जॅक हिगिन्स, मार्टिन फॅलॉन, ह्यू मार्लो, जेम्स ग्रॅहॅम, हॅरी पॅटरसन या सर्वानी हेन्री पॅटरसन यांच्यासोबतच  गेल्या शनिवारी- ९ एप्रिल रोजी-  अखेरचा श्वास घेतला. रहस्यकथा, युद्धकथा आणि थरारकथा लिहिणाऱ्या पॅटरसन यांचीच ही सारी टोपणनावे. त्यापैकी जॅक हिगिन्स म्हणून ते अधिक परिचित होते आणि त्यांनी लिहिलेल्या ७७ पुस्तकांपैकी मोजून ५० पुस्तके जॅक हिगिन्स याच नावाने प्रकाशित झालेली आहेत. भारतीय पुस्तक दुकानांत जॅक हिगिन्स यांची पेपरबॅक पुस्तके अद्यापही अधूनमधून दिसतात, तसेच त्यांच्या ‘द ईगल हॅज लॅण्डेड’ या कादंबरीवरील त्याच नावाचा चित्रपट (१९७६) पुढे १९७७-७८ च्या सुमारास भारतात आला, तेव्हा बऱ्यापैकी चालला होता. आजही त्या कादंबरीच्या आवृत्त्यांवर, ‘गाजलेल्या चित्रपटा’चा उल्लेख असतोच!

वास्तविक, ‘द रॅथ ऑफ गॉड’ (कादंबरी- १९७१, चित्रपट – १९७२) आणि ‘अ प्रेअर फॉर डाइंग’ (कादंबरी – १९७३,  चित्रपट – १९८७) याही कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आणि तेही गाजले. यापैकी ‘रॅथ ऑफ गॉड’चे लेखक म्हणून जेम्स ग्रॅहॅम हे नाव होते. मात्र पॅटरसन यांना अफाट प्रसिद्धी लाभली, ती मात्र ‘द ईगल हॅज लॅण्डेड’मुळेच. या कादंबरीची कथा भन्नाट म्हणावी अशीच. ऐन महायुद्धकाळात, ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याच अपहरणाचा कट हिटलरच्या जर्मनीतून रचला जातो, अशी. हा कट रचण्यासाठी नाझींना भरीस पाडणारा लिआम डेल्व्हिन हा आयरिश रिपब्लिकन आर्मीचा (‘आयआरए’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटीरवादी हिंसक चळवळीचा) सदस्य. तो जर्मनीत आश्रयाला जातो, तिथून ‘आयआरए’साठी पैसा आणि शस्त्रपुरवठय़ाची तजवीज करू लागतो आणि चर्चिलच्या अपहरणाचा कट रचला जातो, परंतु अर्थातच तो उधळलाही जातो- तो कसा, हे कादंबरीचे कथानक. चर्चिल हे पात्र कादंबरीमध्ये प्रत्यक्ष येत नाही. ते इतरांच्या संभाषणांतून आणि निवेदनातूनच अवतरते. उलट जर्मन आणि ब्रिटिश हेर, लष्करी अधिकारी, त्यांचे गुण-अवगुण, मॉली नावाची निरागस मुलगी आणि तिची लियामने केलेली सुटका, पुढे मॉलीने केवळ मेणाची बाहुली बनून न राहणे, लियामचे बेत मॉलीला समजल्यावर तिने त्याच्यापुढे नैतिक पेच टाकणे अशी वळणे ही कादंबरी घेते आणि वाचकाला खिळवून ठेवते.

जॅक हिगिन्स वा अन्य नावांनी लिहिलेल्या आणखीही अनेक कादंबऱ्यांमध्ये ब्रिटिशांच्या ताब्यातील उत्तर आर्यलडच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या फुटीर चळवळीचा उल्लेख येतो. या चळवळीच्या ध्येयाबद्दल नव्हे, तर मार्गाबद्दल लेखकाची तक्रार आहे, हे वाचकाला या कादंबऱ्यांतून जाणवत राहते. आयआरएचा हिंसाचार पॅटरसन यांनी जवळून पाहिला, कारण १९२९ मध्ये त्यांचा जन्म जरी आर्यलडच्या विरुद्ध दिशेच्या किनाऱ्यावरील न्यूकॅसल अपॉन टाइन या शहरात झाला असला, तरी उत्तर आर्यलडच्या लढय़ाचे केंद्रस्थान असलेल्या बेलफास्ट शहरातील आजोळीच त्यांचे बालपण (आई परित्यक्ता ठरल्यामुळे) गेले. दुसऱ्या महायुद्धात पॅटरसन यांनीही सेवा बजावली, मग वाहनचालक वगैरेसारखी कामे करून शिक्षणही पूर्ण केले. मात्र त्यांच्या लेखनाला बहर आला तो तिशीपासून पुढे! वयपरत्वे २०१७ साली त्यांनी लेखन थांबवले, पण त्याआधीच एकंदर २५ कोटी प्रतींचा खप गाठणारे, असा लौकिक त्यांनी मिळवला होता.