लसविषमतेचा विषाणू..

ओमिक्रॉनच्या संरचनेने वैज्ञानिक सावध झाले आहेत, कारण आजवर आढळून आलेल्या सर्व प्रकारांपेक्षा याचे स्वरूप अधिक व्यामिश्र आहे.

युरोप वगळता उर्वरित जगतात करोनाचा प्रभाव ओसरू लागल्याची स्पष्ट लक्षणे दिसत असतानाच, दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवीन अवतार ‘प्रकटल्या’ने पुन्हा एकदा भयगोंधळ उठणे स्वाभाविक आहे. कोणत्याही विषाणूची नवीन उत्परिवर्तने (म्युटेशन्स) निर्माण होणे ही सूक्ष्मजीवशास्त्राच्या दृष्टीने सहजप्रक्रिया असते. परंतु या विषाणूच्या बाबतीत बहुतेक उत्परिवर्तित प्रकार हे जगभरात धडकी भरवणारे ठरले याचे प्रमुख कारण म्हणजे, अजूनही प्रचंड संशोधनाअंती या विषाणूविषयी निश्चित ठोकताळे मांडता येणे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि वैद्यक समुदायाला साधलेले नाही. चीनमधील वुहान शहरात उद्भवलेला मूळ करोना विषाणू त्याची जनुकीय कुंडली आणि लक्षणे उमजेपर्यंत जगभर पसरला आणि विध्वंसक ठरला. यानंतर त्याच्यात उत्परिवर्तने होत गेली. यांतून निर्माण झालेले ‘अल्फा’ (ब्रिटन), ‘बीटा’ (दक्षिण आफ्रिका), ‘गॅमा’ (ब्राझील) आणि ‘डेल्टा’ (भारत) हे नवप्रकार किंवा व्हेरियंट आपल्यासाठी सुपरिचित. विशेषत: ‘डेल्टा’! येथे सहज लक्षात येण्यासारखी एक बाब म्हणजे, हे करोनाप्रकार निराळ्या खंडात जन्माला आले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी सुरुवातीला विध्वंस घडवून आणला याचे प्रमुख कारण म्हणजे, लशींचे सुरक्षाकवच या सर्व भागांमध्ये त्या वेळी पुरेसे नव्हते.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला ‘ओमिक्रॉन’ हा नवीन प्रकार आधीच्या सर्वच प्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकेल, असे मानले जात आहे. दर २४ तासांमध्ये नवनवीन देशांत त्याचे अस्तित्व आढळून येत आहे. ओमिक्रॉनच्या संरचनेने वैज्ञानिक सावध झाले आहेत, कारण आजवर आढळून आलेल्या सर्व प्रकारांपेक्षा याचे स्वरूप अधिक व्यामिश्र आहे. यात जवळपास ५० उत्परिवर्तने आढळून आली. त्यापैकी १० तर या विषाणूच्या काटेरी प्रथिनात आढळून आली. हे अभूतपूर्व आहे. याच काटेरी प्रथिनाच्या साह्य़ाने हा विषाणू मानवी पेशींना चिकटतो किंवा मानवी शरीरात प्रवेशतो. याचा दुसरा अर्थ, इतक्या प्रमाणात ‘चेहरामोहरा’ बदललेल्या या विषाणूला चटकन हुडकणे मूळ आणि लसीकृत रोगप्रतिकारक यंत्रणेला शक्य होत नाही हे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या आफ्रिकेतर बाधितांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या. इस्रायलमधील एका बाधित व्यक्तीने तर करोनाप्रतिबंधक वर्धकमात्राही घेतलेली होती!

लशींचे कवच असलेल्यांची ही स्थिती तर लस न घेतलेल्यांचे काय होणार? ओमिक्रॉन आफ्रिकेत जन्माला आला हा योगायोग खचितच नाही. या खंडात पूर्ण लसमात्रा घेतलेल्यांचे सरासरी प्रमाण आहे अवघे ६ टक्के! दक्षिण आफ्रिका त्यांतल्या त्यात पुढारलेला असल्यामुळे हे प्रमाण आहे जरा अधिक पण २४ टक्केच. विषाणूप्रसार जितका अधिक, तितकी त्याची उत्परिवर्तने होऊन नवीन प्रकार निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक. आफ्रिका हा एकमेव खंड असा आहे, जेथे लसीकरणाचे प्रमाण सर्वात कमी. त्यामुळे विषाणूफैलाव अव्याहतपणे होत राहिला आणि उत्परिवर्तनाची शक्यताही वाढीव राहिली. नायजेरिया, केनिया, इजिप्त, टांझानिया अशा इतर तुलनेने सुस्थिर देशांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांचे प्रमाण १० टक्केही नाही. इतर अधिक मागास व अस्थिर देशांची स्थिती याहीपेक्षा भीषण. प्रामुख्याने आफ्रिकेतील व उर्वरित जगतातील मिळून जवळपास ३०० कोटी स्त्रीपुरुष आजही पहिल्या लसमात्रेपासून वंचित आहेत.  या लसविषमतेला युरोपातील काही आणि अमेरिका असे पुढारलेले देशच जबाबदार आहेत. उपलब्ध असूनही निव्वळ लस अनास्थेमुळे ती न घेणाऱ्यांचे प्रमाण या देशांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे घडले असे की, या अनेक देशांमध्ये बाधितांचे प्रमाण बऱ्यापैकी मोठय़ा प्रमाणावर लसीकरणानंतरही अधिक राहिले. ते अधिक राहिल्यामुळे अधिकाधिक लशींचा साठा करून ठेवण्याकडे यांचा कल. या लशी मग आफ्रिका किंवा इतर लाभार्थी प्रदेशांकडे वळवण्याचा प्रश्नच उरत नाही. ज्या अमेरिकेत वर्धक मात्रेला सरकारी मान्यता मिळाली आहे, त्या देशात लस न घेता उद्दामपणे वावरणाऱ्यांचे प्रमाणही प्रचंड. त्यांच्याकडून इतरेजन बाधित झालेच, तर त्यांच्या संरक्षणासाठी वर्धक मात्रा तयार आहेत. या सर्वाना चिंता दुसऱ्या वा तिसऱ्या मात्रेची. या खेचाखेचीत एकही मात्रा न मिळालेल्या व स्वत: लसनिर्मितीची क्षमताही नसलेला आफ्रिका खंड वाऱ्यावर सोडण्यात आला. वर्धक मात्रा हा प्रकारच प्राप्त परिस्थितीत अनैतिक असल्याची भारताची आजवरची भूमिका राहिली व ती योग्यच आहे. पण आपल्याकडील ढिसाळ नियोजनामुळे मध्यंतरी डेल्टा प्रकार उग्र बनला आणि त्या काळात लसनिर्यात (जी प्रामुख्याने आफ्रिकेला होते) थोपवून धरली गेली. तेव्हा आफ्रिकेला लसवंचित ठेवण्याच्या पापात आपलाही थोडा वाटा आहेच. विषाणूमधील उत्परिवर्तने निसर्गनियमानुसारच होत असतात आणि करोना विषाणू या नियमास अपवाद नाही. पण याविषयी पूर्ण ज्ञात असूनही लशींचे वितरण जगभर करण्यामध्ये प्रगत जगत अपयशी ठरले आणि त्याचा फटका आज पुन्हा एकदा आफ्रिकेला व पर्यायाने जगाला बसण्याची चिन्हे आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New covid variant found in south africa coronavirus mutations omicron variant zws