स्वागत सावधच हवे!

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये या लशीची गुणकारिता ९० टक्क्यांपर्यंत दिसून आली असा फायझरचा दावा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

अमेरिकेतील फायझर या बडय़ा औषधनिर्मिती कंपनीने करोना विषाणूविरोधात परिणामकारक ठरेल अशी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये या लशीची गुणकारिता ९० टक्क्यांपर्यंत दिसून आली असा फायझरचा दावा आहे. फायझरसाठी जर्मनीतील बायोएनटेक कंपनीने या लशीवर संशोधन केले होते. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये ९० टक्के गुणकारिता दिसून आली असेल, तर या लशीची वाटचाल आतापर्यंत तरी यशस्वी मानावी लागेल. करोना विषाणूने जगभर नऊ महिन्यांत जितकी प्रचंड मनुष्यहानी आणि वित्तहानी घडवून आणली तितकी ती कोणत्याही संकटाने किंवा महासाथीने गेल्या कित्येक वर्षांत केलेली नसेल. या विषाणूची संसर्गक्षमता अत्यंत तीव्र असल्यामुळे आणि वेळीच उपाय न केल्यास तो प्राणघातक ठरत असल्यामुळे मानवी इतिहासात थैमान घालून झालेल्या इतर कोणत्याही विषाणूपेक्षा या विषाणूच्या निराकरणासाठी लस शोधणे, विकसित करणे निकडीचे होऊन बसले आहे. जागतिकीकरणाचे एक लक्षण म्हणजे व्यापारउदीम, पर्यटन, शिक्षणाच्या निमित्ताने देशाटन करण्यासाठी उपलब्ध असलेली साधने आणि संपत्ती. या हालचालीवरच – देशांतर्गत आणि देशांदरम्यान – करोनाने अभूतपूर्व निर्बंध आणले. यातून आर्थिक घुसमट होऊ लागल्यामुळे टाळेबंदीसारखे निर्बंध शिथिल करणेही क्रमप्राप्त बनले. अनेक देशांमध्ये शिथिलीकरणानंतर कोविड-१९ची दुसरी लाट आलेली दिसून येते. आर्थिक क्रियाकलापांना चालना देणे गरजेचे असल्यामुळे लस विकसित करण्यास जगभर अभूतपूर्व प्राधान्य दिले गेले आहे. वास्तविक कोणत्याही विषाणूजन्य वा जिवाणूजन्य आजारांवर लस विकसित करण्यासाठी काही वर्षे जावी लागतात. करोनाने तितकी उसंत आपल्याला दिलेली नाही. या निराशामय वातावरणात लशीसंबंधी कोणतेही वृत्त कुतूहल आणि आशावाद वाढवणारे ठरते हेही स्वाभाविकच. फायझरमार्फत विकसित होत असलेल्या लशीच्या बाबतीत असेच काहीसे घडत आहे. परंतु भारतीयांनी या लशीचे स्वागत सावधपणे करणे इष्ट ठरेल. ही लस ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, त्याअंतर्गत लशीची गुणकारिता उच्चतम ठेवण्यासाठी तिची साठवणूक गोठणबिंदूखाली उणे ७० अंश सेल्शियस तापमानामध्ये करणे आवश्यक असते. लसीकरणासाठी शून्य अंश सेल्शियसपेक्षा काही अंश अधिक तापमानात ती २४ तासांपेक्षा अधिक काळ ठेवता येत नाही. शिवाय बरोब्बर तीन आठवडय़ांनी या लशीचा दुसरा डोस द्यावा लागेल. म्हणजे वाहतूक, साठवणूक आणि प्रत्यक्ष लसीकरण अशा टप्प्यांसाठी आवश्यक तापमान सुनिश्चित करण्यासाठी आपल्याकडे त्या दर्जाच्या पायाभूत सुविधा हव्यात. प्रौढ लसीकरणाचा जवळपास शून्य अनुभव असलेल्या भारतासारख्या देशात ते अपेक्षित धरणे अवघड दिसते. शीतगृहांची क्षमता कितीही वाढवायची म्हटले, तरी येत्या सहा महिन्यांत त्यातून कितपत प्रगती साधता येईल याविषयी भारतातील आरोग्य आणि अभियांत्रिकी तज्ज्ञच साशंक आहेत. शिवाय फायझरची लस एमआरएनए प्रकारातील आहे. या प्रकारातीलच एक लस मॉडेर्ना विकसित करत आहे आणि तिचा एक डोस ३७ डॉलरच्या (२,७५० रु.) आसपास असू शकेल, असा मॉडेर्नाचा अंदाज आहे. इतकी महाग लस भारत सरकारला परवडणार का, आणि तिची साठवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत का, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सध्या ‘नाही’ अशीच द्यावी लागतील. आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियातील अनेक देशांना ही समस्या सतावणार अशी चिन्हे आहेत. स्वस्तातली परिणामकारक आणि तुलनेने कमी ‘नियम व अटी लागू’ असलेली लस विकसित करण्याचे प्रयत्न भारतातही सुरू आहेतच. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन म्हणाले त्याप्रमाणे, ‘सध्या मुखपट्टी हीच सर्वाधिक परिणामकारक लस’ असल्याचे धरून चालणे इतके तर आपण करू शकतोच!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on pfizer pharmaceutical company has developed a vaccine effective against the corona virus abn

ताज्या बातम्या