scorecardresearch

अन्वयार्थ : अभिव्यक्तीचा सोहळा

यंदाचा ९४वा ऑस्कर सोहळाही याला अपवाद नव्हता. येथील कलाकारांनी युक्रेनवर लादल्या गेलेल्या युद्धाचा जाहीर निषेध केला.

मनोरंजन-उद्योगात हल्ली पुरस्कार सोहळय़ांची कमतरता नसली तरीही काही सोहळे लक्षात राहतात ते पुरस्कारप्राप्त कलाकृती वा कलावंतांच्या दर्जाप्रमाणेच, पुरस्कार स्वीकारताना केल्या गेलेल्या भाषणांमुळे! ‘हे अ‍ॅवॉर्ड घेताना मला खूप प्राऊड वाटतंय’ या प्रकारची भाषणे मराठीच्या धिंडवडय़ांमुळे लक्षात राहतातच, पण २०१७ सालच्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळय़ातील मेरिल स्ट्रीपचे भाषण हे कलावंताच्या राजकीय-सामाजिक जाणिवांचा निर्भीड आविष्कार म्हणून स्मरणीय ठरले. ट्रम्पसारखे राज्यकर्ते खपवून घेता येणार नाहीत, असे मेरिल स्ट्रीप यांनी म्हटल्यामुळे काही ट्रम्प पराभूत झाले नसतील, पण ते पराभूत होणारच नसल्याचे वातावरण असूनही एवढे धाडस मेरिल यांनी दाखवले होते. सन २०१९ आणि २०२०च्या ऑस्कर सोहळय़ांमध्ये ‘मी टू’ आणि ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या चळवळींचे प्रतिबिंब कलावंतांमुळे झळाळले. अधिकारपदे वापरून पुरुषांकडून होणारे महिलांचे लैंगिक शोषण आणि व्यवस्थेत भिनलेला वंशभेद यांचा निषेध करणाऱ्या या चळवळी समाजमाध्यमांपुरत्या न उरता रस्त्यावर उतरल्या होत्याच आणि त्यांनी काहीएक बदल घडवून आणला होताच, पण ऑस्कर विजेत्यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने या चळवळींचे महत्त्व वाढले. कलावंतांचे हे उद्गार म्हणजे त्या-त्या वेळच्या सामाजिक जागरूकतेची अभिव्यक्ती ठरतात. यंदाचा ९४वा ऑस्कर सोहळाही याला अपवाद नव्हता. येथील कलाकारांनी युक्रेनवर लादल्या गेलेल्या युद्धाचा जाहीर निषेध केला. ‘द गॉडफादर’ या चित्रपटाला अर्धशतक पूर्ण झाल्याबद्दल दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कपोला तसेच या चित्रपटातील कलावंत रॉबर्ट डि नीरो आणि अल पचिनो यांचे मंचावर खास पाचारण झाले तेव्हा, भाषण संपवताना कपोला यांनी ‘व्हिव्हा युक्रेन’ अशी घोषणा करीत युक्रेनच्या लढय़ासाठी सदिच्छा व्यक्त केली. युक्रेनमध्येच जन्मलेली अभिनेत्री मिला कुनिस हिने तर सभागृहाला मौन पाळण्याचे आवाहन करून, युक्रेनवरील हल्ल्यांचा निषेध फक्त मी करत नसून अख्खे सभागृह शांतताप्रेमी आहे, हेही दाखवून दिले. ‘कोडा’ या चित्रपटास पुरस्कार मिळाल्यानिमित्ताने मूक-बधिरांच्या संकेतभाषेलाही ऑस्कर मंचावर स्थान मिळाले, हीसुद्धा सामाजिक जाणिवेचीच अभिव्यक्ती.. पण या साऱ्याची चर्चा बाजूलाच पडेल, असे काही यंदाच्या सोहळय़ात घडले.

या सोहळय़ाचे एक निवेदक आणि विनोदकार क्रिस रॉक यांच्या एका कोपरखळीमुळे संतापून, यंदा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून ऑस्करची बाहुली मिळवणाऱ्या विल स्मिथ यांनी मंचावर चढून, रॉक यांच्या श्रीमुखात भडकावली. हे असे संताप-प्रदर्शन गेल्या ९४ सोहळय़ांनी कधी पाहिले नसेल, ते यंदा घडले. रॉक यांनी स्मिथ यांच्या सहचरीबद्दल केलेली टिप्पणी या संतापाचे निमित्त ठरली होती. स्मिथ नंतर बहुधा भानावर आले असावेत. त्यांच्या डोळय़ांतून जणू अश्रू ओघळत आहे, ते थरथरत आहेत, असे दृश्यही दिसले. खपवून घेता येणारच नाही अशा उद्गारांमुळे आपल्याकडून हे घडल्याचे सांगण्याचा प्रयत्नही स्मिथ यांनी केला. मात्र विनोदकार म्हणून रॉक यांना एखाद्या अभिनेत्रीची खिल्ली उडवणाऱ्या अभिव्यक्तीचेही पूर्ण स्वातंत्र्य आहे, ती ज्याची सहचरी आहे त्याने संतापणे ठीक, पण शारीरिक हल्ला हे अशा संतापाच्या ‘अभिव्यक्ती’चे साधन ठरू शकत नाही, असेच मत अनेकांनी, सोहळा संपल्यानंतर व्यक्त केले आहे. अभिव्यक्तीची प्रेरणा निखळ की संकुचित, याचाही धडा यंदाच्या सोहळय़ाने दिला तो असा!

मराठीतील सर्व अन्वयार्थ ( Anvyartha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hollywood stars paid tribute to ukraine at oscars 2022 zws

ताज्या बातम्या