राची आणि दिल्लीत ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या त्याच्या प्रचंड मालमत्तेची मालकी गांधी मायलेकांकडे गेली. २००४ साली पंतप्रधानपदाकडे निघालेल्या सोनिया गांधी यांना आतल्या आवाजाने तसे करण्यापासून रोखले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांची कथित नतिकता आणि आतला आवाज हे मुद्दे काँग्रेसभाट वर्तुळात प्रात:स्मरणीय मानले जातात. परंतु ही हजारो कोटींची मालमत्ता आपल्या नावावर करताना सोनिया गांधी यांचा विख्यात आतला आवाज कसा काय गेला, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न चि. राहुलबाबांनी करण्यास हरकत नाही. नाही तरी एरवीही ते स्वत:ची नतिकता मिरवण्याचा प्रयत्न करीत असतातच. मोदी सरकार हे भांडवलदारांचे हित पाहणारे आहे, असा त्यांचा आरोप असतो. तो खरा मानला तरी एक प्रश्न उरतोच. हा हजारो कोटींचा व्यवहार करताना गांधी पितापुत्रांनी मग कोणाचे हित पाहिले? भ्रष्टाचारी राजकारण्यांवर कारवाई प्रस्तावित करणारे विधेयक पुढे रेटण्यास मनमोहन सिंग सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा निषेध नतिकतेचे मुकुटमणी चि. राहुलबाबा यांनी जाहीरपणे केला होता आणि त्या विधेयकाचा मसुदा दूरचित्रवाणी कॅमेऱ्यांसमोर फाडून आपल्या नतिकतेची द्वाही फिरवली होती. तेव्हा कॅमेऱ्यासमोरची त्यांची ही नतिकता कॅमेऱ्यांमागे हा हजारो कोटींचा व्यवहार करताना कशी काय गुप्त झाली? की कॅमेऱ्यासमोरची नतिकता वेगळी आणि कॅमेऱ्यामागची वेगळी असे चि. राहुलबाबांना वाटते? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असू शकते. कारण नतिकतेच्या मुद्दय़ावर कॅमेऱ्यासमोर प्रश्न विचारल्यास कशी प्रतिक्रिया द्यायची हे चि. राहुलबाबांचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांनी याआधी दाखवून दिलेलेच आहे. वास्तविक दिल्लीस्थित एक बडा बिल्डर अशीच कोटय़वधी रुपयांच्या मालकीची जागा वढेरा यांना कवडीमोलात देत होता, तेव्हाही गांधी मायलेकांची नतिकता सुटीवर गेली होती. हे का आणि कसे झाले याची उत्तरे नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या निमित्ताने गांधी मायलेकांना द्यावी लागणार आहेत. ती न देता आपण संसदीय कामकाज रोखून मोदी सरकारसमोर पेच निर्माण करू शकू असा जर त्यांचा समज असेल तर तो शुद्ध भ्रम आहे.
याचे कारण या हेराल्ड प्रकरणाने खरा पेच गांधी मायलेकांसमोरच उभा राहणार आहे. आतला आवाज, पंतप्रधानपद नाकारणे वगरे मुद्दय़ांमुळे सोनिया गांधी यांनी आपल्या प्रतिमेला कोठेही धक्का लागणार नाही, अशी व्यवस्था केली होती. हेराल्ड प्रकरणामुळे ती व्यवस्थाच उद्ध्वस्त होईल, इतके ते गंभीर आहे. त्या बाबतच्या कायदेशीर मुद्दय़ांवर न्यायालय काय तो निर्णय घेईलच. पण खरे गंभीर मुद्दे नतिकतेचे आहेत आणि ते अधिक गंभीर आहेत. या प्रकरणात जे काळेबेरे दिसते ते जर सिद्ध झाले तर सोनिया गांधी यांच्या संघटनेवरच्या अधिकारालाच ओहोटी लागेल. भ्रष्टाचारास सोकावलेल्या आणि आतापर्यंत विविध प्रकरणांत आकंठ बुडालेल्या काँग्रेसजनांना अध्यक्षा सोनिया गांधी ‘आपल्यातल्याच’ वाटू लागतील. तसेच नवी काँग्रेस संस्कृती घडवण्याच्या चि. राहुलबाबा यांच्या प्रयत्नांनाही मोठी खीळ बसेल. ते आव्हान आतापर्यंतच्या राजकीय पराभवाने निर्माण झालेल्या आव्हानापेक्षा गंभीर असेल. या घटकेस काँग्रेसला अधिक काळजी आहे ती हीच.
त्याचमुळे आपल्यावरील न्यायालयीन कारवाईमागे मोदी सरकारची सूडबुद्धी आहे, असा कांगावा काँग्रेसजनांनी सुरू केला असून त्यामुळे आपल्या कृत्यावरील लक्ष मोदी सरकारच्या असहिष्णुतेकडे वळवता येईल, असे या मायलेकांना वाटते. आणीबाणीनंतर निवडणुकांत पराभूत झालेल्या दिवंगत इंदिरा गांधी यांना तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सूडबुद्धीने जी वागणूक दिली आणि ज्यामुळे इंदिरा गांधी यांचे पुनरागमन झाले त्याच्या आठवणी या संदर्भात जागवल्या जात आहेत. सोनिया गांधीही तसे करू शकतील अशी आशा काँग्रेसजन बाळगून आहेत. परंतु हा शुद्ध कल्पनाविलास आहे. याचे कारण या दोन घटनांची तुलनाच हेाऊ शकत नाही. सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरू आहे ती न्यायालयीन कारवाई आहे आणि ती मोदी यांच्या आगमनाआधीच मार्गी लागली आहे. दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावरील कारवाईमागे सरकार होते. सोनियांच्याबाबत ते नाही. तेव्हा इतिहासाची अशी पुनरावृत्ती होत नाही. मी इंदिरा गांधी यांची सून आहे, असे सांगून ती करण्याचा प्रयत्न सोनिया गांधी यांनी केला खरा; पण तो निश्चित वाया जाईल. सोनिया गांधी या दिवंगत इंदिराबाईंच्या सूनबाई निश्चितच, पण तितक्या स्मार्ट मात्र नाहीत. काँग्रेसजनांना लवकरच याची जाणीव होईल.