भिंत बर्लिनची.. आणि चीनची!

बर्लिनभिंत पडण्यातून एकत्रीकरणाची जी आस दिसून आली, तिच्यामुळे आकांक्षांचे जे तरंग जगभर उमटले, त्यापैकी बरेच तरंग आज विरून गेलेले आहेत.

बर्लिनभिंतीच्या पाडावाची तिशी साजरी होत असल्याचा आनंद असताना, जगातील अन्य अदृश्य भिंतींकडे लक्ष जाणे अपरिहार्य आहे..

नवनव्या अदृश्य भिंती बांधणारा हा कोतेपणा दूर करण्याचा कृतिकार्यक्रम आजच्या जगात कुणाकडे दिसत नाही, अगदी ‘विश्वगुरू’ होऊ पाहणाऱ्या भारताकडेही नाही..

पत्रकारांशी बोलताना राजकीय उच्चपदस्थांनी केलेली विधाने काय उत्पात घडवू शकतात, याचा पुरावा म्हणजे बर्लिनची भिंत! ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी ही भिंत पडली आणि इतिहास घडला, त्या घटनेस यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिन शहराची वाटणी साम्यवादी पूर्व जर्मनी आणि उदारमतवादी पश्चिम जर्मनी यांच्यात झाली आणि पश्चिम जर्मनीकडील बर्लिनचा तुकडा साम्यवादी जर्मनीने वेढला गेला. तो वेढा अभेद्य राहावा, साम्यवादी जर्मनीच्या नागरिकांना नोकऱ्यांच्या वा अन्य आकर्षणापायी उदारमतवादी जर्मनीत जाता येऊच नये, यासाठी ऑगस्ट १९६१ मध्ये रातोरात ही सुमारे दीडशे किलोमीटर लांबीची भिंत साम्यवादी राज्यकर्त्यांनी बांधली होती. साम्यवादी राजवटींच्या पोलादी पडद्याची खूण म्हणून या भिंतीकडे पाहिले जाई. ती पडली. लोकांनीच पाडली. शांततामय क्रांती झाली. आणि साम्यवादाचा अस्त झाला. किंवा, अस्त झाल्याचे मानले गेले. वास्तविक बर्लिनभिंत पडण्याच्या अवघ्या सहा महिन्यांपूर्वी, ३ व ४ जून १९८९ रोजी चीनने तियानानमेन चौकात विद्यार्थी आंदोलकांवर रणगाडे घालून साम्यवादी दडपशाही कशी जिवंत आहे, याचा पुरावा दिला होता. मानवतेला काळिमा फासणाऱ्या तियानानमेनची आठवण खिन्न करणारी, तर मानवतेच्या आकांक्षांना पंख देणाऱ्या बर्लिनभिंत पाडावाची आठवण आनंददायी असते. मात्र आजघडीला जगाची स्थिती केवळ आनंद साजरा करण्याजोगी नाही. याचे कारण, कोतेपणाच्या अदृश्य भिंती जगात आजही आहेत. त्याविषयी ऊहापोह करूच. पण प्रथम पत्रकारांशी बोलताना चूक केलेल्या उच्चपदस्थाविषयी.

