कवी गोविंदाग्रज राज्याचे वर्णन करताना भलेही ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे लिहून गेले असतील.. पण आजकाल राज्याची प्रकृती तशी राहिलेली नाही. फारच नाजूक झालीय ती. इतकी की व्यक्तीचा अपमान हा राज्याचा ठरू लागला आहे. तिकडे विश्वगुरूंचा अपमान म्हणजे देशाचा अपमान अशा आरोळय़ा उठू लागल्यावर राज्याने तरी कसे मागे राहायचे? शेवटी केंद्राचा प्रभाव राज्यावरच पडणार ना! सध्याचा जमानाच भावनेला महत्त्व देणारा. एकदा ती दुखावली गेली की झाला अपमान. आता तुम्ही म्हणाल की व्यक्तीच्या भावना दुखावण्याशी राज्याचा संबंध काय? तर आहे. शेवटी व्यक्ती ही राज्याची नागरिक असतेच की! त्यात ती राजकीय असेल तर विचारूच नका. मग अपमानाची व्याप्ती आणखी मोठी. आता अजितदादांचेच बघा ना! राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत ते. त्यांना बोलू दिले जात नाही आणि विरोधी नेत्याला बोलण्याची संधी दिली जाते म्हणजे काय..! राज्याचा म्हणून एक शिष्टाचार असतो, तोही पाळायचा नाही म्हणजे अतिच झाले. मग अशा संकटकाळी भावाच्या मदतीला बहीण धावून आली. दिल्लीहून निश्चित होऊन आलेल्या कार्यक्रमात दादांच्या भाषणाचा उल्लेखच नव्हता, याची त्यांनाही कल्पना होती हा विरोधकांचा दावा राज्यद्रोहाच्या प्रकारात मोडणारा. दादा म्हणजे राज्य व राज्य म्हणजेच दादा ही साधी व्याख्या ठाऊक नसलेले हे लोक. चालले प्रत्येक गोष्टीत राजकारण करायला. आता राजशिष्टाचाराची जबाबदारी असलेला मुलगा राज्यप्रमुख असलेल्या वडिलांच्या गाडीत बसला तर त्यात कसला आलाय नियमभंग! विरोधकांना सामोरे जाताना एकमेकांना आधार देण्यासाठी एकत्र येणे ही स्वाभाविक गोष्ट नाही का? तीही समजून न घेता यंत्रणा ‘गाडीतून उतरा’ म्हणत असतील तर केवढा हा अपमान! हे तर वाघाच्या जबडय़ात हात घालण्यासारखेच. मग राज्य पेटून उठणार नाही तर काय? सत्ता वाघांची आहे हे या यंत्रणांच्या लक्षात कसे येत नाही? आधीच अधिवासांच्या कमतरतेमुळे वाघांची अवस्था बिकट. त्यातल्या त्यात कसाबसा अधिवास मिळाला तर वाघांना शिकार करू देण्याऐवजी त्यांचीच शिकार करायची हे वाघाने का सहन करायचे? शेवटी जंगलचा राजाच तो. त्याचा अपमान म्हणजे प्रजेचा अपमान, हे साधे गृहीतक विरोधकांना समजू नये? आता काही म्हणतील अपमानाने कुठे पेटून उठला महाराष्ट्र? अहो, तिकडे वाघांच्या मुखपत्रात रोज पेटून उठतो, तिखट भाष्य करतो. जरा वाचत जा की! नेता म्हणजे अख्खे राज्य या नव्या संकल्पनेत केवळ हे तिघेच नाहीत. इथल्या प्रत्येक नेत्याचा अपमान हा थेट राज्याचा अपमान असतो हे लक्षात घ्या. मध्यंतरी कळपातून बाहेर पडून कायम अधिवासाच्या शोधात असलेल्या धाकटय़ा वाघावर उत्तरेतल्या काही उपटसुंभांनी जहरी टीका केली, तेव्हाही वाघाच्या केसाला धक्का लागला तरी राज्य पेटून उठेल असा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला होता. असा धक्काही लागला नाही व राज्य पेटून उठण्याचा प्रश्नही उद्भवला नाही, ऐकणाऱ्यांचे फक्त मनोरंजन तेवढे झाले, ही गोष्ट अलाहिदा. एका राजवंशजाला उमेदवारी नाकारण्याचा अवमानसुद्धा या राज्याने निमूटपणे गिळला. मोठय़ा साहेबांचा अपमान हा राज्याचाच असतो हे न्यायनिवाडाकार सोडून सर्वानी मान्य केलेलेच. त्यामुळे भविष्यात तरी नेत्यांविषयी बोलताना, कृती करताना राज्याच्या हितासाठी खबरदारी घेणे गरजेचे. ‘राकट देशा, दगडांच्या देशा’ असे बिरुद मिरवणारे हे राज्य निदान अपमानाच्या बाबतीत चेहऱ्यावरून कमळ फिरवले तरी ओरखडे उमटणाऱ्या राजकुमारीसारखे झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyartha land insults nature state delicate person insult ysh
First published on: 16-06-2022 at 00:02 IST