बराक ओबामा किंवा कमला हॅरिस यांच्याही आधी ज्या व्यक्तीने गौरेतर असूनही अमेरिकेतील अत्यंत महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली, ती म्हणजे निवृत्त जनरल कॉलिन पॉवेल. फरक इतकाच, की ओबामा किंवा हॅरिस यांचे उत्थान ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या उदारमतवादी आणि सर्वसमावेशक धोरणांची फलश्रुती होती. याउलट तुलनेने परंपरावादी असलेल्या आणि मध्यंतरीच्या काळात कमालीचा गौरवर्चस्ववादी बनलेल्या रिपब्लिकन पक्षात कॉलिन पॉवेल यांची वाटचाल स्वयंभू म्हणावी अशीच. रोनाल्ड रीगन यांच्या प्रशासनात अमेरिकेचे पहिले गौरेतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, थोरले जॉर्ज बुश यांच्या प्रशासनात पहिले गौरेतर संयुक्त सैन्यदल प्रमुख आणि धाकटे जॉर्ज बुश यांच्या प्रशासनात पहिले गौरेतर परराष्ट्रमंत्री ही मालिका अतिशय गौरवास्पद आहे. अमेरिकेतील सत्तावर्तुळात काहींनी पॉवेल हे अमेरिकेचे पहिले गौरेतर अध्यक्ष बनू शकतात, असेही सांगायला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात उद्भवलेल्या अनेक घडामोडींमुळे त्या वाटेने जाण्याची संधीच पॉवेल यांना मिळू शकली नाही हा भाग वेगळा. तसेही रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणाला ते नंतरच्या काळात कंटाळले होते. इतके, की जाहीर व्यासपीठांवरून त्यांनी २००८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्या पाठिंब्याचा मोठा फायदा ओबामा यांना झाला, असे नंतर स्पष्ट झाले. धाकटे जॉर्ज बुश यांचे परराष्ट्रमंत्री म्हणून इराकवर हल्ला करण्याविषयी काहीशा अनिच्छेने दिलेला सल्ला आणि त्याचे संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेले समर्थन तथ्याधारित नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पॉवेल यांची झळझळीत कारकीर्द कायमची डागाळली गेली. पण पॉवेल यांच्या कारकीर्दीचा मागोवा घेताना केवळ तेवढाच उल्लेख करणे त्यांच्यासाठी अन्यायकारक ठरेल.

न्यू यॉर्कमध्ये हार्लेमच्या वस्तीत जमैकन स्थलांतरितांच्या पोटी १९३७ मध्ये जन्माला आलेले कॉलिन ल्युथर पॉवेल शाळेत फार हुशार वगैरे नव्हते. तरीही त्यांच्या वस्तीतील इतर मुलांच्या तुलनेत अधिक महत्त्वाकांक्षी ठरल्यामुळे कॉलिन पॉवेल महाविद्यालयात दाखल झाले. भूगर्भशास्त्रात पदवी घेत असताना, लष्करी अधिकाऱ्यांच्या राखीव दलात प्रशिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. इतर कशातच चमक दाखवता न आल्याने, लष्करी गणवेशात चमकून घ्यावे याच मिषाने आपण तेथे गेलो अशी त्यांची प्रांजळ कबुली. पुढे पदवीधर झाल्यानंतर कॉलिन पॉवेल लष्करात रीतसर दाखल झाले आणि दोन वेळा व्हिएतनामला जाऊन आले. तेथे त्यांच्यातील नेतृत्वगुणांना अधिक व्यापक अवकाश आणि वाव मिळाला. रिचर्ड निक्सन, जेम्स कार्टर यांच्या प्रशासनांमध्ये त्यांना अनेक महत्त्वाच्या लष्करी जबाबदाऱ्या मिळत गेल्या. व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकी सैनिक आणि व्हिएतनामी नागरिकांमध्ये संबंध सौहार्दपूर्ण असल्याचा निर्वाळा त्यांनी चौकशीअंती दिला होता. त्यात तथ्य नसल्याचे आणि प्रत्यक्षात व्हिएतनामी जनतेवर या सैनिकांकडून काही वेळा गंभीर स्वरूपाचे अत्याचार झाल्याचे पुरावे सादर केले गेले.

