पाकिस्तानी अणुबॉम्बचे निर्माते डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या निधनामुळे अण्वस्त्रे तस्करी आणि अवैध प्रसाराचे एक धोकादायक पर्व  समाप्त झाले आहे.. ही झाली पाकिस्तानबाहेरील भारतासह बहुतेक जबाबदार देशांची भावना. पाकिस्तानात मात्र अब्दुल कादीर खान यांना ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ मानले जाते. रावळपिंडीत रविवारी त्यांचा सरकारी इतमामात दफनविधी झाला. करोनाच्या पहिल्या प्रहारातून ते सावरले होते, तरी या विषाणूने त्यांची फुप्फुसे उसवली. त्यांनीच अखेर दगा दिला. पण रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही आपली साधी चौकशीदेखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी केली नाही अशी खान यांची तक्रार अगदी परवाचीच. आराधना आणि उपेक्षा असा विचित्र खेळ त्यांच्या वाटय़ाला गेली दीड दशके आला. अब्दुल कादीर खान म्हणजे पाकिस्तानची जाज्वल्य अस्मिताच, असे सांगणारे या ‘अस्मिते’ला इतकी वर्षे नजरकैदेच्या नावाखाली डांबून का ठेवले गेले, याचे समाधानकारक उत्तर कधीही देऊ शकले नाहीत. कोणत्या तोंडाने देणार? कारण अण्वस्त्रनिर्मितीचे तंत्रज्ञान अब्दुल कादीर खान यांनी केवळ चोरून आत्मसात केले असे नव्हे. त्यांनी कधी तत्कालीन पाकिस्तानी शासकांच्या छुप्या संमतीने, तर कधी त्यांना अंधारात ठेवून असे तंत्रज्ञान (पाश्चात्त्य परिभाषेतील) पुंड राष्ट्रांना विकलेही! या पुंड मंडळींपैकी इराण आणि उत्तर कोरिया यांच्या अण्वस्त्रसज्जतेविषयी आणि दु:साहसवृत्तीविषयी लोकशाही जगाला आजही रास्त साशंकता आहे. अब्दुल कादीर खान यांच्या उचलेगिरी आणि लपवेगिरीमुळे जग आज अधिक धोकादायक बनले आहे. या परिप्रेक्ष्यात खान आणि पाकिस्तान यांची भूमिका समजून घ्यावी लागेल.

अब्दुल कादीर खान यांचा जन्म भारतात भोपाळचा. फाळणीनंतर जरा उशिराने म्हणजे १९५२ मध्ये ते पाकिस्तानला गेले. इतर बहुतेक मुहाजिरांप्रमाणेच त्यांच्यातही ओतप्रोत भारतद्वेष तोवर भिनलेला होता. भौतिकशास्त्रात पदवी घेऊन काही काळ कराची महापालिकेत व्यतीत केल्यानंतर ते युरोपला गेले. जर्मनी आणि नंतर नेदरलँड्समध्ये धातू अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि बेल्जियममध्ये पीएच.डी. मिळवल्यानंतर नोकरीनिमित्त ते नेदरलँड्सला परतले आणि तेथेच काही काळ स्थायिक झाले. एक हुशार आणि मेहनती धातुतंत्रज्ञ ते महत्त्वाकांक्षी आणि धोकादायक व लोभी अणुशास्त्रज्ञ या प्रवासाला तेथेच सुरुवात झाली. अण्वस्त्रनिर्मितीसाठी अत्यावश्यक युरेनियम समृद्धीकरणात वापरल्या जाणाऱ्या केंद्रोत्सारी तंत्रज्ञानाविषयी (सेंट्रिफ्युज टेक्नॉलॉजी) त्यांना विशेष आकर्षण होते. नेदरलँड्समध्ये फिजिकल डायनॅमिक रिसर्च लॅब (एफडीओ) या संस्थेत काम करत असताना युरेनियम समृद्धीकरणाशी संबंधित अनेक आराखडे त्यांना नजरेखालून घालता आले. ‘एफडीओ’ ज्या मूळ डच संस्थेचे कंत्राटदार होते, ती युरोपीय युरेनियम समृद्धीकरण संघटनेची सदस्य संस्था होती. येथेच अब्दुल कादीर खान यांच्या संशयास्पद वाटाव्यात अशा हालचाली सुरू झाल्या. डच गुप्तचरांनी या हालचालींची नोंद घेऊन त्यांच्यावर पाळत वाढवली. पण अटक मात्र केली नाही. मग त्या मूळ डच कंपनीने केंद्रोत्सारी उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित काही कागदपत्रांचे जर्मन भाषेतून डच भाषेत भाषांतर करण्याची जबाबदारी अब्दुल कादीर खान यांच्यावर सोपवली. १६ दिवस ती अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे खान यांच्या ताब्यात होती! भाषांतरच नव्हे, तर तंत्रज्ञान हस्तांतरही यानिमित्ताने सुफळ पूर्ण झाले!

