एकाच वेळी अनेकांशी संवाद साधण्याचे, त्यांच्या मनाशी नाते जोडण्याचे साधन म्हणजे भाषण.. आपल्या मनातील विचार समोरच्या मनालाही आपले वाटावेत, असे हे कौशल्य ज्याला साधले, त्याला उत्तम वक्ता मानले जाते. आजकालच्या राजकारणात मात्र भाषणकलेचा गाभाच हरवत चालल्याची शंका यावी अशी नवी कला बहराला येऊ लागली आहे. भाषण म्हणजे मनाला येईल ते बोलण्याची आणि श्रोत्यांच्या मनाचा विचार न करता, आपले विचार श्रोत्यांच्या माथ्यावर मारण्याची संधी एवढाच राजकारणी लोकांचा समज असावा, अशी शंका दृढ होऊ लागली आहे. समोर ध्वनिक्षेपक दिसला की त्यांच्या जिव्हालालित्याला बहर येतो, आणि जिभेला लगाम नसणे म्हणजे काय, याचा अर्थ श्रोत्यांना उमगू लागतो. जीभ घसरणे, जीभ सैलावणे, असे अनेक वाक्प्रचार अशा बेभान भाषणांमुळेच प्रचलित झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या भाषणाने श्रोत्यांना खिळवून ठेवणारे, सहज संवाद साधत श्रोत्यांच्या मनाचा सहज कब्जा घेणारे अनेक वाक् चतुर वक्ते आहेत. पण ही परंपरा पुढे टिकणार का, ही चिंतेची बाब आता गडद होऊ लागली आहे. मुठी आवळत, बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करीत, हातवारे करीत धमकीच्या सुरात बोलणे ही राजकीय भाषणाची परंपरा होऊ घातली आहे. त्यामुळे ‘भाषणकले’चा अस्त होऊन ‘भाषणबाजी’चा उदय होऊ लागला आहे. अशा भाषणबाजीत जिभा घसरतात, सैलावतात आणि कधी कधी वाहवतही जातात. असे झाले आणि त्या वक्त्याचे वाभाडे निघू लागले, की ‘भलतेच बोलून गेलो’, याची नाटकी खंत व्यक्त करण्यावाचून पर्याय राहत नाही. निसर्गाच्या प्रकोपापुढे सरकार काहीच करू शकत नाही, हे सर्वानाच माहीत असते. तरीही महाराष्ट्रातील दुष्काळाच्या काळात अशोभनीय भाषणबाजी करून स्वत:चे हसे करून घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नंतर ‘आत्मक्लेश’ करून घेण्यासाठी उपवास करण्याची वेळ आली होती, हे महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. आत्मक्लेशातून ‘चित्तशुद्धी’ व्हावी अशी अपेक्षा असते. अजित पवार यांच्या आत्मक्लेशांनंतर त्यांची चित्तशुद्धी झाली किंवा नाही, याचे उत्तर मिळण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागलेली नाही. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या अमानवी घटनेनंतर    सर्वत्र संतापाची लाट उसळली. बलात्काऱ्यांना कोणती शिक्षा द्यावी, यावर अत्यंत तिखट चर्चाही झडल्या. सामान्यांमधून उमटलेल्या प्रतिक्रियांना संतापाची किनार असल्याने, त्यामागील टोकाच्या भावना समाजाने समजूनही घेतल्या. कारण अशा गुन्ह्य़ांना शिक्षा करण्याचे काम कायद्याचे असते, आणि कायदा आपले काम सचोटीने पार पाडत असतो, यावर सामान्य जनतेचा विश्वास असतो आणि या विश्वासाला धक्का लागू नये, याचे भान राजकीय क्षेत्रातील जबाबदार नेत्याला असावे लागते. जालना जिल्ह्य़ातील भोकरदन येथील जाहीर मेळाव्यात सोमवारी अजितदादांची जीभ पुन्हा एकदा घसरली. बलात्काऱ्याचे अवयव कापून टाकले पाहिजेत,  असे ते तावातावाने म्हणाले. आत्मक्लेशानंतरही चित्तशुद्धी होतेच, या समजुतीलाच आता जिभांच्या बेलगामपणामुळे तडा गेला आहे.  ‘आत्मक्लेशा’वरील विश्वास कसा टिकणार याची नवी चिंता आता जन्माला येऊ घातली आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?