बहुसंख्यांचे हळहळणे या निकषावर  विचार केला, तर उदाहरणार्थ श्रीदेवी, सुशांत सिंह आदींच्या निधनापेक्षा विनोद दुआ यांचे निधन फारच बिनमहत्त्वाचे मानावे लागेल. स्वत:ला ब्रॉडकास्टर किंवा प्रक्षेपणकार म्हणवणारा हा पत्रकार व्याधींमुळे आणि बराच काळ रुग्णालयात राहून, चार-पाच दिवसांपूर्वी अत्यवस्थ होऊन मग शनिवारी वारला, यात नाटय़पूर्ण किंवा इव्हेन्टफुल म्हणावे असेही काही नाही. माध्यमे आणि समाजमाध्यमे यांनी दुआ यांच्या मृत्यूचे निराळेपण ओरडून सांगावे आणि या माध्यमांच्या उपभोक्त्यांना ते मनोमन पटून त्यांनी हळहळावे, असे काहीच घडलेले नाही. हे असे निराळेपणातले वा एक्स्क्लुझिव्हपणातले नाटय़ शोधून उपभोक्त्यांवर परिणाम साधणाऱ्या पत्रकारितेपासून विनोद दुआ नेहमीच दूर राहिले होते. त्यांची जातकुळी ही माहितीच्या वेगापेक्षा विश्लेषणाच्या रास्तपणाला अधिक महत्त्व देणारी. दूरदर्शनच्या काळात, १९८० च्या दशकापासून विनोद दुआ चित्रवाणीवर दिसू लागले. त्यांना गाण्याची आवड आहे, थोडेफार संगीतशिक्षणही झालेले आहे, प्रायोगिक नाटकाच्या क्षेत्रातही त्यांनी उमेदवारी केलेली आहे आणि त्यांच्या वक्तृत्वाला स्पर्धातील बक्षिसांची, तर लेखनाला रंगमंचावर सादर होण्याची दादसुद्धा मिळालेली आहे यातले काहीही तपशील तत्कालीन प्रेक्षकांना माहीत नसतानाही या विनोद दुआंचा शब्दसंग्रह, संयत आवाजातले अचूक चढउतार, वास्तवाला अंतर न देता सादर होण्याची त्यांची रीत आणि अर्थातच घडामोडींविषयीची त्यांची समज ही सारी वैशिष्टय़े दूरदर्शनचे राष्ट्रीय प्रसारण पाहाणाऱ्या त्या वेळच्या प्रेक्षकांनी हेरली होती. निवडणूक निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प अशा विशेष दिवशी प्रणय रॉय यांच्या इंग्रजीला तोडीस तोड असे विश्लेषणलक्ष्यी प्रश्न विनोद दुआ हिंदीत विचारत. ‘जनवाणी’ हा जनतेचे प्रश्न राज्यकर्त्यांना विचारणारा कार्यक्रम, तर एकाच विषयाचे विविध पैलू मांडणारा (हल्लीचे टीव्हीवाले पैलू ‘समोर आणण्या’चे काम करतात. दुआ हे खरोखरच विवेकी मांडणीला महत्त्व देणाऱ्यांपैकी होते, म्हणून पैलू मांडणारा) ‘परख’ हा कार्यक्रम त्यांच्यामुळे आजही अनेकांच्या लक्षात असेल. उपलब्ध ध्वनिचित्रमुद्रित वृत्तांकनाच्या आधारे त्यांनी केलेले विश्लेषणपर कार्यक्रमही विशेष गाजले. यापैकी एक म्हणजे ‘वर्षां रितु और शहर में हैजा’-देशाच्या राजधानीत, दिल्लीत कॉलऱ्यासारखी साथ पसरतेच कशी, हा सवाल दुआंनी टोकदारपणे मांडला. नंतरच्या निवडणुकीत साहिबसिंह वर्मा (भाजप) हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, हा योगायोग. भारतभरच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद विनोद दुआ घेताहेत, असा ‘एक जायका इंडिया का’ हा कार्यक्रम ते करीत. चंगळवादाची सत्ता खाण्याच्या प्रांतावरून हटवून पुन्हा तेथे संस्कृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, हे या कार्यक्रमामागले विनोद दुआंचे ‘पॉलिटिक्स’ होते.