एकविसाव्या शतकात अंतराळ, संगणकीय व इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रात सरस ठरण्यासाठी प्रत्येक देशाची जय्यत तयारी सुरू असली तरी प्रत्यक्ष जमिनीवर लढल्या जाणाऱ्या युद्धाचे महत्त्व यत्किंचितही कमी झालेले नाही. उलट जवळपास प्रत्येक संरक्षण दल जमिनीवरील युद्धतंत्रात निपुण होण्यासाठी धडपड करीत आहे. दहशतवाद्यांनी स्वीकारलेल्या गनिमी तंत्रामुळे समोरासमोरील ही लढाई आता अधिक जोखमीची झाली आहे. या लढाईत सर्वाधिक वापर होणाऱ्या ‘एके ४७’  रायफलचे जनक मिखाईल कलाश्निकोव्ह यांच्या निधनामुळे या रायफलच्या कामगिरीस उजाळा मिळाला आहे. संरक्षण सामग्रीच्या निर्मितीत रशियाचा दबदबा सर्वज्ञात आहे. जगात सर्व घटकांकडून पहिल्या पसंतीची पावती लाभलेली ‘एके ४७’ हीदेखील विघटन होण्यापूर्वीच्या सोव्हिएत युनियनची देन. या रायफलचा शोध लागण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या बंदुकीची क्षमता मर्यादित होती. अचूक लक्ष्यभेद आणि वजनाने हलकी ही एके ४७ रायफलची वैशिष्टय़े. १९३८ मध्ये रशियन सैन्यदलात भरती झालेले कलाश्निकोव्ह दुसऱ्या महायुद्धादरम्यान जखमी झाले होते. त्या वेळी जर्मनीच्या अत्याधुनिक रायफलसह इतर शस्त्रास्त्रांचा सामना करताना रशियन सैन्याला अडचणींचा सामना करावा लागत असे. रुग्णालयात उपचार घेत असताना एका रशियन सैनिकाने आपण जर्मनीचा सामना करणारी रायफल का तयार करू शकत नाही, असा सवाल केल्यावर कलाश्निकोव्ह यांनी त्या दृष्टीने काम सुरू केले. त्यांनी तयार केलेली रायफल प्रारंभीच्या काळात ‘कलाश्निकोव्ह रायफल’ म्हणून ओळखली जात होती. त्यातील काही त्रुटी दूर करून १९४७ मध्ये त्यांनी तिला परिपूर्णतेचे स्वरूप दिले. साधारणत: दोन वर्षांनी ती सोव्हिएत लष्करात समाविष्ट करण्यात आली. तिची उपयुक्तता लक्षात आल्यावर मग जगातील बहुतेक देश तिच्यावर अक्षरश: तुटून पडले. गॅसवर आधारित असणाऱ्या एके ४७ रायफलच्या स्वयंचलित तंत्रप्रणालीने सर्वाना भुरळ पाडली. वाळवंट, थंड प्रदेश अशा कोणत्याही युद्धभूमीवर प्रभावी कामगिरी बजावण्याची क्षमता तसेच किफायतशीर किंमत यामुळे अनेक राष्ट्रांनी तंत्रज्ञान हस्तांतरण कराराद्वारे देशांतर्गत निर्मितीचे हक्क प्राप्त केले. त्यामुळे जगात सर्वाधिक संख्येने वापरली जाणारी रायफल म्हणून तिची ओळख निर्माण झाली. लेफ्टनंट जनरल पदावर कार्यरत असणाऱ्या कलाश्निकोव्ह यांना छोटय़ा शस्त्रास्त्राच्या संशोधनात केलेल्या विलक्षण कामगिरीबद्दल अनेक सन्मान प्राप्त झाले. त्यात ‘हीरो ऑफ सोश्ॉलिस्ट लेबर’ आणि ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ यांचा समावेश आहे. या रायफलीने जगात मोठय़ा प्रमाणात हिंसाचार घडविला. लष्कराप्रमाणेच दहशतवाद्यांकडूनही तिचा वापर झाला. अशा प्रकारच्या हिंसाचारास या रायफलला जबाबदार धरण्यात येऊ लागले. परंतु हा दावा कलाश्निकोव्ह यांनी फेटाळून लावत ज्यांनी ही रायफल आपल्या शस्त्रसंभारात समाविष्ट केली, त्या राष्ट्रांचे धोरण हिंसाचारासाठी कारणीभूत असल्याचा आरोप केला. गुन्हेगारी प्रवृत्तीकडून आपण शोध लावलेल्या शस्त्राचा वापर होतो ही आपल्या स्वत:साठी क्लेशकारक बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. रायफलच्या शोधातून त्यांना अर्थार्जन फारसे झाले नाही. यापेक्षा गवत कापण्याचे यंत्र बनविले असते तर अधिक पैसे मिळाले असते अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली होती.