मच्छिमार वाऱ्यावर?

या नौकेवर ‘पीएमएसए’कडून नेमक्या कोणत्या कारणासाठी बेछूट गोळीबार झाला हे अद्याप अस्पष्ट आहे

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी सागरी सुरक्षा संस्थेच्या (पीएमएसए) गोळीबारात पालघर जिल्ह्यातील श्रीधर चामरे या मराठमोळ्या मच्छिमार तरुणाचा जीव जाणे ही घटना खिन्न करणारी आहे. श्रीधर गुजरातच्या ओखा बंदरात मच्छिमारी नौकेवर नोकरीस होता. कुटुंबात तो एकटा कमावता. या प्रकरणाची चौकशी पोलीस, तटरक्षक दल, परराष्ट्र खाते अशा विविध स्तरांवर सुरू झाली आहे. त्यातून निष्पन्न काहीही निघाले तरी गेलेला जीव परत येणार नाही. श्रीधर ज्या ‘जलपरी’ नौकेवरून खोल समुद्रात गेला, ती भारतीय सागरी हद्दीत संचार करत होती असे सोबतच्या मच्छिमारांचे म्हणणे आहे. या नौकेवर ‘पीएमएसए’कडून नेमक्या कोणत्या कारणासाठी बेछूट गोळीबार झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. या ताफ्यातील ‘श्री पद्मनी’ ही अन्य नौका मच्छिमारांसकट पाकिस्तानी संस्थेने ताब्यातच घेतली. या मच्छिमारांच्या जीविताविषयी, तसेच नौकेविषयी अधिक तपशील मागवला जात आहे. ही घटना भारतीय सागरी हद्दीत घडली असेल तर ती अतिशय गंभीर आहे. या नौका उभयांतरवर्ती (बफर) क्षेत्रात संचार करत असतील तर त्यांना हटकण्याविषयी किंवा त्यांची चौकशी करण्याविषयीचे आंतरराष्ट्रीय सागरी कायदे आणि संकेत आहेत. मुळात सागरी हद्दी या भूमीय हद्दींप्रमाणे स्पष्ट आरेखित नसतात. शिवाय खोल समुद्रात सागरी किंवा वाऱ्याच्या प्रवाहामुळे भरकटल्यास त्याविषयी तात्काळ माहिती मिळावी यासाठी अत्यावश्यक अशी आधुनिक नौकानयन आणि संदेशवहन उपकरणे बहुतेक मच्छिमार नौकांवर नसतात. याविषयी मच्छिमार समुदायाकडून वारंवार मागणी झालेली असूनही, ती पुरवण्याबाबत सर्वस्तरीय उदासीनता दिसून येते. मच्छिमारांवर दुसऱ्या देशाकडून अशा प्रकारे जीवघेणे हल्ले होण्याची ही पहिली घटना नव्हे. यापूर्वी श्रीलंकन तटरक्षक दलाकडूनही असा प्रकारे हल्ले झालेले आहेत. याची झळ तमीळ मच्छिमारांना अनेकदा बसली. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांशी आपले संबंध सौहार्दाचे फारसे नसतात. विशेषत पाकिस्तानच्या बाबतीत याचा फटका आपल्याला ताबारेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर बसत असतोच. इतके असूनही एकमेकांच्या देशात सीमावर्ती प्रदेशातील दरीखोऱ्यांचा अंदाज न आल्याने भरकटणाऱ्या मेंढपाळांना, गुराख्यांना किंवा गुरांना मूळ देशात पाठवण्यात फारशी खळखळ केली जात नाही. बांगलादेश सीमेच्या बाबतीतही हेच. याचे कारण याविषयी दोन देशांतील लष्करी आणि निमलष्करी यंत्रणा सातत्याने संपर्कात असतात. तसाच काहीसा सातत्यपूर्ण संवाद सागरी हद्दींच्या बाबतीतही सुरू करण्याची नितांत गरज आहे. वातावरण बदलाचा मोठा फटका अरबी समुद्रातील मत्स्योत्पादनाला बसला असल्याचे ‘नासा’च्या २०१९मध्ये प्रसृत झालेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी खोलवर समुद्रात जावे लागणे आणि तेथे अनेक आठवडे प्रतीक्षा करत राहणे हे नित्याचेच. अशा वेळी परस्परांच्या सगरी हद्दीत भरकटणे किंवा असा वावर शत्रुपक्षाला संशयास्पद वाटणे हेही वारंवार घडते. या बाबतीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान २००८मध्ये करार झाला असून, मच्छिमारांसारख्या बिगर-युद्धगुन्हेगार व्यक्तींना कशा प्रकारे ताब्यात घ्यावे आणि त्यांच्या पाठवणीसाठी काय करावे हे निश्चित करणारी समिती गठित करण्याचे ठरले. या नियम-संकेतांना पाकिस्तानने हरताळ फासलेला दिसतो. अशा संकेतांविषयी पाकिस्तान किती गंभीर आहे, याचा मासला त्या देशाने नुकतीच श्रीनगर-शारजा विमानाला आपली हवाई हद्द वापरण्यास दिलेली परवानगी महिन्याभरात नाकारून सिद्धच केले आहे. दोन्ही घटना आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचा भंग करणाऱ्या आहेत. त्याविषयी राजनैतिक पातळीवर लढाई सुरू करतानाच, आपल्या मच्छिमारांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेविषयी तटरक्षक दलाची मदत घेणे हेही आपल्यासाठी अनिवार्य ठरते. मच्छिमारांना वाऱ्यावर सोडून ही जबाबदारी टाळता येणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fisherman of palghar village killed in firing by pakistan zws

ताज्या बातम्या