अरण्यरुदन!

बेला भाटिया यांचे नाव फार कुणाला माहीत असण्याचे कारण नाही.

बेला भाटिया यांचे नाव फार कुणाला माहीत असण्याचे कारण नाही.  आपले काम भले नि आपण भले असे त्यांचे चाललेले असते; पण त्यांचे हे काम अनेकांच्या डोळ्यांवर येणारे आहे. त्या समाजशास्त्रज्ञ आहेत. प्राध्यापक आहेत.  पूर्वी त्या दिल्लीत राहायच्या. एका झोपडपट्टीत. त्यांच्या पतीबरोबर. त्यांचे नाव ज्याँ ड्रेझ. ते मूळचे बेल्जियन. नंतर भारताचे नागरिक झाले. ते अर्थतज्ज्ञ. या ड्रेझ यांची साधी ओळख म्हणजे नरेगा या योजनेचा पहिला मसुदा त्यांनी तयार केला होता. जिथे भूक, अन्याय, अत्याचार, बालआरोग्य वा बालशिक्षणाचे प्रश्न आहेत, तेथे जावे, समाजकार्य करावे, हे त्यांचे जगणे. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. त्यातील एका पुस्तकासाठी त्यांचे सहलेखक होते अमर्त्य सेन. बेला भाटिया यांचेही असेच. शोषित, वंचितांमध्ये जायचे, त्यांच्यावरील अन्याय समजून घ्यायचा, त्यांना बळ द्यायचे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी ठरविले की, बंडखोरविरोधी कारवायांबाबत संशोधन करायचे. म्हणून त्या छत्तीसगढमध्ये, बस्तरमध्ये गेल्या. आदिवासींमध्ये जाऊन त्यांच्या कहाण्या ऐकू लागल्या. त्या संशोधक म्हटल्यावर आदिवासींवर अन्याय होताना पाहून त्यांनी त्याचा फक्त अभ्यास करायचा, तर त्या त्यांना मदत करू लागल्या, त्यांच्यासाठी आवाज उठवू लागल्या. व्यवस्थेच्या नाजूक कर्णयंत्रास असे आवाज सहन होत नसतात. अशा आवाजांवर मग शिक्के मारले जातात. बेला यांच्यावर शिक्का मारला गेला नक्षलवादी समर्थक. या शिक्क्यामुळेच आता त्यांना राहते घर सोडा, नाही तर ते जाळून टाकू, तुमच्या कुत्र्याला मारून टाकू, अशी धमकी मिळाली आहे. गेल्या मंगळवारी त्यांच्या अंगणात कार आणि मोटारसायकलीवरून ३० जणांचे एक टोळके आले. त्यांनी ही धमकी दिली. हे लोक कोण होते? ते होते नक्षलविरोधक. मग ते चांगलेच लोक आहेत की! पण त्यांनी ही धमकी का दिली? तर काही महिन्यांपूर्वी येथे एक प्रकरण उजेडात आले, आदिवासी महिलांवरील बलात्काराचे. ऑक्टोबर २०१५ मध्ये १६ जणींवर बलात्कार झाले. आरोपी आहेत सीआरपीएफ आणि पोलीस दलातील जवान. आता जवान पोलिसांतले असोत की अर्धसैन्यदलातील, जवान ते जवानच. ते कसे अत्याचार करणार? पण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला त्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य आढळले. त्याची चौकशी सुरू झाली. त्या चौकशीत त्या बलात्कारी महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या बेला भाटिया. हा म्हणजे मोठाच गुन्हा केला त्यांनी. पोलिसांविरोधात गेल्या त्या. त्यामुळे मग तेथील काही लोक संतापले. तमाम ग्रामस्थांच्या वतीने आपण संताप व्यक्त केलाच पाहिजे, म्हणून त्यांनी धमक्या दिल्या. यावर भाटियांना ओळखणाऱ्या काही लोकांनी लगेच पोलीस महानिरीक्षकांना मोबाइल-संदेश केले. त्या लोकांना उत्तर आले, बस्तरमधून नक्षलवादी आणि त्यांच्या कुत्र्यांना असेच दगड मारून बाहेर काढले जाईल. आता महानिरीक्षक म्हणतात, की आपण असे एसएमएस पाठविलेच नाहीत. तेव्हा ते खरेच मानायला हवेत. चूक भाटिया यांचीच आहे. भारत नावाच्या प्रजासत्ताकाच्या बाजूने उभे राहण्याऐवजी त्या आदिवासी महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या. त्यांचे समर्थक म्हणतात, की त्या काही नक्षलसमर्थक नाहीत; पण ते कसे मान्य करायचे? आदिवासींवरील अन्याय, अत्याचाराविरोधात त्या आहेत याचा अर्थ त्यांचा विकासाला विरोध आहे; मग त्या नक्षलवादी का नसतील? या प्रजासत्ताकात आपण अशा अनेक सोप्या व्याख्या करून ठेवल्या आहेत. त्या ज्यांना पसंत नाहीत त्यांनी खुशाल ओरडावे; पण त्यांच्या त्या अरण्यरुदनाला कोण विचारते? ते तर ओएलएक्सवरून विकण्याच्या लायकीचेही नाही!

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bela bhatia