मुत्सद्देगिरी आणि लष्करी जाण या द्वंद्वात पॉवेल यांनी नेहमीच त्यांच्यातील लष्करी अधिकाऱ्याला झुकते माप दिल्याचे नंतरही दिसून आले. १९८९मध्ये अध्यक्ष बनल्यानंतर लगेचच जॉर्ज बुश थोरले यांनी त्यांना संयुक्त सैन्यदल प्रमुख बनवले. सुरुवातीलाच पनामा येथे जनरल नोरिएगा यांची राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिकी सैन्य पाठवावे लागले, ज्या कारवाईवर संयुक्त राष्ट्रांनीच टीका केली. इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसेन यांनी कुवेतवर हल्ला केल्यानंतर कुवेतमुक्तीसाठी पहिल्या आखाती युद्धाचा घाट वॉशिंग्टनमध्ये घातला गेला. त्या वेळी, ‘राजनयिक, राजकीय आणि आर्थिक उपाय थकल्यानंतरच लष्करी कारवाई करावी’ असा सल्ला जनरल पॉवेल यांनी दिला होता. लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर मात्र इराकला लवकरात लवकर नेस्तनाबूत (प्रथम त्यांना एकटे पाडू मग कापून काढू, असे पॉवेल यांचे शब्द) करण्याचा चंग त्यांनी बांधला. तो यशस्वी करूनही दाखवला. व्हिएतनामप्रमाणे आखातात परिस्थिती चिघळू न देण्याचा त्यांचा निर्धार होता. सन २००० मध्ये जॉर्ज बुश धाकटे यांनी त्यांना परराष्ट्रमंत्री नेमले. ९/११ हल्ल्यानंतर झालेल्या दुसऱ्या आखाती युद्धाच्या वेळी बुश प्रशासनात डोनाल्ड रम्सफेल्डसारख्या युद्ध्रखोरांनी सद्दाम हुसेनला दुसऱ्यांदा धडा शिकवण्यासाठी इराकवर हल्ला करण्याचा आग्रह धरला. पॉवेल यांनी सुरुवातीला याला विरोध केला, परंतु नंतर कारवाईला पाठिंबा दिला. कारवाईला नैतिक पाठिंबा मिळावा या उद्देशाने बुश प्रशासनाने पॉवेल यांच्या मुखातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर इराक हल्ल्याची गरज आणि नैतिकता विशद केली. पॉवेल यांची आजवरची कारकीर्द आणि त्यांची निष्ठा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनीही हल्ल्याला पाठिंबा दिला. मात्र इराकमध्ये विध्वंसक आणि संहारक अस्त्रे आहेत या कारणासाठी कारवाई होऊनही, प्रत्यक्षात अशी अस्त्रे सद्दामच्या पतनानंतरही तेथे सापडली नाहीच. यासंबंधी आम्हाला मिळालेली गुप्तवार्ता चुकीची होती, अशी कबुली पॉवेल यांना सद्दामपतनानंतर १८ महिन्यांनी द्यावी लागली. त्यानंतर लगेचच त्यांनी परराष्ट्रमंत्रिपदाचा राजीनामाही दिला.

कॉलिन पॉवेल हे उत्तम जनरल होते. मुत्सद्देगिरी आणि राजकीय आघाडीवर मात्र त्यांच्या वाट्याला भ्रमनिरास आणि घुसमटच अधिक आली. १९९५मध्ये रिपब्लिकन पक्षाचे ते अधिकृत सदस्य बनले. पुढल्याच वर्षी बिल क्लिंटन यांच्या विरोधात अध्यक्षपद निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र राजकीय कारकीर्दीसाठी आपल्याला ‘आतून साद’ मिळालेली नाही, असे सांगत त्यांनी तो मोह टाळला. मात्र ‘लिंकन यांच्या पक्षाला लिंकन यांच्या तत्त्वांच्या अधिकाधिक जवळ नेण्याचा आपला प्रयत्न राहील,’ असे त्यांनी म्हटले होते. ओबामा यांना दोन वेळा पाठिंबा जाहीर करूनही ते अखेरपर्यंत रिपब्लिकनच राहिले. ‘मी पाहिलेले रिपब्लिकन अध्यक्ष परंपरावादी होते, पण तडजोड करण्याची त्यांची तयारी असे. आता ती परंपरा अस्तंगत होते आहे,’ असे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन राजवटीविषयी ते उद्वेगाने म्हणाले होते. या उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनयात्रेला कोविड-१९ने पूर्णविराम दिला. यशोशिखरावर असूनही आयुष्यात एकदाच त्यांच्याकडून चूक झाली, पण ती कबूल करण्याचा मोठेपणा पॉवेल यांच्याकडे होता. आजच्या युगात हा गुणच दुर्मीळ बनला आहे.