क्रिकेटच्या नकाशावर झिम्बाब्वे हा देश कधीच सामर्थ्यशाली म्हणून ओळखला गेला नव्हता. १९८३च्या विश्वचषकात भारतीय संघाच्या ५ बाद १७ अशा केविलवाण्या स्थितीनंतर कपिल देवने १७५ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली, ती याच झिम्बाब्वेविरुद्ध. डंकन फ्लेचर, अँडी व ग्रँट हे फ्लॉवर बंधू, हिथ स्ट्रीक, हॅमिल्टन मासाकाझा, अ‍ॅलिस्टर कॅम्पबेल, ब्रॅण्डन टेलर अशा काही क्रिकेटपटूंनी मात्र मैदाने गाजवली, काहींनी परदेशात प्रशिक्षक म्हणूनही आपली छाप पाडली. आर्थिक तंगी असलेल्या या देशातून अधूनमधून काही क्रिकेटपटूंच्या लाचलुचपतीच्या घटना मात्र चर्चेत आल्या. माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक स्ट्रीकला सामना निश्चितीप्रकरणी ‘आयसीसी’ने आठ वर्षांची बंदी घातली. झिम्बाब्वेचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दबदबा असलेल्या टेलरच्या ताज्या ‘ट्वीट’ने मात्र क्रिकेटविश्वात खळबळ माजवली आहे. २०१९ मध्ये एका अज्ञात भारतीय व्यावसायिकाने त्याला प्रायोजकत्व आणि झिम्बाब्वेत स्थानिक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यासाठी १५ हजार डॉलर देऊ करून भारतात चर्चेला बोलावले. त्याच सुमारास, झिम्बाब्वेच्या खेळाडू आणि मार्गदर्शकांचे सुमारे सहा महिन्यांचे मानधन थकले होते.  या भारतीय व्यावसायिकाने सायंकाळच्या पेयपान बैठकीत टेलरशी जुजबी चर्चा झाल्यावर त्याच्यासह ‘कोकेन’ सेवन केले आणि मग या भेटीची चित्रफीत सार्वजनिक  करण्यात येईल, अशी धमकी देत निकालनिश्चितीबाबत चर्चा करण्यात आली. ठरलेले १५ हजार डॉलर घेऊन तो मायदेशी परतला. या प्रकरणाबाबत त्याने ‘आयसीसी’ किंवा सरकारी यंत्रणांकडे वाच्यता केली नाही. यानंतर १२ एकदिवसीय, सात ट्वेन्टी-२० आणि सहा कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करूनही निकालनिश्चिती कधीच केली नाही, असा दावा टेलरने केला आहे. नुकतीच त्याने ‘आयसीसी’कडे या घटनेविषयी माहिती दिली आहे. हे दडवल्याबद्दल त्याच्यावर प्रदीर्घ बंदीची कारवाई होऊ शकेल. परंतु त्याने गतवर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. एकीकडे एका जाळय़ात अडकलेला क्रिकेटपटू हे कथानक समोर येते. तर दुसरीकडे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हा फक्त चार महिन्यांचा विलंब झाल्याचे तो म्हणतो. आर्थिक विवंचना तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या ताणाची कैफियत मांडतो. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत करणारा भावनिक ताण कसा जाणवतो आहे, हेसुद्धा तो स्पष्ट करतो. टेलरसारख्या निवृत्त खेळाडूला धुत्कारण्याऐवजी, त्याचे हे प्रकरण इतरांसाठी धडा ठरो, असा समाजमाध्यमी प्रतिक्रियांचा सूर दिसतो, तो योग्यच. विशेषत: भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विनने, ‘हात पुढे करायचा की हातांची घडी घालायची, यातून घडी घालण्याचा पर्याय चांगला,’ असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर या निमित्ताने आधुनिक खेळाडू किती असुरक्षित आहेत, याबाबत ट्विप्पणी करताना क्रिकेट समालोचक हर्षां भोगले यांनी ‘काही वेळा जे चुका करतात ते सर्वोत्तम धडा देतात,’ अशा शब्दांत टेलरविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. या घटनेची सत्यता काय किंवा टेलरला शिक्षा द्यावी की माफीचा साक्षीदार करावे, याची सुनावणी करणे ‘आयसीसी’च्या कक्षेत येते. मात्र ब्रॅण्डन टेलरच्या घटनेनिमित्ताने पुन्हा सामना/निकालनिश्चिती संदर्भातली चर्चा पुन्हा क्रिकेटसाठी पैसा असलेले बडे भारतीय आणि या खेळातून तुलनेने कमी पैसा मिळवणाऱ्या देशांचे खेळाडू याच वळणावर गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex zimbabwe skipper brendan taylor tweet on match fixing zws
First published on: 26-01-2022 at 01:17 IST