‘दोस्ती’ टिकाऊ किती?

मोदी लाटेत तेव्हा हरयाणामध्ये भाजपला सत्ता मिळाली आणि विजयवर्गीय यांचे महत्त्व वाढत गेले.

कर्नाटक, उत्तराखंड, आसाम या राज्यांमध्ये अलीकडेच भाजपने नेतृत्वबदल के ल्याने अन्य भाजपशासित राज्यांमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असाव्यात. मध्य प्रदेशमधील नेत्यांचा त्याला अपवाद कसा असणार? मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांना साथ देणाऱ्या २२ काँग्रेस आमदारांच्या बंडामुळेच भाजपला पुन्हा सत्ता मिळाली. शिवराजसिंह चौहान ऊर्फ  मामाजी यांच्याकडेच पुन्हा सूत्रे सोपविण्यात आली. काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्याचे खच्चीकरण केले जायचे, तर भाजपमध्येही लोकप्रिय वा चांगली ताकद असलेल्या नेत्याचे पंख  पद्धतशीणपणे छाटले जातात. त्यामुळेच बहुधा चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यास ‘दिल्ली’ अनुकू ल नव्हती. पण काठावरचे बहुमत असताना अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा शिवराजसिंह परवडले, असा तेव्हा पक्षात विचार झाला. कै लास विजयवर्गीय हे मध्य प्रदेश भाजपमधील अतिमहत्त्वाकांक्षी नेते. मुख्यमंत्रीपदावर त्यांचा अनेक वर्षे डोळा. २०१४ मध्ये अमित शहा यांच्याकडे भाजपची सूत्रे येताच त्यांनी चौहान मंत्रिमंडळात अनेक वर्षे काम केलेल्या विजयवर्गीय यांना हरयाणा राज्याचे प्रभारी नेमले. मोदी लाटेत तेव्हा हरयाणामध्ये भाजपला सत्ता मिळाली आणि विजयवर्गीय यांचे महत्त्व वाढत गेले. मग विजयवर्गीय यांच्याकडे पश्चिम बंगालची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १८ जागा जिंकू न भाजपने चमत्कारच केला. आता पश्चिम बंगालचीही सत्ता मिळणार आणि विजयाचे शिल्पकार विजयवर्गीय यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची बक्षिसी मिळणार, असे चित्र त्यांच्या निकटवर्तीयांनी तयार के ले होते. तसे काहीच झाले नाही, आणि विजयवर्गीय यांचे विमान जमिनीवर आले. तरीही येडियुरप्पा, उत्तराखंडातील दोन रावत किं वा सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविल्याने शिवराजसिंह यांचा क्रमांक लागू शकतो, असे गणित विजयवर्गीय यांचे असावे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना राजधानी भोपाळमध्ये दाखल होताच विजयवर्गीय यांनी शिवराजसिंह यांच्या विरोधातील मंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली तसेच राज्यपालांना भेटले. राजकीय घडामोडी घडत असल्याचे चित्र विजयवर्गीय यांच्या गोटातून तयार करण्यात आले. विजयवर्गीय यांनी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय आमदारांसाठी ‘भुट्टा पार्टी’चे (मक्याचे कणीस) आयोजन करून, तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचा हात हातात घेतला आणि उभयतांनी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणे माईकवर गाण्यास सुरुवात केल्याचे दिसले,  त्यानंतर तर ‘सूत्रां’नी नेतृत्वबदलाच्या कहाण्यांचा रतीबच लावला! परंतु आठवडाभरातच विजयवर्गीय यांचा सूर बदलला. ‘चौहान यांच्या नेतृत्वाखालीच सरकार काम करेल’ अशी ग्वाही त्यांनी दिली. पक्षामधील प्रतिस्पर्धी नेत्यांना एकत्र आणून समेट घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न विविध राज्यांमध्ये झाले, पण ते यशस्वी झालेले नाहीत. अनेक राज्यांत मूळचे परपक्षीय आणि अलीकडेच भाजपमध्ये शिरलेल्या नेत्यांना संधी मिळाली, तर भाजपचे निष्ठावंत म्हणवणारे आपापली भांडणे जपतच अस्तित्व सिद्ध करीत राहिले, याला महाराष्ट्रही अपवाद नाही. शेवटी नेतृत्वाचा कौल कोणाकडे आहे यावर सारे अवलंबून असते. यामुळेच शिवराज आणि विजयवर्गीय यांनी कितीही वेळा ‘ये दोस्ती’ गाणे सुरात सूर मिसळून म्हटले तरी दिल्लीच्या मनात काय आहे, यावरच या दोस्तीचे भवितव्य ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karnataka uttarakhand assam states bjp led akp

Next Story
खलिस्तानचे भूत
ताज्या बातम्या