घटना जुनी झाली, लोक ती विसरूनही गेले की मग त्यावर आरोपपत्र आदी कार्यवाही सुरू करण्याचा खाक्या उत्तर प्रदेशचे पोलीसही पाळत आहेत. त्या राज्यातील दादरी येथे २८ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात आता आरोपपत्र तयार झाले आहे. एरवी हा खाक्या चालून जातो आणि ९० दिवसांची मुभा कायद्यानेही दिलेली असतेच. पण दादरी येथील घटना साधी नव्हती. जमावाने एका रहिवाशाला ठार मारून त्याच्या मुलाला जखमी करणे, कायदा हातात घेणे, इतकेच तिचे स्वरूप नव्हते. इखलाक या मुस्लीम रहिवाशाचे आयुष्य हिंदूंच्या जमावाने ज्या कारणासाठी संपवून टाकले, ते कारण होते गोवंश हत्याबंदीच्या विरोधात वर्तन केल्याचे. कायदे आपल्या देशाचे नसून आपल्या धर्माचे आहेत, अशा गैरसमजाखाली समाजातील बहुसंख्य लोक वावरत असतील, तर काय होते हे इस्लामी देशांत वारंवार दिसते, ते उत्तर प्रदेशात दादरीच्या निमित्ताने पुन्हा दिसून आले. गोवंश हत्याबंदीचा कायदा उत्तर प्रदेशात आधीपासून आहे. मात्र त्याचा भंग इखलाकने केला असल्याची आवई गावातील मंदिरातून उठवण्यात आली आणि मंदिरातील लोकांपैकी काही जण इखलाकच्या घरात घुसले. गावात ‘राष्ट्रवादी प्रताप सेना’ नामक एक संघटना आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काहीही संबंध नसल्याचे या संघटनेचे पदाधिकारी नेहमीच सांगत असतात. या राष्ट्रवादी प्रताप सेनेचा समज असा की, आपला वचक असल्यामुळेच गावात गोवंश हत्याबंदी लागू आहे. अडीच हजार लोकवस्तीच्या या गावात मुस्लिमांची संख्या अवघी ३५ ते ४०. त्यामुळे वचक हिंदूंचा असू शकतो, हे खरेही आहे. दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर ‘मुसलमान होते हुए भी मानवतावादी’ अशी शब्दमौक्तिके गेल्याच १६ सप्टेंबर रोजी उधळणारे आपल्या देशाचे -केंद्रीय सांस्कृतिक खात्याचे- राज्यमंत्री महेश शर्मा हे दादरी ज्या मतदारसंघात येते त्या गौतम बुद्ध नगर (नोएडा) मतदारसंघाचे प्रतिनिधी. या शर्मा यांना दादरीच्या घटनेसाठी जबाबदार धरा, अशी स्पष्ट मागणी दिल्लीच्या- स्वत:स ‘जनहस्तक्षेप’ म्हणविणाऱ्या गटाने केली होती, ती ‘पुरस्कारवापसी’वाल्या साहित्यिकांवर खुद्द शर्मा यांनी केलेल्या असंस्कृत टीकेसारखीच आता विरून गेली आहे. तरीही ९० दिवसांची कायदेशीर सवलत घेतल्यावर पोलिसांनी १५ जणांवर जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यास जोडलेल्या अहवालामुळे दादरी प्रकरण विसरून गेलेल्यांना त्याची आठवण व्हावी. पोलिसांनी जोडलेला हा अहवाल सांगतो की, इखलाकच्या घरात जे मांस सापडले ते गोमांस नसून अजावर्गीय प्राण्याचे मांस -म्हणजे बकऱ्याचे मटण- होते. गोवंश हत्याबंदी मोडली गेलीच नसताना तशी जाहीर घोषणा मंदिरातून होते आणि त्यानंतर एक मानवबळीही घेतला जातो, हे भयावह वास्तव यातून पुढे येते. वकिली धूर्तपणाने कदाचित हाच मुद्दा, या १५ जणांकडे हत्येसाठी काही हेतूच नव्हता तर त्यांनी हे कृत्य केले असेलच कसे, आदी पद्धतीने फिरवला गेल्यास नवल नाही. मथुरेच्या मोठय़ा गुन्हेवैद्यक प्रयोगशाळेने अद्याप अहवालच दिला नाही, अशी बतावणी दादरी येथील पोलीस करू शकतात; परंतु या प्रयोगशाळेकडे पोलिसांनी दोन महिने अहवाल मागितलेलाच नाही, असेही उघड होते आहे. खोटेपणा करा, माणसे मारा, असे अर्थातच कुठलाही धर्म सांगत नसणार, मात्र दादरीच्या घटनेतून खोटेपणाचीच लक्तरे टांगली जात असताना ‘कसली वंशहत्याबंदी’ याचा विचार करणे आवश्यक आहे.