वेचक हत्यांचा मथितार्थ

१९९० मध्ये काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांना कंटाळून प्रामुख्याने काश्मिरी पंडितांनी तेथून बस्तान हलवले.

जम्मू-काश्मीरमध्ये विशेषत: काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांत एक ज्येष्ठ व प्रतिष्ठित काश्मिरी पंडित औषध व्यापारी; तसेच जम्मू हिंदू व शीख समाजातील दोन शिक्षकांच्या हत्येमुळे देशभर हळहळ वाटणे अतिशय स्वाभाविक आहे. मात्र या हत्या नागरिकांना वेचून होत असल्या, तरी त्याद्वारे दहशतवाद्यांनी निव्वळ हिंदू व शीख स्थलांतरितांनाच लक्ष्य केले असा समज करून घेणे या नवीन केंद्रशासित प्रदेशातील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आणि धोकादायक बनवते. कारण असा निष्कर्ष विद्यमान केंद्र सरकार आणि काही समविचारी मंडळींना ‘सोयी’चा वाटत असला, तरी तो तथ्याधारित नसेल. यासाठी अधिकृत आकडेवारीचा विचार करावा लागेल. ती काय सांगते? सन २०१९ पासून सर्वसामान्य नागरिकांची हत्या करण्याचे नवीन डावपेच काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेले दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानस्थित सूत्रधार यांनी अवलंबिलेले दिसते. त्या वर्षी ३८, गेल्या वर्षी ३७ आणि या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत २८ जणांचा बळी गेला आहे. यांतील बहुतेक काश्मिरी मुस्लीम आहेत. त्यांतील काही लष्करात व पोलिसांत होते. ते गावी परतल्यानंतर त्यांना नि:शस्त्र गाठून संपवण्यात आले. काहींना सुरक्षादलांचे खबरे ठरवून ठार मारले गेले. अशाच पद्धतीने बिहार आणि इतर भागांतून काश्मिरात आलेले मजूर, वाहनचालक अशांनाही संपवले गेले. त्या हत्यांना मात्र ‘भूमिपुत्र वि. बाहेरचे’ असा रंग देण्याचा प्रयत्न झाला.

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवले गेले. घटनेच्या अनुच्छेद ३७०चे निराकरण केले गेले, त्याबरोबरच अनुच्छेद ३५ अ अंतर्गत विशेषाधिकारही संपुष्टात आले. त्यानंतर त्यांविषयी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात अपप्रचार सुरू झाला. भारत सरकारवर हेत्वारोप झाले. काश्मीर खोऱ्यातील नागरिक आणि राजकीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे बदल अत्यंत संवेदनशीलरीत्या हाताळणे आवश्यक होते. तसे होऊ शकले नाही हे वास्तव आहे. स्थानिक राजकीय नेत्यांना खटल्याविना बेमुदत नजरकैदेत ठेवणे, संपर्कबंदी व संचारबंदीसारख्या उपायांनी नव्या रचनेविषयी स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकलेला नाही. सध्याच्या हत्यासत्रांचे विश्लेषण करताना या वास्तवाकडेही चिकित्सक दृष्टिकोनातून पाहावे लागेल.

१९९० मध्ये काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांना कंटाळून प्रामुख्याने काश्मिरी पंडितांनी तेथून बस्तान हलवले. या सगळ्यांनी पुन्हा काश्मीरमध्ये स्थायिक व्हावे, असे या सरकारचे धोरण आहे. त्या वेळी मुस्लिमबहुलवादाचा गैरवापर दहशतवादी संघटनांनी पुरेपूर केला होता. त्यामुळेच वेचून-वेचून हिंदू पंडितांचे शिरकाण झाले. त्यांतील कित्येक सधन, त्यामुळे त्यांच्या मत्ता-मिळकती तशाच टाकून या हिंदूंनी पलायन केले त्या वेळी मानवी आणि सामाजिक दायित्वाच्या भावनेतूनही त्यांचे पुनर्वसन करण्याची इच्छाशक्ती, आज केंद्र सरकारवर ‘कश्मिरियत के दुश्मन’ म्हणून आगपाखड करणाऱ्या पक्षांच्या एकाही नेत्याने दाखवली नाही हेही वास्तव! परंतु आज पुन्हा एकदा अजूनही बऱ्यापैकी अल्पसंख्य असलेले काश्मिरी पंडित आणि शीख सरकारी कर्मचारी दहशतवादी हल्ल्यांच्या भयाने काश्मीर सोडू लागले आहेत. त्यांना आश्वासकरीत्या थांबवण्याऐवजी मेहबूबा मुफ्तींसारखे स्थानीय म्हणवणारे नेते केंद्र सरकारलाच दूषणे देत आहेत. वास्तविक वर्षानुवर्षे काश्मीर खोऱ्यात वसलेले पंडित आणि शीखही मेहबूबांइतकेच ‘कश्मिरी’ आहेत. ताज्या हल्ल्यांमुळे त्यांचा सरकारवर आणि सुरक्षा दलांवर विश्वास राहिलेला नाही आणि मेहबूबांसारख्या काश्मिरी नेत्यांनी तो निर्माण करण्याचा प्रयत्नही केलेला नाही.

वेचक हल्ल्यांद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रयत्नपूर्वक आणि निर्धारपूर्वक हाणून पाडावा लागेल. अर्थचक्र आणि राजकीय प्रक्रिया नसते, तेथे अनागोंदी आणि बजबजपुरी वाढते. बाह्यशक्ती आणि लोकशाहीविरोधकांसाठी यापेक्षा उत्तम संधी असू शकत नाही. गतवर्षीच्या करोना टाळेबंदीतून सावरण्याची संधी काश्मीरला यंदा मिळणार आहे. पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक या नंदनवनाकडे येणे काश्मिरींच्या रोजगारासाठी आणि स्थैर्यासाठी अत्यावश्यक आहे. दहशतवादाविरोधात स्थानिक जनता रेटून उभी राहिल्यामुळेच मध्यंतरीच्या काळात येथील पर्यटन पूर्वपदावर आले होते. तिला पुन्हा एकदा आश्वासक साद घालण्याची गरज आहे. स्थानिक नेत्यांनी ‘कश्मिरियत’ची हाक दिली की ते हिंदू वा हिंदुस्थानविरोधी होत नाहीत हे दिल्लीतील राज्यकर्ते केव्हा समजून घेणार? मतदारसंघ फेररचनेच्या आधी विधानसभा निवडणूक घ्यावी ही बहुतांश काश्मिरी नेत्यांची मागणी या दृष्टीनेच समजून घेतली पाहिजे. काश्मिरी नेत्यांनी मुस्लिमांच्या हत्याही थांबवल्या नाहीत हे तेथील जनतेपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातूनही सांगता येईलच की! हे समजून घेण्यासाठी हिंदू-मुस्लीम-शीख अशा मर्यादित आणि संकुचित विचारधारेतून प्रथम बाहेर पडावे लागले.      

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jammu and kashmir a senior and reputed kashmiri pandit drug dealer in days akp

ताज्या बातम्या