प्रथम निव्वळ लसीकरण न झालेल्यांना घरांमध्ये डांबून ठेवण्याचा निर्णय फळत नाही असे लक्षात आल्यानंतर ऑस्ट्रियाने करोना नियंत्रणासाठी सोमवारी सरसकट टाळेबंदी जाहीर केली. ‘भीषण नाताळाची तयारी ठेवावी’ असा इशारा जर्मनीमध्ये सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातली मंडळी देऊ लागली आहेत. तेथील मावळत्या चॅन्सेलर अँगेला मर्के ल यांनी कठोर निर्बंध पुन्हा लागू करण्याची गरज विशद के ली आहे. नेदरलॅण्ड्समध्ये दोन दिवस करोना टाळेबंदीच्या विरोधात तीव्र निदर्शने झाली. ब्रिटनमध्ये बाधितांचा आकडा पुन्हा प्रतिदिन ३० हजारांच्या वर जाऊ लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने गत सप्ताहात सादर के लेल्या आकडेवारीनुसार, करोनाबाधितांची संख्या जगभर कमी होत असताना, युरोपातच ती वाढू लागली आहे! करोना आता महासाथ (पॅण्डेमिक) राहिलेला नसून अंतर्जन्य (एन्डेमिक) आजार बनू लागल्याची गृहीतके  मांडली जाऊ लागली आहेत. पण सार्वत्रिक रुग्णघट सातत्याने दिसत नाही तोवर असा काही निष्कर्ष काढणे धाडसाचेच. आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, सध्या जगातील करोनाबाधितांपैकी दोन तृतीयांश युरोपात आढळून येत आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर पुढील वर्षी फे ब्रुवारीपर्यंत पाच लाख बळी नोंदवले जाऊ शकतात, असा आरोग्य संघटनेचा अंदाज. काही महिन्यांपूर्वी पूर्व युरोपातील देशांमध्ये करोना रुग्ण वाढीस लागले होते. आज ते लोण पश्चिम युरोपकडे पसरलेले आहे. यांतील बहुतेक देश सार्वजनिक आरोग्यविषयक सुविधा आणि जाणिवा सक्षम असणाऱ्यांपैकी आहेत. तरीही परिस्थिती बिकट होत चालली आहे. सुरुवातीच्या मोजक्या करोनाप्रतिबंधक लशी विकसित करणाऱ्यांमध्ये युरोपातील संस्था व विद्यापीठे आघाडीवर होती. तेथे लसीकरणाचा सुरुवातीचा जोर आणि टक्केवारीही समाधानकारक होती. मग अशी परिस्थिती ओढवण्याचे कारण काय? लसीकरण अनास्था किं वा वॅक्सिन हेजिटन्सी हे प्रमुख कारण. अमेरिके तील उजव्या व प्रतिगामी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या काही राज्यांमध्येही ते दिसून आलेच. समशीतोष्ण आणि शीत कटिबंधांमध्ये हिवाळा सुरू झाल्यानंतर ज्वर किंवा फ्लूचा प्रादुर्भाव होतो. थंड हवा हे रुग्णवाढीचे आणखी एक कारण असू शकते. कारण थंडीपासून बचावासाठी बहुतेक व्यवहार चार भिंतींच्या आत करण्याकडे कल असतो. कारणे आणखीही आहेत आणि प्रत्येक देशात ती वेगवेगळी असू शकतात. पण यातून विशेषत: भारताने बोध घ्यावा तो हा, की निव्वळ लसीकरण म्हणजे करोनानिराकरण असे काही असत नाही. लसीकरणाचे प्रमाण पश्चिम युरोपात जागतिक सरासरीच्या तुलनेत चांगलेच आहे. परंतु करोना आटोक्यात येण्याची ती सरसकट हमी ठरत नाही. युरोपमधील आकडेवाढ ही इतरांसाठीही चिंताजनक ठरू शकते. शिथिलीकरणानंतर सीमा खुल्या होत आहेत. अशा वेळी दक्षता बाळगणे अत्यावश्यक ठरेल. आपल्याकडे गतवर्षी दक्षता बाळगली गेली, पण ती पुरेशी नव्हती. त्यामुळे दुबईतून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून येथे करोना अवतरला. दुसऱ्या लाटेच्या वेळी डेल्टा उत्परिवर्तनाचे वर्गीकरण करण्यात आपण विलंब के ला. प्रत्येक लाटेच्या वेळी आपण प्रतिसादात्मक व प्रतिक्रियात्मक उपाययोजना राबवल्या. पुन्हा असा विलंब आणि ढिसाळपणा परवडणारा नाही. लसीकरण झाले की आपण बाधित होणार नाही. म्हणून मुखपट्टीलाच तिलांजली देणारे महाभाग आपल्याकडे हजारांनी दिसू लागले आहेत! युरोपचे उदाहरण दाखवून त्यांचे प्रबोधन  करण्याची हीच योग्य वेळ आहे. लसीकरणोत्तर करोनाबाधा (ब्रेकथ्रू इन्फे क्शन) ही शक्यता गृहीत धरून, सध्या तरी ती प्रतिबंधात्मक उपायांनीच टाळता येऊ शकते हे लक्षात ठेवलेले बरे!