टेनिसमध्ये एखाद्या खेळाडूने स्वत:च्याच सव्‍‌र्हिसवर ‘डबल फॉल्ट’ म्हणजे दुहेरी चूक केल्यास प्रतिस्पर्ध्याला गुण बहाल केला जातो. असा गुण गमवावा लागल्याने काही वेळा डाव, सामना आणि स्पर्धाही गमवावी लागल्याची उदाहरणे आहेत. विख्यात टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अशाच प्रकारे ‘डबल फॉल्ट’ केल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच स्पर्धेबाहेर व्हावे लागले. फरक इतकाच की, हा डबल फॉल्ट टेनिस कोर्टाबाहेरचा होता. जगभर ज्या लाखो मंडळींनी आजही लशीचा एक डोसही घेतलेला नाही, अशांपैकी जोकोविच एक. वैद्यकीय कारणास्तव लस घेतली नसल्याचा त्याचा दावा. त्याच्यासारख्या धडधाकट आणि अतिशय तंदुरुस्त व्यक्तीने लस न घेणे ही बाब तशी आक्षेपार्हच. लस न घेतलेल्यांच्या किंवा ती मिळूच न शकलेल्यांच्या शरीरातच करोनाचा विषाणू प्रसारतो आणि उत्परिवर्तितही होतो. यांतील पहिला गट पूर्णत: दोषी कारण अशा आढय़ताखोरांमुळे जगाला आजही करोना प्रकोपाची किंमत मोजावी लागत आहे. तेव्हा लस तिरस्कार ही जोकोविचची पहिली चूक. यात व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा विशेषत: पाश्चिमात्य देशांमध्ये मांडला जातो. परंतु करोनाच्या गेल्या पावणेदोन वर्षांतील हाहाकारापुढे तो मोडीत निघतो. लस न घेण्याचे स्वातंत्र्य जोकोविचला असेलही, पण ती न घेताच परदेश प्रवासाचा आणि त्यातही एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा त्याचा निर्णय सर्वस्वी स्वत:पुरता मर्यादित राहू शकत नाही. कारण येथे विषाणूवहनाचा आणि विषाणूप्रसाराचा अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे लसकवच नाकारून स्पर्धेत उतरण्याचा अट्टहास ही त्याची दुसरी चूक. ऑस्ट्रेलियातील दोन वैद्यकीय मंडळांनी आणि नंतर ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या संयोजकांनीही वैद्यकीय कारणांस्तव लस न घेण्याचा दावा मान्य करून त्याला स्पर्धेत खेळण्याची परवानगी कशी दिली हे एक रहस्यच. ऑस्ट्रेलियात करोनाविषयी खबरदारीचे नियम अत्यंत कडक आहेत आणि मेलबर्नसारख्या शहरात जेथे ही स्पर्धा होत आहे, तेथे गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने टाळेबंदी जाहीर करावी लागली होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता होतीच, त्यात जोकोविचविषयीच्या निर्णयाने या अस्वस्थतेचे रूपांतर सार्वत्रिक संतापात झाले. जोकोविच ऑस्ट्रेलियामध्ये उतरल्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारला सुबुद्धी झाली आणि त्याचा व्हिसाच रद्द झाला. त्यामुळे ६ जानेवारी रोजी जोकोविच ऑस्ट्रेलियामध्ये आलेला ‘अवैध स्थलांतरित’ ठरला आणि त्याच्या मायदेशी पाठवणीची कायदेशीर कारवाई सुरू करावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाने वेळीच खमकेपणा दाखवला, तरी सुरुवातीला व्हायचा तो घोळ झालाच. जगभर लस अनास्था आणि लस तिरस्काराविषयी सरकारांना ठोस निर्णय घेता आलेला नाही. जोकोविचच्या सर्बियामध्ये लसीकरणाचे प्रमाण ५० टक्क्यांच्याही खाली आहे, जे युरोपीय मानकांनुसार अत्यल्पच ठरते. विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावण्यासाठी आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धा दहाव्यांदा जिंकण्यासाठी तो उत्सुक असणे अतिशय स्वाभाविक. परंतु असे करताना सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा तो वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा गौण ठरवतो असा संदेश असंख्यांपर्यंत पोहोचलाच. करोनाच्या सुरुवातीला एका स्पर्धेत हट्टाने खेळून त्याने आपल्यासह अनेकांना बाधित केले होते हा इतिहास ताजा आहे. असेच सुरू राहिल्यास विक्रमी ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे पटकावूनही तो सर्वमान्यता आणि लोकप्रियतेच्या बाबतीत रॉजर फेडरर आणि राफाएल नडालच्या आसपासही पोहोचणार नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open 2022 novak djokovic refused entry into australia over vaccine exemption zws
First published on: 07-01-2022 at 00:05 IST