आधुनिक मराठी साहित्याचे समीक्षक गंगाधर पाटील यांच्या निधनामुळे आपण काय गमावले, हे लक्षात घेण्यासाठी आधी आपण कसे होतो आणि त्यांनी काय दिले, हे पाहावे लागेल. केशवसुतांचा चिद्वाद (आयडिअ‍ॅलिझम), बालकवींचा अद्भुतवाद (रोमँटिसिझम), १९७०-८० च्या दशकात मराठी कादंबऱ्यांतून दिसू लागलेला अस्तित्ववाद (एग्झिस्टेन्शिअलिझम), अरुण कोलटकरांच्या कवितांतून दिसणारी समाजाकडे पाहण्याची त्यांची विरचनावादी (‘डीकन्स्ट्रक्शन’ची दृष्टी), हे सारे आपल्या आधुनिक मराठी साहित्य परंपरेचा अविभाज्य भागच मानणारे आपण. त्यामागच्या विचारधारांचे नामकरण आणि त्या विचारधारांचा अभ्यास युरोपात आपल्याआधी झाला म्हणून ते सारे ‘परके’, असे समजण्याचा मूर्खपणा आपण करत नाही. उलट, जगभरच्या विचारधारा आपल्याशा करण्यातून साहित्य सशक्त होत असते, हे आपण लक्षात घेतो. मराठीतला साहित्याचा प्रवाह असा पुढे जात असताना, त्याची समीक्षा मात्र आस्वादक आणि चरित्रात्मकच राहणार की काय, अशी परिस्थिती होती. प्राध्यापकी समीक्षा बोकाळलेली होती. आजच्या साहित्याला आजची समीक्षाच हवी, असे ओरडून सांगणारी लघु अ-नियतकालिके मराठीत निघूनही समीक्षेतल्या बदलांची गती फारच धिमी होती. अशा पटावर गंगाधर पाटील यांचे काम मराठीत निराळे ठरले नसते, तरच नवल. सोस्यूर ते देरिदा या सुमारे साठ-सत्तर वर्षांच्या वैचारिक घुसळणीच्या कालखंडाने साहित्य, कला, त्यांचे लोकांकडून होणारे ग्रहण आणि त्याची समीक्षा याबद्दलची केवळ युरोपचीच नव्हे तर जगाची दृष्टी बदलणारी वैचारिक आयुधे मिळत आहेत, हे गंगाधर पाटील यांनी नेमके हेरले. या नवसमीक्षेच्या वाटेवरचे त्यांचे सहप्रवासी होते म. सु. पाटील. त्याआधी वा. ल. आणि व. दि. या कुलकर्णीनी प्राध्यापकी समीक्षेलाही डोळे उघडण्याची सवय लावली होती, उघडय़ा डोळय़ांनी काय दिसू शकते हे प्राध्यापक नसलेल्या मर्ढेकर आणि प्रभाकर पाध्यांनी दाखवून दिले होते, यानंतर पाटील-द्वयाने उघडय़ा डोळय़ांनी साहित्य व समीक्षेचा प्रांत नीट पाहिला.

स्वत:च्या अद्वितीयपणाचा उद्घोष करणे निर्मितीशील साहित्यिकाला एक वेळ शोभेल, पण अशाही साहित्याच्या समीक्षेने मात्र समाजाभिमुखच असले पाहिजे, याची जाणीव मराठीत या दोघा पाटील-समीक्षकांनी दिली आणि ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकाच्या स्थापनेतून ती रुजवली. मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास केला झालात समीक्षक असे काही नसते, तर समीक्षकाने भाषाविज्ञान, सौंदर्यशास्त्र यांचाही अभ्यास करत राहायचा असतो, हा बोध गंगाधर पाटील यांच्या सातत्यपूर्ण लिखाणातून त्यांचे थेट विद्यार्थी नसलेल्यांनाही मिळाला. त्यांच्या विद्यार्थ्यांना तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून, अभ्यासू ऋजुतेचा वस्तुपाठही मिळत राहिला. ‘समीक्षेची नवी रूपे’ हे त्यांचे सुमारे ४० वर्षांपूर्वीचे पुस्तक. ते आजही विद्यार्थ्यांना उपयुक्त मानले जाते, पण त्या वेळी ते अनेकांना नवी दिशाच दाखवणारे ठरले होते. हा समीक्षेचा अभ्यास ‘रेखेची वाहणी’ या ‘अनुष्टुभ’मधील सदरातून पुढेही सुरू राहिला. घटितार्थवाद (फिनॉमिनॉलॉजी), चिन्हमीमांसा यांसारख्या संकल्पनांसह कथनमीमांसेचा पट त्यांनी उलगडला. कथासाहित्याचा आशय आणि वास्तवातले जगणे यांचा प्रतीकरूप संबंध महत्त्वाचा ठरतो, हे त्यांनी मांडले. त्यासाठी साहित्यकृतीतला आदिबंध (आर्किटाइप) शोधणारी समीक्षा त्यांनी केली. पु. शि. रेगे यांच्या कविता, कादंबरी आणि नाटक यांचे दर्शन घडवणाऱ्या ‘सुहृदगाथा’चे संपादन करून गंगाधर पाटील यांनी लिहिलेली प्रस्तावना ‘सिनेमॅटिक’ यासाठी की, रेगेंच्या साहित्यातील समीपदृश्ये दाखवतानाच ती या कवीच्या विचारपटाचे दूरस्थ दर्शनही घडवते. मात्र अशा एखाददुसऱ्या लक्षणीय लिखाणापेक्षा, अभ्यासकाचे सातत्य हे गंगाधर पाटील यांच्या महत्तेचे गमक होते.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Sanjay raut on narendra modi
“मोदींना एकदा लहर आली आणि…”, मोदींच्या १० वर्षांतील कार्यकाळावरून ठाकरे गटाची टीका
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!