गुंटर शाबोवस्की हे ते उच्चपदस्थ. हे जर्मनीच्या सोशालिस्ट युनिटी पार्टीचे प्रवक्ते. पूर्व युरोपातील तत्कालीन साम्यवादी राष्ट्रांमधल्या जनआंदोलनांचा रेटा जर्मनीतही पोहोचल्यामुळे बर्लिनभिंतीवरील पहारे शिथिल करण्याचा निर्णय पक्षाने जनआंदोलनांनंतर घेतला. पण हा निर्णय पत्रकारांना सांगताना शाबोवस्की यांनी ‘भिंत तातडीने खुली होईल’ असे म्हणण्याची चूक केली! मग त्याच रात्री जन-रेटय़ानेच भिंत पडली. त्याहीआधी १९८५-८६ पासून रशियाचे तत्कालीन राष्ट्रप्रमुख मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्रोइका’ – म्हणजे खुलेपणा आणि पुनर्रचना- यांचे सूतोवाच केले, तेव्हापासून साम्यवादाच्या पराभवाची, डाव्यांच्या पाडावाची खूणगाठ अमेरिकादी भांडवलशाही देशांनी बांधली होती आणि त्या वेळी तरुण अमेरिकी विद्वान फ्रान्सिस फुकुयामा यांनी तर ‘एण्ड ऑफ हिस्टरी’चा उद्घोष केला होता. फुकुयामांचा हा निबंध बर्लिनभिंत पाडावाच्या आधीचा; पण भिंत पडल्याने फुकुयामा जणू द्रष्टे भाष्यकार ठरले. डाव्यांचा पाडाव म्हणजे शीतयुद्धाची अखेर. शीतयुद्धच संपल्यावर आजच्या- म्हणजे तेव्हाच्या- जगास एकत्र येण्याचे रस्ते खुले होणार आणि संघर्षच संपल्यामुळे संघर्षांवर आधारलेला ‘इतिहास’सुद्धा संपणार, हा या फुकुयामांचा सिद्धान्त. तो खरा ठरू लागल्याचे पुढल्या ‘जागतिकीकरणा’च्या काळात दिसू लागले. बर्लिनभिंत पडल्याने साम्यवादी जर्मनीचे शासकच उघडे पडले आणि जर्मनीचे एकत्रीकरण सुकर झाले, पुढे युरोपीय संसद आणि ‘युरो’ हे एकच चलन, परस्परांच्या देशांत प्रवेशानुमतीची (व्हिसा) गरज न उरणे, असेही बदल होऊन युरोपचे एकत्रीकरण झाले; पण भिंती उभारण्याचा उद्योग थांबला का? ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ किंवा ‘ब्रेग्झिट’च्या भिंती उभारल्या जाताना आपण पाहतो आहोतच. पण याखेरीज इतर भिंती आहेत.

बर्लिनभिंत पडण्यातून एकत्रीकरणाची जी आस दिसून आली, तिच्यामुळे आकांक्षांचे जे तरंग जगभर उमटले, त्यापैकी बरेच तरंग आज विरून गेलेले आहेत. खुद्द एकीकृत जर्मनीतही, एकेकाळच्या पूर्व जर्मन लोकांना नंतर आलेले आणि पश्चिम जर्मनांना जणू मूलनिवासी समजले जात असल्याच्या तक्रारी दबक्या आवाजात होतात. त्या कमीच आहेत, हे श्रेय जर्मन राज्यकर्त्यांचे आणि लोकांचेसुद्धा! आत्मीयता आणि भेदभाव यांतून आत्मीयतेचीच निवड करणे हे चांगले राजकारण असते. अँगेला मर्केल यांनी हे चांगले राजकारण किती पुढे नेले, याची खूण म्हणजे सीरिया आदी इस्लामी देशांतील निर्वासितांचे त्यांनी केलेले स्वागत. मात्र हे चांगले राजकारण जगभरात पोहोचवणे मर्केल यांना जमले नाही. ती मर्केल यांची जबाबदारी नव्हे आणि कुणा एका राजकीय नेतृत्वाकडून जगाच्या राजकारणाला आकार देण्याची अपेक्षा करणेही बरे नव्हे. आर्थिक कारणे राजकारणाला आकार देत असतात आणि अर्थशास्त्र हे उपलब्ध साधनसंपत्तीचा सर्वोत्तम विनियोग करण्याचे शास्त्र असते. या साधनसंपत्तीच्या उपलब्धतेवर मर्यादा आहेतच आणि विनियोग कसा करावा यामागील विचारही संकुचित होताहेत. अशा वेळी युरोपातील अनेक देशांत लोकानुनयी राजकारणाला बरे दिवस येऊ लागले आहेत. लोकानुनय नेहमीच थोडय़ा लोकांपुरता असतो. अन्य, इतर, उरलेल्या किंवा वगळलेल्या लोकांचा द्वेष करणे ही सध्याच्या लोकानुनयी राजकारणाची मूळ प्रेरणा. म्हणूनच मेक्सिको सीमेवर भिंत बांधणारे ट्रम्प असोत वा ब्रेग्झिटसाठी आकांडतांडव करणारे कालचे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन; सीरियादी देशांतील तेलावर नजर ठेवणारे पुतिन असोत वा चिनी कंपन्यांचे हितरक्षण करण्यासाठी वाटेल त्या थराला जाणारे चिनी राज्यकर्ते, या साऱ्यांची प्रेरणा ही कोतेपणाच्या भिंती बांधण्याचीच ठरते.

