अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या प्रलयकारी भूकंपामुळे १००० हून अधिक प्राणहानी झाली आणि कित्येक हजार विस्थापित आणि बेघर झाले. अफगाणिस्तानसारख्या अस्थिर देशाच्या बाबतीत अशा प्रकारच्या नैसर्गिक हानीची व्याप्ती वरकरणी दिसते त्यापेक्षा कितीतरी अधिक असू शकते. या देशाच्या बहुतांश भूभागावर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने कब्जा केला. निव्वळ धर्माच्या नावावर आणि स्वयंचलित बंदुकांच्या जिवावर विविध प्रदेशांमध्ये दहशत पसरवणे आणि खंडणी, वाटमारी व अफूची शेती अशा मध्ययुगीन मार्गानी तुंबडय़ा भरणे यापलीकडे या संघटनेचे निराळे अस्तित्वनिमित्त नाही. अफगाणिस्तानातील लोकनियुक्त सरकारांनी तालिबानच्या नव्याने वाढत्या प्रभावाची दखल घेतली नाही. पाकिस्तानने या टोळय़ांना रसद पुरवठा करत काबूलमधील सरकार सतत अस्थिर ठेवले. अमेरिकेच्या आधिपत्याखाली नाटोच्या फौजांनी तालिबान शिरजोर बनली असतानाच अफगाण जनतेला वाऱ्यावर सोडून पलायन केले. भारतासारख्या काही देशांनी अफगाण धोरण सुनिश्चित करण्यात बहुमूल्य वेळ दवडला. परिणामस्वरूप भूकंप होण्याच्या आधीदेखील करोना आणि युक्रेन युद्धातून झालेल्या पुरवठाकोंडीमुळे त्या देशातील बहुतांची अन्नान्न दशा झालीच होती. ती परिस्थिती हाताळणे एखाद्या लोकनियुक्त सरकारसाठीही खडतर आव्हान ठरले असते. तालिबानला भूकनिर्मूलनात काडीचाही रस आणि गती नसल्यामुळे गतशतकातील काही आफ्रिकी देशांप्रमाणेच येथे भूकबळी जाऊ लागले होते. कोणत्याही धर्माध आणि बंदूकशाही राज्याची ही ठरलेली शोकांतिका असते. त्यात हा भूकंप. अफगाणिस्तानच्या आग्नेयेकडील खोस्त प्रांतामध्ये या भूकंपाचा केंद्रिबदू होता. खोस्त, पाक्तिका या प्रांतांना भूकंपाचा हादरा सर्वाधिक बसला. ६.१ रिश्टर क्षमतेचा हा भूकंप अफगाणिस्तानात गेल्या २० वर्षांतील सर्वात भीषण ठरला. बहुतांश भूकंपग्रस्त भाग डोंगराळ असून, पावसामुळे येथील जमीन अधिक भुसभुशीत बनली आहे. तसेच असीम गरिबीमुळे कच्च्या दगडांच्या घरांमध्ये राहणारेच अधिक. त्यामुळे अजून कितीतरी अधिक नागरिक ढिगाऱ्यांखाली गाडले गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्रांची पथके मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ‘यूएस एड’ या बडय़ा अमेरिकी स्वयंसेवी संस्थेला मदतकार्यात जातीने लक्ष घालण्यास फर्मावले आहे. औषधे आणि अन्नपदार्थाचा पुरवठा भारताकडूनही होऊ शकतो. किंबहुना तसा तो लवकरात लवकर व्हायला हवा. या टापूतील आपले महत्त्वाचे स्थान आणि अफगाणिस्तानशी ठरवूनही तोडता न येण्यासारखे घट्ट संबंध लक्षात घेता या संकटसमयी आपण अफगाणिस्तानच्या मदतीसाठी उभे राहायला हवे. ज्याला आपल्याकडे हल्ली ‘सॉफ्ट पॉवर’ असे संबोधले जाते, ती प्रत्येक वेळी कुशल आयटी मनुष्यबळ, बॉलीवूड किंवा योगसिद्धीतूनच प्रकट व्हायला हवी असे नाही. अजस्र धान्योत्पादक आणि मुबलक औषधे व लसनिर्माता ही आपली ओळखही तितक्याच आत्मीयतेने ठसवण्याची गरज आहे. दोन सप्ताहांपूर्वी आपण तालिबानी सरकारशी अधिकृत राजनैतिक संबंध पुनप्र्रस्थापित केले. तालिबानी मानसिकता, त्यांतील काहींचा पाकिस्तानकडे असलेला कल यापलीकडे पाहून आपण मदत करायला हवी. एकीकडे स्वत:ला जगातील उदयोन्मुख महासत्ता म्हणून घोषित करायचे आणि संकटसमयी आपली कोठारे कुलूपबंद ठेवायची, यात नैतिक आणि राजनैतिक मुत्सद्दीपणाचा अभाव दिसून येतो. उद्ध्वस्त अफगाणिस्तानातील जनतेला तरी एकाकी वाटणार नाही, यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghan earthquake earthquake kills over 1000 in afghanistan zws
First published on: 24-06-2022 at 03:08 IST