दु:खद आणि चिंताजनक !

ईशान्येमधील मणिपूर राज्यामध्ये सुरुवातीपासूनच विभाजनवादी गटांनी मणिपूरचे भारतातील विलीनीकरण कधीच मान्य केले नाही.

आसाम रायफल्स या लष्करी अमलाखालील निमलष्करी दलाचे कमांडंट कर्नल विप्लव त्रिपाठी; त्यांची पत्नी आणि मुलाची त्यांच्या ताफ्यातील चार जवानांसह दहशतवादी हल्ल्यात हत्या होणे ही ईशान्य भारतातील अस्थैर्य मालिकेतील सर्वात काळी घटना मानावी लागेल. ती जितकी दु:खद तितकीच चिंताजनक. सीमेवर किंवा सीमावर्ती भागांमध्ये घातपाती आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये अधिकारी वा जवान शहीद होणे ही सर्वानाच अस्वस्थ करणारी बाब असली, तरी ती अनपेक्षित वा अकल्पित नसते. लष्करी समुदायामध्ये तर असे प्रसंग जोखमीचे अविभाज्य अंग म्हणून स्वीकारले जातात. परंतु अशा हल्ल्यांमध्ये क्वचितच कुटुंबीयांना लक्ष्य केले जाते. मणिपूरमधील दहशतवाद्यांनी ती सीमारेषाही ओलांडलेली आहे. म्हणूनच ते कृत्य नृशंस आणि संतापजनक. त्याचबरोबर, लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताची हमी देता येऊ शकत नाही इतपत परिस्थिती एखाद्या प्रदेशात चिघळणे ही बाब सरकारी यंत्रणांसाठीही नामुष्कीजनक. झाल्या प्रकाराची लष्करी शिरस्त्यानुसार चौकशी होईलच. एखाद्या बटालियनचा कर्नल हुद्दय़ाचा कर्ता अधिकारी जेथून कुटुंबीयांसमवेत वाहनातून मार्गस्थ होतो, त्या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था इतकी ठिसूळ कशी काय राहिली हा पहिला मुद्दा. हा परिसर म्यानमार सीमेजवळ आहे. ही सीमा बऱ्यापैकी सच्छिद्र असल्यामुळे मिझो, तसेच मणिपुरी बंडखोर बऱ्याचदा घातपाती कारवाया करून पलीकडे पळून जातात. त्यामुळे या भागातील सुरक्षा आणि गुप्तवार्ता यंत्रणा सतत सतर्क असणे अपेक्षित आहे. तशी ती नव्हती याची करुण प्रचीती या घटनेच्या निमित्ताने आली. त्याचप्रमाणे, कर्नल त्रिपाठी हे शीघ्र प्रतिसाद दलासह (क्विक रिस्पॉन्स टीम) संचार करत होते. अशी दले अस्थिर टापूत घातपाती हल्ला कोणत्याही क्षणी होऊ शकतो याची शक्यता गृहीत धरून वावरत असतात. परंतु अशा ताफ्यात कुटुंबीयांना घेऊन जाणे कितपत सुरक्षित होते, असाही प्रश्न उपस्थित होतो. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या दोन बंडखोर गटांच्या प्रवक्त्यांनी ‘कुटुंबीयांसमवेत ते प्रवास करतील हे गृहीत धरले नव्हते’ असे म्हटले आहे.

हे झाले परिसरातील यंत्रणेबाबत. परंतु व्यापक मुद्दा ईशान्येतील सामरिक आणि सुरक्षाविषयक परिस्थितीचा आहे. जम्मू-काश्मीरप्रमाणेच हाही टापू अशांत म्हणून ओळखला जातो. यास्तव येथेही लष्करी विशेषाधिकार कायदा लागू आहे. परंतु एकीकडे आसाममधील ‘उल्फा’ चळवळीला बऱ्यापैकी नेस्तनाबूत केले असताना आणि नागा बंडखोरांशी चर्चेची प्रक्रिया सुरू असताना, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि मणिपूर नागा पीपल्स लिबरेशन फ्रंट (एमएनपीएफ) या गटांनी इतका सुनियोजित हल्ला कसा काय घडवून आणला याची चौकशी सुरू करावी लागेल. ईशान्य भागातील यापूर्वीचा अत्यंत विध्वंसक हल्ला मणिपूरमध्येच २०१५ मध्ये झाला होता. त्या वेळी डोग्रा रेजिमेंटच्या ताफ्याला लक्ष्य केले गेले आणि त्यात १८ जवान शहीद झाले होते. परंतु ती घटना चंडेल जिल्ह्य़ातील होती. शनिवारची घटना चुराचंदपूर जिल्ह्य़ात घडली, जो तुलनेने शांत टापू मानला जातो. मात्र म्यानमारला हा भाग लागून आहे. त्या देशाच्या लष्कराबरोबर भारतीय लष्कराने बंडखोरांविरोधात संयुक्त कारवाया राबवल्या आहेत. तरीही तेथील सीमावर्ती भागात अनेकदा बंडखोर लपून बसतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, म्यानमारमध्ये मोठय़ा प्रमाणात चिनी बनावटीची शस्त्रे, भूसुरुंग अशी सामग्री बेकायदा आणली जाते. ही शस्त्रे ईशान्येतील बंडखोर गटांच्या हाती पडणे अजिबात अशक्य नाही असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. याबाबतचे ताजे उदाहरण म्हणजे, ९ नोव्हेंबर रोजी मणिपूर सीमेवरील एका भागात जवळपास २५० किलोंची स्फोटके आसाम रायफल्सने हस्तगत केली. अशाच स्वरूपाच्या स्फोटकांचा वापर शनिवारच्या हल्ल्यात करण्यात आला होता. ईशान्येमधील मणिपूर राज्यामध्ये सुरुवातीपासूनच विभाजनवादी गटांनी मणिपूरचे भारतातील विलीनीकरण कधीच मान्य केले नाही. पीएलए आणि इतर मणिपुरी संघटना शक्यतो सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचे टाळतात. त्याऐवजी स्थानिकांचे समर्थन आणि स्थानिक पातळीवर खंडणी गोळा करून त्या उभ्या राहिल्या. पीएलएच्या राजकीय संघटनेचे नेते बांगलादेशात असतात आणि त्यांची काही अनधिकृत ठाणी वा तळ बांगलादेशमधील सिल्हेट, तसेच म्यानमार सीमेवर सक्रिय आहेत. मणिपूरमध्ये आजही वाटाघाटींऐवजी विभाजनावर ठाम राहणारे गट आहेत. या भागातील गेल्या सहा वर्षांतील दोन सर्वाधिक विध्वंसक हल्ले मणिपूरमध्ये घडावेत हा योगायोग खचितच नाही. अरुणाचल सीमेपलीकडे चीनच्या अस्वस्थ करणाऱ्या हालचाली सुरू असताना, ईशान्येतील इतर राज्यांमध्ये घातपाती हल्ले सुरू होणे ही भारतासाठी दुहेरी डोकेदुखी ठरणार आहे. याची जाणीव होण्यासाठी एखादा लष्करी अधिकारी सहकुटुंब बळी पडायला हवा होता का, याचा विचार राजकीय आणि लष्करी नेतृत्वानेही करण्याची नितांत गरज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Assam rifles commanding officer wife son 3 soldiers killed in terrorist attack zws

Next Story
राज ठाकरे, तुम्हीसुद्धा..?
ताज्या बातम्या