पुतिन यांनी रशियावर राज्य केले ते केवळ राष्ट्रवाद चेतवून आणि रशियन अस्मितेचा खोटा अहंकार फुलवून..

रशियाच्या अध्यक्षपदी फेरफेर निवड झाल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचे सर्वप्रथम अभिनंदन करणाऱ्यांत चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग होते यात अजिबात आश्चर्य नाही. आपण मरेपर्यंत अध्यक्षपदी राहू अशी तरतूद जिनिपग यांनी नुकतीच केली. पुतिन त्याच वाटेवर निघाले आहेत. या निवडणूक निकालानंतर ते आणखी सहा वर्षांसाठी अध्यक्षपदी राहतील. म्हणजे २०२४ साली त्यांची ही अध्यक्षपदाची मुदत संपेल त्या वेळी रशियाच्या सत्ताप्रमुखपदाची त्यांची २४ वर्षे पूर्ण होतील. इतका काळ रशियात सत्ता उपभोगली ती फक्त स्टालिन यानेच. १९२९ ते १९५३ अशी २४ वर्षे स्टालिनसत्तेची होती. पुतिन यांचे आरोग्य पाहता ते हा विक्रम सहज मोडतील. तिकडे चीनमध्ये अध्यक्ष क्षी जिनिपग हे माओंशी स्पर्धा करू पाहतात. माओ यांनी २६ वर्षे सत्ता भोगली. जिनिपग २००८ पासून सत्तेवर आहेत आणि त्यांनी अलीकडे केलेल्या घटनादुरुस्तीद्वारे तहहयात अध्यक्षपद भोगण्याची व्यवस्था केली आहे. जिनिपग हे दुसरे माओच कसे आहेत याचे गुणगान करणारे लेख सरकारी मालकीच्या दैनिकात चीनमध्ये प्रकाशित झाले. रशियात आरटी (रशियन टेलिव्हिजन : ही वृत्तवाहिनी आपल्याकडे दिसते) या वाहिनीच्या संपादकांनी अलीकडेच पुतिन यांचे वर्णन खरा क्रांतिकारक असे करणारा लेख लिहिला. तेव्हाच रशियन जनतेने या निवडणुकांच्या निकालाबाबतचे कुतूहलही सोडून दिले. अशा तऱ्हेने पुतिन हे जिनिपग यांना समानधर्मी वाटले असल्यास नवल नाही. दोघेही समानधर्मी आणि समान शीलाचे. तेव्हा पुतिन यांच्या या निवडणुकी दिग्विजयाचे कौतुक आणि महत्त्व जिनिपग यांना जाणवले असल्यास नवल नाही.

पुतिन यांना या निवडणुकीत जवळपास ७६ टक्के इतकी मते पडली. म्हणजे २०१२ सालच्या निवडणुकीपेक्षाही अधिक. याचा अर्थ या काळात पुतिन यांची लोकप्रियता वाढली असा जर कोणी करीत असेल तर तो सत्यापलाप ठरेल. रशियात निवडणुका या लुटुपुटुच्या म्हणता येतील अशा असतात. लोकांनी मते द्यायलाच हवीत असे काही बंधन त्यात नसते. पुतिन यांच्या सुरुवातीच्या काळात तर निवडणुकांत ९० टक्के वा अधिक मतदान झाल्याची नोंद आहे. तीदेखील नागरिक घराबाहेर न पडताच. तेव्हा निवडणुका आणि राजकीय वास्तव यांचा काही संबंध असलाच तर तो उलट आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदान ६७ टक्के झाले. यापैकी ७६ टक्के यांच्या मते पुतिन हेच लायक आहेत. पुतिन यांच्या विरोधात उभे असलेले साम्यवादी पक्षाचे पावेल ग्रुडिनीन यांना १२ टक्के इतकी मते मिळाली तर स्थानिक एका पक्षाचे व्लादिमीर जिनिव्होस्की यांना साडेपाच टक्क्यांनी कौल दिला. परंतु हे सर्व तसे शोभेचेच. कारण निवडणूकपूर्व काळात जे लोकप्रिय होते ते अलेक्सी नोव्होल्नी यांना या निवडणुकीत बंदी होती. या अलेक्सी यांनी गेले काही महिने रशियात भ्रष्टाचारविरोधात आंदोलन चालवले होते आणि त्यांना जनतेचा चांगलाच पाठिंबा होता. परंतु त्यांना तेथील निवडणूक आयोगाने रिंगणात उतरल्यापासून रोखले. त्यावर त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची हाक दिली. तीस काही फारसा प्रतिसाद लाभला नाही आणि समजा तो लाभला जरी असता तरी त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता नव्हती.

