‘सात्त्विक(!) विषपेरणी’चा उद्रेक

दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च घटनापीठाने २९ जून रोजी त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली.

दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा सध्या तुरुंगात आहेत. त्यांचा शिक्षाकाल १५ महिन्यांचाच आहे. गुन्ह्याचे स्वरूपही न्यायालयाचा अवमान असे काहीसे राजकीय स्वरूपाचे, परंतु तुलनेने कमी गंभीर. न्यायालयाचा अवमान झाला कारण झुमा यांच्या अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत- २००९ ते २०१८ या काळात- झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी न्यायालयानेच स्थापलेल्या समितीसमोर येण्यास त्यांनी नकार दिला. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च घटनापीठाने २९ जून रोजी त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली. ते सहजी हार मानणारे नव्हतेच. काही काळ तांत्रिक, कायदेशीर अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न झाले, जे फसले. ७ जुलै रोजी म्हणजे घटनापीठाने घालून दिलेली मुदत संपण्यापूर्वी झुमा यांची रवानगी तुरुंगात झाली. तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांच्या गढीसमोर मोठा जमाव जमवण्यात आला. झुमा यांच्या अटकेनंतर त्यामागील कारणांबाबत खोटी माहिती त्यांचे पाठीराखे आणि कुटुंबीयांनी समाजमाध्यमांवरून प्रसृत केली. यातून जो हिंसाचार उसळला, ती ‘झुमा यांच्या अटकेने व्यथित झालेल्यांची उत्स्फूर्त, सात्त्विक प्रतिक्रिया’ आहे असे झुमा यांचे समर्थक आजही सांगतात. खरे म्हणजे ‘संतप्त जमावा’कडून जाळपोळ, लुटालूट यात सात्त्विक किंवा उत्स्फूर्त असे काही असत नाही. असा हिंसाचार सहसा नियोजित आणि तो घडवणाऱ्यांकडून नियंत्रितच असतो. दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलु नाताल आणि गाउतेंग या दोन प्रांतांना हिंसाचाराची सर्वाधिक झळ पोहोचली. बुधवार रात्रीपर्यंत ७२ जणांनी प्राण गमावले होते. यांपैकी बहुतेक जण मोठाले, चकचकीत मॉल लुटण्याच्या प्रयत्नात झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावले. जोहान्सबर्ग, डर्बन शहरांतील हे मॉल दक्षिण आफ्रिकेच्या समृद्धीचे प्रतीक मानले जात. असे मॉल, वाहनांच्या शोरूम, लहानमोठी दुकाने रातोरात लुटली गेली आणि ही लुटालूट रोखण्याच्या प्रयत्नात पोलीस कमी पडले म्हणून लष्कराची मदत घेतली गेली. पण परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यानिमित्ताने दुहेरी कात्रीत सापडले आहेत. सध्या दोनच प्रांतांमध्ये मर्यादित असलेला हा हिंसाचार इतरत्र पसरला तर त्यांचे अध्यक्षपद तसेच देशातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. लुटालूट करणारे प्रामुख्याने झुलू जमातीचे आहेत आणि जेकब झुमा हेही झुलूच. दक्षिण आफ्रिकेतील हा सर्वांत मोठा वांशिक गट. तेव्हा वांशिक बहुसंख्याकांपैकी मोजक्या माथेफिरूंना आवरायचे, त्याच वेळी त्या समाजातील इतरांना दुखवायचे नाही अशी ही कसरत आहे. इतक्या उघड व बेमुर्वतखोर लुटारूंवर गोळ्या चालवण्यात आलेल्या नाहीत, कारण झुमा यांचे समर्थक त्याचेही राजकारण करतील आणि परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल, असे सरकारला वाटते. कोविड-१९चा विध्वंस जोखण्यात आणि रोखण्यात अपेशी ठरलेल्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी दक्षिण आफ्रिका एक. त्यामुळे येथेही लसीकरणाचा वेग पुरेसा नाही आणि त्यामुळे प्रलयकारी दुसरी लाट स्थिरावून आता तिसरी येऊ घातली आहे. सत्ताच्युत झाल्यानंतर किंवा न्यायिक कात्रीत सापडणार याची जाणीव झाल्यानंतर समर्थकांना भडकवणारे अलीकडच्या काळातील प्रमुख नेते म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राायलचे माजी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू. दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, समृद्धीचा स्पर्शही न झालेल्यांच्या अवाढव्य संख्येतून निर्माण झालेली विषमता. जे आयुष्यभर कमाई करून मिळणार नाही, ते एका रात्रीत लुटून मिळेल ही जाण सहजप्रवृत्तीतून येण्यासारखी नसते. त्यासाठी कुणाकडून तरी ‘सात्त्विक विषपेरणीची’च गरज असते. तशी ती जेकब झुमा यांनी केली. त्यांच्या या गुन्ह्याबद्दल स्वतंत्र खटला भरवला जाण्याचीच गरज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Former south african president jacob zuma akp