त्यांचा ‘द विनोद दुआ शो’ हा यूटय़ूब कार्यक्रम सहज पाहाता येतो, तो किती संथपणे सुरू होतो पाहा. आरडाओरडा करणाऱ्यांपैकी ते नव्हते, आणि योगायोग म्हणजे ते राजनिष्ठही कधीच नव्हते. राजीव गांधी यांच्या काळात म्हणे, तेव्हाचे युवानेते आणि राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या तक्रारीमुळे विनोद दुआंना दूरदर्शनच्या पडद्यापासून काही काळ जरा लांबच ठेवले गेले. पण पुढे राजीवच सत्ताच्युत झाले. नंतरच्या नरसिंह राव सरकारच्या काळात तर म्हणे, दुआ हे संघवाले, भाजपवाले असल्याचा आरोप काही तत्कालीन काँग्रेसजनांनी केला होता, त्याला मात्र केराची टोपली मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लादलेल्या टाळेबंदीवर दुआ यांनी टीका केली म्हणून हिमाचल प्रदेशातल्या कुठल्याशा लोकप्रतिनिधीने दुआंविरुद्ध राजद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्याच्याशी संबंधित बातम्यांमध्ये हल्लीच्या हिंदी वृत्तरंजनकारांनी देशद्रोहाच्या खटल्यापासून विनोद दुआ कसे काय वाचणार, असे रंगही भरले. पण आधी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, मग आरोपच न्यायालयात फेटाळले जाणे, याला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. लैंगिक दुर्वर्तनाचाही एक आरोप एके काळच्या शिकाऊ पत्रकार आणि आता फिल्ममेकर निष्ठा जैन यांनी दुआंवर केला होता आणि काही राजनिष्ठ माध्यमांनी त्याला प्रसिद्धी देताना ‘एम. जे. अकबर (माजी पत्रकार, संपादक व तत्कालीन केंद्रीय मंत्री) यांच्यावरील आरोपाबद्दल वटवट करणारे दुआंबद्दल गप्प का?’ असा सवाल केला होता. अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रिया रामाणी या पत्रकार, त्या आरोपाचा पाठपुरावा करू लागल्यानंतर अकबर यांनी रामाणींवर बदनामीचा खटला भरला आणि त्यात अकबर हरले. निष्ठा जैन यांनी पाठपुरावाच न केल्यामुळे पुढे काहीही झाले नाही. सत्यकथनाचा आदर करणे, देशाभिमान असूनही सत्ताधाऱ्यांबद्दल साशंक असणे, राग आक्रस्ताळेपणाने व्यक्त करण्याऐवजी तो मार्मिकपणा किंवा प्रसंगी कुत्सितपणाने व्यक्त करणे; साहित्य, संगीत, नाटय़कला यांबद्दल आस्था असणे.. ही सारी १९६० ते १९८० या दशकांतील भारतीय मध्यमवर्गाची व्यवच्छेदक लक्षणे. या मध्यमवर्गीय मूल्यसंस्काराने पत्रकारितेवर जी छाप सोडली, त्यातून ‘स्वातंत्र्यपूर्व काळातील ध्येयनिष्ठ संपादककेंद्री पत्रकारितेनंतर काय?’ या प्रश्नाचे उत्तर काळानेच आपसूक दिले होते. अभिजात मध्यमवर्गीयाचा निखळलेला दुवा सांधणे, हीच विनोद दुआ यांना आदरांजली ठरेल.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
ketu guru navpancham yog
गुरू आणि केतुची लवकरच होईल युती! नवपंचम राजयोगामुळे या राशींना लाभेल भाग्यची साथ, मिळेल भरपूर पैसा
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा
Till 31st March Shani Uday Surya Gochar Astrological Events Will Make Mesh To Meen 12 Rashi Rich Money Power Health Marathi Horoscope
३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?