हे पुतिन यांच्या रशियाचे वैशिष्टय़. आभास लोकशाहीचा. परंतु प्रत्यक्ष मात्र एकाधिकारशाही. तीदेखील क्रूर आणि कराल अशी. या प्रारूपाचे वर्णन पाश्चात्त्य भाष्यकारांनी मतपेटीतील हुकूमशहा असे केले आहे. ते रास्त आहे. एकविसाव्या शतकास प्रारंभ होताना २००० सालच्या मे महिन्यात रशियाच्या राजकीय पटलावर पुतिन झळकले. त्याआधी काही काळ ते पंतप्रधान होते आणि त्याआधी बराच काळ रशियाच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख. त्यांच्या या कारकीर्दीविषयी बरेच प्रवाद आहेत आणि वास्तव काय आहे हे पुतिन सोडल्यास कोणालाच माहीत नाही. ते होण्याची शक्यताही नाही. पंतप्रधानपद हाती आले तेव्हा रशियात अध्यक्ष होते बोरीस येल्तसिन. मद्यपी, स्वत:च्या शरीरावर नियंत्रण नसलेला आणि बेभरवशाचा म्हणून जगभर लौकिक झालेला हा इसम ही रशियनांना लाज वाटणारी घटना होती. त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस रशियन अर्थव्यवस्थेचेही बंबाळे वाजलेले. अशा वेळी आपल्या हातचे प्यादे म्हणून येल्तसिन यांनी पुतिन यांना पुढे केले. या पंतप्रधानपदाच्याच काही महिन्यांच्या काळात पुतिन यांनी चेचेन बंडखोरांविरोधात जी काही मोहीम उघडली त्यामुळे सामान्य रशियनांच्या नजरेत ते एकदम नायक ठरले. अरेला त्याहूनही मोठय़ा आवाजात कारे असे म्हणणारा आणि प्रसंगी थेट अरे म्हणणाऱ्यास गोळ्याच घालणारा हा सरकारप्रमुख अशक्त येल्तसिन यांच्या पाश्र्वभूमीवर चांगलाच लोकप्रिय ठरला. परंतु ही लोकप्रियता आखीव होती. म्हणजे चेचेन बंडखोरांविरोधातील त्यांची मोहीम हा शुद्ध बनाव होता. इस्रायलने अरबांना चेचण्यासाठी जशा काही दहशतवादी घटना घडवून आणल्या तशाच प्रकारे चेचेन बंडखोर हे दहशतवादी कृत्ये करीत असल्याचे चित्र पुतिन यांनी तयार केले. प्रत्यक्षात ती सारी कृत्ये रशियन गुप्तहेरांनीच केली होती. परंतु हे उघड होण्यास वेळ लागला. तोपर्यंत पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत पुतिन विजयी झाले. या मे महिन्यात त्यास १८ वर्षे होतील.

या १८ वर्षांत पुतिन यांनी राज्य केले ते केवळ राष्ट्रवाद चेतवून आणि रशियन अस्मितेचा खोटा अहंकार फुलवून. येल्तसिन यांना पाश्चात्त्यांच्या मानवंदनेची आस होती. अमेरिका नियंत्रित नाटो या राष्ट्रसमूहात आपणास सामील करून घ्यावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे रशियाची देशांतर्गत प्रतिमा ही काहीशी लाचार अशी झाली होती. पुतिन यांनी तीच बदलली. त्यासाठी त्यांनी पाश्चात्त्यांनाच टोलवायला सुरुवात केली. लोकशाहीचा आग्रह वगैरे धरणारे हे पाश्चात्त्य कसे आपल्यासाठी निरुपयोगी आहेत हे त्यांनी यशस्वीपणे दाखवून दिले. यास साथ मिळाली ती वाढत्या खनिज तेल दरांची. रशिया हा सौदी अरेबियाखालोखाल तेलसाठे असलेला देश. तेलाच्या दरांमुळे पुतिन यांना बख्खळ पसा आला. तो त्यांनी अनुदाने आदींसाठी खर्च केला. त्यामुळे साहजिकच गरीब आणि मध्यमवर्गीय त्यांच्यावर खूश झाले. श्रीमंतांना त्यांनी पसा कमाविण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवले. त्यामुळे तेही पुतिन यांच्यावर प्रसन्न. सोबत राष्ट्रवादाचे देशप्रेमी बाळकडू. त्यामुळे पुतिन यांची लोकप्रियता चढतीच राहिली. तशीही रशियात लोकशाही नव्हतीच. जी काही होण्याची शक्यता होती ती पुतिन यांनी विरोधकांना नष्ट करून संपवून टाकली. तथापि पुतिन यांच्या यशाचे मर्म काय?

रशियन अभ्यासकांच्या मते दोयारूष्का हे रशियन लोणी. हे पारंपरिक रशियन पद्धतीने बनवले जाणारे लोणी रशियात अचानक लोकप्रिय झाले. का? तर या स्वदेशी लोण्याचा प्रोपगंडा व पुरस्कार पुतिन यांनी केला आणि रशियनांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी गोष्टीच कशा वापरायला हव्यात हे सांगण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात हे लोणी न्यूझीलंडकडून आयात होते. पण पुतिन यांचे प्रचारतंत्र इतके ताकदीचे की या आणि अशा कथित स्वदेशी वस्तू रशियात प्रचंड लोकप्रिय झाल्या. या कथित स्वदेशी वस्तूंचे स्थानिक निर्माते हे पुतिन यांचे बगलबच्चे आहेत. पण सामान्य रशियनांना हे कळतही नाही आणि ज्यांना कळते त्यांना काही करताही येत नाही. तात्पर्य : रशियनांच्या नशिबातील हा पुतिन्जली योग २०२४ नंतरही संपण्याची चिन्हे नाहीत.