डोळय़ांवर सोनेरी काडय़ांचा चष्मा आणि त्यामागील डोळय़ांतून दिसणारा करारीपणा, क्वचित स्मितहास्य, खळाळून हास्याची शक्यता जवळपास दुर्मीळ म्हणावी अशी, व्यक्तिमत्त्वात कमालीचा आत्मविश्वास.. माधव गोडबोले यांची केंद्रीय गृह खात्यात सचिवपदी नियुक्ती झाली, तेव्हा त्यांना ‘शंकरराव चव्हाणांचा माणूस’ म्हणून ओळखले जात असे. शंकरराव तेव्हा देशाचे गृहमंत्री होते, म्हणून त्यांनी महाराष्ट्रातून गृहसचिवपदावर गोडबोले यांना आणले, या चर्चेकडे स्वत: गोडबोले यांनी कानाडोळाच केला. देशात प्रचंड उलथापालथी सुरू असताना माधवराव नेमस्तपणे आपले काम करत राहिले. आणीबाणी, मुंबईतील बॉम्बस्फोट, राम मंदिर चळवळ यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील घटना घडत असताना गोडबोले यांनी आपले स्वत्व पणाला लावले आणि मंत्र्यांकडून केवळ सहीपुरते येणारे अनेक प्रस्ताव परत पाठवले. आपल्या ‘अनफिनिश्ड इिनग्ज’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात माधवरावांनी हा सगळा लेखाजोखा सविस्तर मांडला आहे. देशातील सनदी नोकरशाही आपले सत्त्व पणाला लावत नाही, अशी खंतही त्या पुस्तकात त्यांनी व्यक्त केली. अशा वातावरणातच नोकरीचे सतरा महिने राहिलेले असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अखेपर्यंत ते लेखनात व्यग्र राहिले. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील कागदपत्रे धुंडाळून त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये ग्रंथसंपदा निर्माण केली. माधवरावांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतरही त्यांच्यावर ‘मिस्टर नो’ या झालेल्या आरोपाला त्यांनी सडेतोड उत्तर दिले आणि एका नव्या वादाला तोंडही फुटले. सनदी अधिकारी म्हणून काम करताना नियमांचे तसूभरही उल्लंघन होता कामा नये, यासाठी दक्ष असणारे अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात असे. महाराष्ट्रात अर्थ खात्याचे सचिव आणि वीज मंडळाचे अध्यक्ष यांसारख्या अनेक पदांवर काम करताना त्यांनी सातत्याने ही भूमिका स्वीकारली. साहजिकच त्या त्या काळातील राजकारण्यांचा त्यांच्यावर रोष असे. भोवताली प्रलोभनांनी फेर धरलेला असतानाही, त्याकडे ढुंकून न पाहाणाऱ्या माधवरावांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेचे कधी भांडवल केले नाही. अर्थशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. त्याच विषयात त्यांनी डॉक्टरेट ही पदवीही संपादन केली. मुळात अभ्यासू प्रवृत्ती असल्याने, सतत वाचन आणि लेखन करणे हे अधिक विधायक आहे, असे त्यांना वाटत असे. जाहीर सभा समारंभात जाण्यापेक्षा हे काम अधिक टिकाऊ आहे, असे ते म्हणत. लोकसभा ग्रंथालयातील मौल्यवान ग्रंथसंपदा माधवरावांसाठी अन्य कशाहीपेक्षा अधिक महत्त्वाची वाटे. आपल्या ग्रंथांमध्ये जागोजागी संदर्भाची जोड देऊन आपले लेखन अधिक सकस कसे करता येईल, यावर त्यांचा भर असे. एखाद्या विषयाकडे अनेक अंगांनी पाहाण्यासाठी सारे संदर्भ तपासण्याची त्यांची पद्धत, त्या लेखनाला सत्याच्या अधिकाधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करीत असे. त्यामुळे ग्रंथलेखनाबरोबरच मोठय़ा प्रमाणात त्यांनी वृत्तपत्रीय लेखनही केले. सार्वजनिक जीवनात माधवराव क्वचित दिसत असले, तरी समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर त्यांनी जाहीर व सामुदायिकपणे विरोध केला. परंतु नेमस्तपणा हीच त्यांची नेहमीची ओळख राहिली. उच्चरवात भाषणे करण्यापेक्षा आपला प्रत्येक मुद्दा सप्रमाण समजावून सांगणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटत असे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडाचा अभ्यासू साक्षीदार निवर्तला आहे.