नीरज चोप्रा या भारताच्या निष्णात भालाफेकपटूला राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धा २०१८ आणि टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावून देण्यात मोलाचे योगदान दिलेले जर्मन प्रशिक्षक उवे हॉन यांची ‘सुमार कामगिरीबद्दल’ हकालपट्टी करण्याचा राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय बुचकळ्यात टाकणाराच ठरतो. उवे हॉन हे भारताच्या भालाफेक चमूचे प्रशिक्षक होते. पण या चमूतील इतर दोन खेळाडू – शिवपाल सिंग आणि अन्नू राणी – यांची कामगिरी सुमार होती. त्यामुळे हॉन यांची गच्छंती झाली असल्याचे अ‍ॅथलेटिक्स संघटना म्हणते. हॉन यांचे साहाय्यक आणि शारीरयांत्रिकी (बायोमेकॅनिक्स) मार्गदर्शक डॉ. क्लाउस बार्तोनित्झ यांना मात्र कायम ठेवण्यात आले आहे. हॉन हे कुणी साधी असामी नाहीत. १०० मीटर्सच्या पलीकडे भाला फेकणारे ते आजवरचे एकमेवाद्वितीय. टोक्योमध्ये अंतिम फेरीत पहिल्या दोन फेऱ्यांतच नीरजचे सुवर्णपदक जवळपास निश्चित झाले होते, यामागे हॉन यांचे अथक मार्गदर्शनही आहेच. त्यांच्याशी असे काय मतभेद व्हावेत, ज्यामुळे त्यांना काढून टाकावे लागले? भारतीय चमूतील तिघांपैकी एकाने देदीप्यमान कामगिरी केली असेल, तर उर्वरितांच्या सुमार कामगिरीबद्दल प्रशिक्षकाला जबाबदार ठरवून थेट काढून टाकणे कोणत्या तर्कात बसते? हॉन यांचा करार ऑलिम्पिक संपेपर्यंत होता. तरीही त्यांची ‘गच्छंती’ केल्याचे संघटनेमार्फत जाहीर केले जाते, यामागे एक कारण दोहोंमध्ये झालेले मतभेद हे असू शकते. हॉन यांची मानधनाबाबत नाराजी होती आणि अपेक्षित मानधन कबूल करूनही दिले गेले नाही ही तक्रार. त्याहीपुढे जाऊन त्यांनी येथील व्यवस्थेबद्दल काही टिप्पणी केली. त्यात नवीन काही नाही. करारबद्ध होण्यापूर्वी ही वस्तुस्थिती ठाऊक नव्हती का, असा प्रश्न त्यांच्या भूमिकेबाबत विचारला जाऊ शकतो. मुद्दा हॉन किंवा एखाद्या परदेशी प्रशिक्षकापुरता सीमित नाही. गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाच्या खेळाडूंशी आणि त्यांच्या प्रशिक्षकांशी संबंधित असे वाद निर्माण होऊ लागले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेतील (भारताच्या) तथाकथित ऐतिहासिक कामगिरीच्या जयघोषात खेळाडू-संघटना-प्रशिक्षक त्रिकोणातील वाढत्या विसंवादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विनेश फोगट, मनिका बात्रा यांना संघटनेकडून मिळालेल्या प्रशिक्षकांपेक्षा वैयक्तिक प्रशिक्षक अधिक महत्त्वाचे वाटतात. नेमबाजी चमूचे प्रशिक्षक म्हणून नेमलेले जसपाल राणा यांच्यावर नेमबाजी संघटनेचाच विश्वास नाही. सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांना पदक मिळू शकले नाही, याचे खापर आता राणा यांच्या माथी फोडले जात आहे. महिला हॉकी संघाचे मावळते प्रशिक्षक स्योर्ड मरीन यांना त्यांच्या मूळ नियुक्तीबाबत आक्षेप होता. हा संघ पदकाच्या समीप पोहोचूनही त्या पदावर राहण्यात मरीन यांना रस नव्हता हे उल्लेखनीय. इनमिन सात पदके मिळाल्यानंतर बहुतेक क्रीडा संघटनांच्या चालकांना कंठ फुटला आहे. श्रेयवादाबरोबरच, दर्जा सुधारण्यावर भर देण्याचा साक्षात्कार बहुतांना आताच होऊ लागला आहे! १,१,१,३,६,२,७ ही आपली गेल्या सात ऑलिम्पिक स्पर्धांतील पदके आहेत. याला यश म्हटले जात असेल आणि त्याचे श्रेय संघटनांचे असेल, तर अपश्रेयही त्यांना स्वीकारावे लागेल. त्याबद्दल केवळ प्रशिक्षकांना जबाबदार धरता येणार नाही.