‘कॅप्टन’ कोण?

अमरिंदर सिंग यांनी पुढील निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली होईल, असे जाहीर करून टाकले.

काँग्रेस पक्ष सध्या फक्त तीन राज्यांमध्ये सत्तेत आहे, पण दिल्लीतील दरबारी राजकारणापायी राज्यातील नेतेमंडळींना आपापसात झुंजविण्याचे प्रयत्न एवढी बिकट परिस्थिती असूनही सुरूच आहेत. पंजाबमध्ये निवडणुकीच्या तोंडावर राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या शिडात अशी काही हवा भरली गेली की कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारख्या एके काळच्या लष्करी अधिकाऱ्याला युद्धभूमीतून माघार घेण्यासारखाच अपमान सहन करावा लागला. प्रसारमाध्यमांनी गेला महिनाभर गाजवत ठेवलेल्या घोळानंतर मुख्यमंत्री सिंग यांचा विरोध डावलून पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर पक्षश्रेष्ठींनी नियुक्ती केली. याबरोबरच जातीचे समीकरण साधण्यासाठी चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले व चारही मुख्यमंत्र्यांच्या विरोधी गोटातील. म्हणजेच पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या नांग्या पार चिरडण्यात आल्या. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कदाचित सिंग यांना झुकते माप दिले जाईल, पण पक्ष संघटनेवरील त्यांचे सारे वर्चस्व गेले. उमेदवारांची निवड, प्रचारयंत्रणा हे सारे आता सिद्धू यांच्या कलाने होणार. सिद्धू पक्ष सोडून जाऊ नये म्हणून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. पंजाबच्या राजकारणात ‘राजा साहब’ या नावाने प्रसिद्ध असलेले अमरिंदर सिंग यांची पुढची खेळी काय असेल याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. वास्तविक पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमरिंदर सिंग यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविण्यास राहुल गांधी तयार नव्हते. शेवटी एवढे ताणले गेले की, सिंग यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा इशारा दिल्यावर काँग्रेस नेतृत्व नरमले. सत्ता मिळाली आणि अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले. भाजपमधून काँग्रेसवासी झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांचा तेव्हाही मुख्यमंत्रिपदावर डोळा होता. सिद्धू यांची कॅ . अमरिंदर सिंग यांनी अजिबात डाळ शिजू दिली नाही. दिल्लीश्वरांच्या पाठिंब्यावर उचापती करणाऱ्या सिद्धू यांचे खाते काढून घेतले. काम करायचे नसल्यास सरळ घरी जाण्याचा सल्ला दिला. सिद्धू यांच्यापुढे पर्याय नव्हता आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दोन वर्षे सिद्धू गप्प बसले, पण निवडणुका जवळ आल्या आणि त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली. वास्तविक मुख्यमंत्रिपदी निवड झाली तेव्हा काही दिवसांतच पक्षाने पुढील निवडणुकीसाठी नवा चेहरा पुढे आणावा कारण आपण २०२२ च्या निवडणुकीच्या वेळी वयाच्या ८०च्या घरात असू, असे जाहीर विधान सिंग यांनी के ले होते. भाजप-अकाली दलाची तुटलेली युती, आम आदमी पार्टीमधील अंतर्गत लाथाळ्या यामुळे काँग्रेसला पुन्हा सत्तेची संधी दिसू लागताच अमरिंदर सिंग यांनी पुढील निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली होईल, असे जाहीर करून टाकले. किती काळ एकाच नेत्याकडे नेतृत्व ठेवायचे हा पक्षाचा दावा योग्य असला तरी सध्याच्या परिस्थितीत अमरिंदर सिंग यांना दुखावणे पक्षाला निश्चितच महागात पडू शकते. कारण गेल्या पाच वर्षांत के लेल्या कारभारामुळे राज्यावर त्यांची चांगली पकड आहे आणि काँग्रेसमधील बहुतांश लोकप्रतिनिधी त्यांना मानणारे आहेत. वेगळा पर्याय स्वीकारण्याएवढी राजकीय आणि आर्थिक ताकद अमरिंदर सिंग यांच्यापाशी आहे. भाजपचे धुरीण तर काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींकडे बारीक नजर ठेवून बसलेलेच असतात. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना दिलेल्या आश्वासनाचे पालन न करणे, छत्तीसगडमध्ये बऱ्यापैकी बस्तान बसलेल्या मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यामागे पक्षातील बंडखोरांना उचकवणे, पंजाबमध्ये सिंग यांचे पंख कापणे यातून सत्ता असलेल्या तिन्ही राज्यांमध्ये विरोधकांपेक्षा स्वकीयांचेच आव्हान काँग्रेसला अधिक असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Captain amarinder singh upset after navjot singh sidhu become punjab congress chief zws

ताज्या बातम्या