१९७१ मधील बांगलादेश युद्ध आणि मे १९७४ मध्ये भारताने घेतलेल्या पहिल्या पोखरण अणुचाचण्या यांच्याकडे खान बारीक लक्ष ठेवून होते. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना पत्र लिहिले. पाकिस्ताननेही अण्वस्त्र कार्यक्रम हाती घ्यावा आणि याकामी आपण तंत्रज्ञान पुरवू शकतो असे त्यांनी सांगितले. एव्हाना त्यांच्याविषयी अमेरिकी गुप्तचर यंत्रणाही साशंक बनल्या होत्या. डच यंत्रणेने त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट बजावले. पण तोपर्यंत (डिसेंबर १९७५) अब्दुल कादीर खान पाकिस्तानात पोहोचलेही होते. एरवी कधीही युरेनियम समृद्धीकरण तंत्रज्ञान खुल्या मार्गाने पाश्चिमात्य देशांकडून पाकिस्तानपर्यंत पोहोचते ना. पण अब्दुल कादीर खान यांची चलाखी आणि डच तसेच युरोपीय यंत्रणांच्या भोंगळपणामुळे या तंत्रज्ञानाचे आणि भविष्यातील अणुबॉम्बचे निर्माते तंत्रसज्ज होऊन पाकिस्तानात अवतरले. काहुटा येथे एक प्रयोगशाळा खान यांच्या आधिपत्याखाली परिचालित झाली. काहुटा प्रयोगशाळेचे पुढे यथावकाश ‘खान रिसर्च लॅबोरेटरीज’ असे नामकरणही झाले.

१९८६-८७ दरम्यान ‘ऑपरेशन ब्रासटॅक्स’ नामे एक अजस्र सैन्यदल कवायत भारताने पश्चिम व वायव्य सीमेवर घडवून आणली. पाकिस्तानला जरब बसवणे हा त्या कवायतीचा उद्देश होता. या खेळीला प्रतिहादरा देण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने अब्दुल कादीर खान यांच्या मुखातून आणि ज्येष्ठ व आदरणीय भारतीय पत्रकार कुलदीप नय्यर यांच्याबरोबर त्यांच्या मुलाखतीत स्वत:च्या अण्वस्त्रसिद्धतेची स्पष्ट कबुलीच दिली गेली. पाकिस्तानचा हेतू सफल झाला असावा, कारण त्या देशावर कोणत्याही प्रकारच्या लष्करी चढाईचे बेत विरघळून गेले. १९९८ मध्ये भारताच्या दुसऱ्या टप्प्यातील अणुचाचण्यांपाठोपाठ पाकिस्ताननेही अणुस्फोट घडवून आणले. तोपर्यंत खान यांची महत्त्वाकांक्षा पाकिस्तानपुरती मर्यादित राहिली नव्हती. अण्वस्त्रांची कोटय़वधी डॉलरची छुपी बाजारपेठ त्यांना खुणावू लागली होती. नव्वदच्या दशकातच उत्तर कोरिया, इराण, लिबिया, काही प्रमाणात सीरिया व इराक अशा देशांना केंद्रोत्सारी तंत्रज्ञान विकण्याचे उद्योग खान यांनी केले. सौदी अरेबियाने त्यांच्या ज्ञानाचा वापर ‘इस्लामिक बॉम्ब’ निर्मितीसाठी करायचे ठरवले होते. यापैकी कोणत्याही देशाला खुलेपणाने अण्वस्त्रनिर्मिती करण्याची परवानगी आजही नाही. तशी ती नसतानाही ज्या एकमेव देशाबरोबर अमेरिकेने नागरी अणुसहकार्य करार केला, तो देश म्हणजे भारत!

१९७९ मध्ये एका अत्यंत प्रतिभावान भौतिकशास्त्रज्ञांना या विषयातले नोबेल पारितोषिक जाहीर झाले. असा बहुमान मिळवणारे ते पाकिस्तानचे आणि इस्लामी जगतातील पहिलेच शास्त्रज्ञ. त्यांचे नाव डॉ. अब्दुस सलाम. १९६० ते १९७४ या कालखंडात ते पाकिस्तानचे वैज्ञानिक सल्लागार होते. पाकिस्तानात विज्ञानसुविधा उभारून अद्ययावत करण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण सुन्नीबहुल पाकिस्तानी शासकांना त्यांचे अहमदिया असणे झेपले नाही. १९७४ मध्ये अहमदियांना बिगरइस्लामी ठरवण्याचा प्रस्ताव पाकिस्तानी संसदेत एकमताने मंजूर झाला. त्याचा निषेध म्हणून अब्दुस सलाम देश सोडून निघून गेले. त्या शास्त्रज्ञोत्तमाला गमावण्याने विषाद करण्याऐवजी पुढील काही महिन्यांतच अब्दुल कादीर खानसारख्या अणुतंत्रज्ञ-तस्कराला पाकिस्तानी शासक आणि जनतेने खुल्या दिलाने स्वीकारले! अशा देशात दाऊद इब्राहिम, मसूद अझर, अहमद उमर सईद शेख, ओसामा बिन लादेन यांना आश्रय मिळतो यात आश्चर्य ते कोणते?