चांदणीचा अस्त..

श्रीदेवी तिच्या असंख्य चित्रपटांतील भूमिकांबरोबरच, चवीच्या रूपाने अमर राहणार आहे!

श्रीदेवी

एखादी बातमी मनात कायमची घर करून राहते. अगदी दोन आठवडय़ांपूर्वीची ती बातमीही तिच्या लाखो चाहत्यांच्या- ज्यांनी तिला कायमच स्वप्नात जपलं, त्यांच्या- मनात अशीच घर करून राहिली असणार. बातमी तशी छोटीशीच. पण ज्यांनी ती वाचली, त्या प्रत्येकालाच असे नक्कीच वाटले असणार, की तो क्षण आपण प्रत्यक्ष अनुभवावा. ते जमले नाहीच, तर पुढे कधी तरी चेन्नईला भेट द्यायचा योग आला, तर त्या जागेला भेट देऊन आपल्या मनात जपलेल्या स्वप्नाला चवीचा मुलामा तरी चढवावाच! ती बातमीच तशी होती. श्रीदेवी नावाच्या सुपरस्टार अभिनेत्रीच्या लाखो चाहत्यांपैकी एकाने तिच्यावरील अमाप प्रेमापोटी तिच्या नावाचे एक रेस्टॉरंट चेन्नईत सुरू करण्याचे जाहीर केले आणि श्रीदेवीचे इतर लाखो चाहते अक्षरश: मोहरले. या रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी स्वत: श्रीदेवी येणार अशीही चर्चा सुरू झाली, आणि  तिच्या चाहत्यांच्या नजरा रेस्टॉरंटच्या उद्घाटनाच्या तारखेकडे लागल्या.. तो क्षण प्रत्यक्षात आला किंवा नाही, त्याची बातमी नंतर श्रीदेवीच्या चाहत्यांना वाचायला मिळालीच नाही. त्याऐवजी अचानक तिचं रूप, तिचा अभिनय, तिचे डोळे आणि तिची अवखळ, परिपक्व अदाकारी जपलेल्या लाखो काळजांवरच आघात करणारी बातमी भल्या सकाळी सर्वत्र आदळली आणि बॉलीवूडचे विश्व काळवंडले. एक चांदणी अस्तंगत झाली, तरी एवढा भयाण अंधार चहुबाजूंना दाटावा हे अविश्वसनीयच.. पण श्रीदेवी नावाच्या चांदणीचा अस्त होताच, बॉलीवूडमध्ये अमावास्या दाटली. चौपन्न वर्षांच्या उण्यापुऱ्या आयुष्यातील तब्बल पन्नास वर्षे चंदेरी दुनियेत चमचमत राहणारी श्रीदेवी नावाची ही तेजस्वी ‘चाँदनी’, अकल्पितपणे या दुनियेला धक्का देत गायबच होऊन गेली. वयाच्या चौथ्या वर्षी रुपेरी दुनियेत पहिले पाऊल टाकून या अभिनेत्रीने पुढील पन्नास वर्षांत या दुनियेचे अवघे अवकाश व्यापण्याचा विक्रम केला. तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, हिंदी चित्रपट तिने आपल्या अवखळ, अल्लड, तरीही प्रगल्भ अभिनयाने असे काही जिवंत केले, की चित्रपटगृहांत केवळ तिच्या अभिनयास दाद देण्यासाठी आलेल्या रसिकांनी तिला आपल्या मनाच्या हळव्या कोपऱ्यातच कायमचे स्थान देऊन टाकले. चित्रपटसृष्टीत सौंदर्यवतींची वानवा नाही. पण कसदार अभिनयाची साथ मिळाल्यावर ते सौंदर्य अधिकच खुलते, हे श्रीदेवीच्या रसिक चाहत्यांनी केव्हाच ओळखले. म्हणूनच, वयाच्या जेमतेम १२ व्या वर्षी ‘ज्युली’ सिनेमात बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत ती दाखल झाली, तेव्हाच तिने रसिकांच्या हृदयात स्वत:साठी एक वेगळे स्थान राखूनच ठेवले आणि सोळाव्या वर्षी, १९७९ मधील ‘सोलवा सावन’ या चित्रपटातील अभिनयाने तिने हिंदी चित्रपटसृष्टी जिंकली. मग रुपेरी दुनियेत फक्त तिच्याच नावाची, रूपाची आणि अभिनयाची चर्चा होत राहिली आणि १९८३ मधील ‘हिंमतवाला’ने तिचे स्थान अढळच करून टाकले. पाच फिल्मफेअर पुरस्कार, भारत सरकारचा पद्मश्री किताब मिळविलेल्या या अभिनेत्रीला त्याहूनही मोठा सन्मान रसिकांकडून सतत मिळत गेला. अगणित एवढय़ा एकाच शब्दांत मावतील एवढे असंख्य चाहते आणि रसिक तिला ‘चाँदनी’ नावाच्या अभूतपूर्व चित्रसोहळ्याने मिळवून दिले. असंख्य चित्रपटांतून आपल्या अभिनयाने अमर झालेली ही रूप की रानी अनपेक्षितपणे एक्झिट घेती झाली. हा सदमा पचविणे सोपे नाही. पण स्वीकारणे भागच आहे.. चेन्नईतील त्या रेस्टॉरंटमधील प्रत्येक पदार्थास श्रीदेवीच्या चित्रपटाचेच नाव असणार, अशी चर्चा होती. श्रीदेवी तिच्या असंख्य चित्रपटांतील भूमिकांबरोबरच, चवीच्या रूपाने अमर राहणार आहे!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood icon sridevi dies in dubai