बांगलादेशात इस्लामी दहशतवाद्यांनी जे केले ते मुळीच अनपेक्षित नव्हते. ते टाळता येण्यासारखेही नव्हते. शुक्रवारी रात्री त्यांनी एका हॉटेलवर हल्ला केला. २० परदेशी नागरिकांना ठार केले. हे हॉटेल ढाक्यातील अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या भागात होते. पण तो बंदोबस्त दहशतवाद्यांना रोखू शकला नाही. याचे कारण केवळ सुरक्षा यंत्रणा वा गुप्तचरांच्या अपयशात शोधता येणार नाही. अतिरेकी धर्मवादाला मिळत असलेल्या राजकीय आणि सामाजिक पाठिंब्यामध्ये त्याचे कारण लपलेले आहे. जमात-ए-इस्लामी या संघटनेने आणि अल-बद्र या त्यांच्या विद्यार्थी संघटनेने बांगलादेश मुक्तिलढय़ाच्या कालखंडात अक्षरश हैदोस घातला होता. असंख्य हिंदू आणि मुस्लिमांची कत्तल केली होती. त्या गुन्ह्य़ांसाठी संघटनेच्या नेत्यांना दोन वर्षांपूर्वी जेव्हा शिक्षा ठोठावण्यात आली, तेव्हा सगळ्या धर्मवादी संघटनांनी शेख हसीना सरकारविरोधात निषेधाचा वणवा पेटविला होता. जमातच्या गुंडांनी देशात हिंसाचार माजविला होता आणि त्याला बेगम खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी- बीएनपीसह सर्व विरोधी पक्षांचा सहर्ष पाठिंबा होता. सामाजिक आणि राजकीय पातळीवरून अतिरेकी विचारसरणीला, केवळ आपल्या प्रिय राजकीय पक्षाला फायदेशीर ठरत आहेत म्हणून दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे म्हणजे भस्मासुरालाच आवतण. पण ते ना राजकीय नेत्यांनी लक्षात घेतले, ना त्यांच्या अनुयायांनी. बेगम खालिदा झिया यांची बीएनपी हा स्वतस कट्टर राष्ट्रवादी म्हणविणारा पक्ष. असा राष्ट्रवाद आणि अतिरेकी धर्मवाद हे नेहमीचे शय्यासोबती. हे जगभरातील वास्तव. बांगलादेशही त्यापासून मुक्त नाही. अफगाणिस्तानात सोविएत रशियाविरुद्ध अमेरिकेने उभ्या केलेल्या मुजाहिदीनांच्या फौजांतून परत आलेल्या बांगलादेशींनी ८०च्या दशकात तेथे जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना स्थापन केली. बांगलादेशात तथाकथित धर्मराज्य स्थापन करणे हे तिचे ध्येय. या संघटनेशी बीएनपीच्या नेत्यांचे जवळचे संबंध असल्याचे विकिलिक्सने जाहीर केलेल्या कागदपत्रांतून उघडकीस आले आहे. शुक्रवारचा हल्ला केला तो याच जेएमबीच्या दहशतवाद्यांनी. हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली असली, तरी त्यामागे स्थानिक दहशतवादीच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अशा हल्ल्यांना वैचारिक पाठबळ आयसिसकडूनच मिळत आहे. आयसिसचा खरा धोका आहे तो हा. शेख हसीना सरकारने ही बाब सातत्याने नाकारली. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील सेक्युलर, डावे, उदारमतवादी, तसेच बिगरमुस्लिम यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. धार्मिक सनातन्यांविरोधात बोलणाऱ्या अभ्यासकांच्या, पत्रकारांच्या, ब्लॉगरच्या हत्या करण्यात येत आहेत. अल्पसंख्याकांना ठार मारले जात आहे आणि समाज गप्प आहे. परवाच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘हे कोणत्या प्रकारचे मुस्लिम आहेत? ते कोणत्याही धर्माचे नाहीत.’ या अशा विधानांनीच समाजाचा बुद्धिभेद होत आहे, हे ओळखण्याची आवश्यकता आहे. कारण हा लढा केवळ बंदुकधारी दहशतवाद्यांशी नसतो. तो विचारधारेशी असतो. तिला बळ धर्मातून मिळत असेल, तर ते मिळू नये हे पाहण्याची जबाबदारी त्या त्या धर्मनेत्यांची, धर्मानुयायांची आहे. त्यात ते नाकाम ठरत असल्यानेच सर्वच धर्मातील अतिरेक्यांना सामाजिक मान्यता मिळत असल्याचे दिसते आहे. यात माझा धर्म तुमच्या धर्मापेक्षा सफेद कसा, असा बडेजाव मिरवणेही चूक. कारण सर्वच धर्मात अतिरेकाची जातकुळी एकच आहे. आयसिसच्या कारवायांचा धोका कसा आणि किती वाढतो आहे हे ढाक्यातील घटनेने दाखवून दिले आहे. माझा अतिरेक विरुद्ध तुझा अतिरेक हे या समस्येचे उत्तर नाही. ते अतिरेक विरुद्ध आपण असेच असायला हवे. बांगलादेशातील हल्ल्याचा धडा कोणता असेल तर तो हाच आहे. प्रश्न एवढाच आहे, की शहाणे होण्यासाठी सगळ्यांनाच असे किती धडे शिकावे लागणार आहेत.