नवनव्या अदृश्य भिंती बांधणारा हा कोतेपणा दूर करण्याचा कृतिकार्यक्रम आजच्या जगात कुणाकडे दिसत नाही, अगदी ‘विश्वगुरू’ होऊ पाहणाऱ्या भारताकडेही नाही. अशा वेळी अर्थकारण, राजकारण यांइतकीच महत्त्वाची- पण सहसा दुर्लक्षित ठरणारी- ज्ञानशाखा असलेल्या तत्त्वज्ञानाची वाट पुसावी लागते. जर्मनीने तत्त्वज्ञान-अभ्यासाची परंपरा जिवंत ठेवली आहे. विशेषत: द्वंद्वात्मकता (डायलेक्टिक्स) हे तत्त्व, ही जर्मनीची देणगी मानली जाते. या तत्त्वाचा उद्गाता म्हणून जर्मन तत्त्वज्ञ हेगेलचे नाव घेतले जाते. कार्ल मार्क्‍सने हेच द्वंद्वात्मकतेचे तत्त्व भौतिकवादात वापरून आर्थिक-राजकीय सिद्धान्त रचले. मार्क्‍सचे सिद्धान्त चालणार नाहीत, हे बर्लिनभिंतीच्या तुकडय़ांनी ठणकावलेच. पण द्वंद्वात्मकतेचे तत्त्व मात्र जिवंत राहिले, याचे जर्मनीतलीच ‘फ्रँकफर्ट स्कूल’ ही विद्वत्परंपरा. ‘प्रबोधनकाळा’तल्या महान आदर्शाचे धिंडवडे आज का निघतात, याचा अभ्यास करण्यासाठी प्रसंगी अर्थकारण आणि संस्कृती यांचा आंतरसंबंध तपासणारी ‘क्रिटिकल थिअरी’ ही याच फ्रँकफर्ट स्कूलमधून युरोपात रुजली. जाक डेरिडा हा फ्रेंच तत्त्वज्ञ; पण त्याचे विसंरचना हे तत्त्व या प्रबोधनसमीक्षेला उपयुक्त ठरले. ‘आपल्याला शत्रू म्हणून कुणी तरी हवेच असते’ म्हणणारे उम्बतरे इको किंवा बर्लिनभिंतीच्या संदर्भात ‘साम्यवादी देशांतील आंदोलकांना भांडवलशाही नव्हे तर न्याय आणि स्वातंत्र्य हवे होते’ म्हणणारे स्लावोय झिझेक, ही याच नवतत्त्वज्ञानाच्या परंपरेची आज मननीय असलेली टोके.

सामाजिक शास्त्रे आणि तत्त्वज्ञान यांतील भिंत जर्मनांनी कधीच पाडली होती, म्हणून त्या देशात बर्लिनभिंतीनंतरही एक पिढी सुखाने नांदली. तत्त्वविचार जेथे भिंतबंद असतो, ते देश वंश वा भाषेचा अभिमान बाळगत, इतिहास कुरवाळत राहतील , त्यांना अदृश्य भिंती दिसणारही नाहीत आणि चीनच्या जुन्या प्रचंड भिंतीचा हेवा ते करीत राहतील!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wall of berlin and china akp

Next Story
अग्रलेख : चांदणे शिंपीत जा..
ताज्या बातम्या