पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल असे म्हटले जाते. ते भविष्यात कदाचित होईलही. परंतु सध्या रोजच माहितीसाठीचे महायुद्ध सुरू आहे. माहितीचे महाजाल हे त्याचे युद्धमैदान आहे. शून्य आणि एक, बिट्स आणि बाइट्स ही तेथील शस्त्रास्त्रे आहेत. छोटे-मोठे माहितीचे हे बाजारबुणगे म्हणता येतील असे अतिरथी-महारथी हे युद्ध खेळत असतात. ते अतिरथी-महारथी असतात कारण त्यांच्या पाठीमागे त्यांच्या राष्ट्राची यंत्रणा असते. या युद्धातील सध्याचे दोन बडे बाहुबली म्हणजे चीन आणि अमेरिका. गेल्या महिन्यात, २५ सप्टेंबरला त्यांच्यात सायबर- शस्त्रसंधी झाला. एकमेकांच्या देशातील माहितीवर डल्ला मारायचा नाही, ती चोरून वाचायची नाही यावर दोन्ही देशांत एकमत झाले. कॉर्पोरेट कंपन्यांना तर या माहितीचोरीचे मोठे भय. आपल्या देशातील कंपन्यांना फायदा व्हावा याकरिता बहुराष्ट्रीय कंपन्यांची गोपनीय माहिती पळविली जाण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. त्याविरोधात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग एकत्र आले. त्यांनी या प्रकारांना आळा घालण्याचा निर्णय घेतला परंतु त्या करारावरची शाई वाळलीही नव्हती, तोवरच चिनी माहितीचाच्यांनी किमान सात अमेरिकी कंपन्यांवर हल्ले चढविल्याच्या बातम्या आल्या. हा सगळा बडय़ा कंपन्यांचा वा आर्थिक हेरगिरीचा वगैरे मामला आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचे कारण माहितीच्या या महायुद्धातून सर्वसामान्य नागरिकही अलिप्त राहू शकत नाही. आपण गप्पाटप्पा मारण्यासाठी वापरत असलेल्या समाजमाध्यमांमध्ये दुसऱ्या देशाच्या सरकारला काय रस असणार, असे आपण समजत असू तर तो गैरसमज आहे. फेसबुकने नुकत्याच प्रसृत केलेल्या माहितीमुळे आपणही या युद्धातील एक बळी असू शकतो हे स्पष्ट झाले आहे. एखाद्या देशाचा पाठिंबा असलेल्या माहितीचाच्यांनी तुमच्या फेसबुक खात्यावर हल्ला चढविला, तर त्या खातेदाराला तातडीने तसे सूचित केले जाईल, असे फेसबुकने जाहीर केले आहे. अलेक्स स्टॅमोस हे फेसबुकचे प्रमुख सुरक्षा अधिकारी. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशी सूचना देणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण इतर माहितीचाच्यांपेक्षा हे राज्यप्रायोजित चाचे अधिक धोकादायक आणि अधिक आधुनिक असतात. स्टॅमोस यांच्या या विधानाचा अर्थ अत्यंत गंभीर आहे. अमेरिकेसारखा देश आपल्या नागरिकांच्या माहितीजालातील हालचालींवर नजर ठेवून असतो याचे भांडे विकिलिक्स, स्नोडेन आदी नेटजागल्यांनी मागेच फोडले आहे.

व्यक्तिस्वातंत्र्याची प्रचंड कदर करणारे राष्ट्र असे करीत असेल, तर अन्य देशांमध्ये काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशा देशांतील सरकारे हीच ऑर्वेल यांच्या नाइन्टीन एटी फोरमधल्या बिग ब्रदरसारखी असतात. हे राज्यप्रायोजित चाचे आपली माहिती जसे चोरू शकतात, तसेच ते त्यांना हवी ती माहिती आपल्या माध्यमातून पसरवूही शकतात. एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशाने किती उत्पात होऊ शकतो हे तर आपणही काही प्रकरणांतून अनुभवले आहे. फेसबुकने ते रोखण्यासाठी काही उपाय योजले आहेत ही म्हणूनच काही अंशी दिलासा देणारी बाब आहे. पण ती पुरेशी आहे का? अंकीय भारताचे स्वप्न पाहात असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ती याची. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील धीमंतांचा देश म्हणून भारताची ओळख निदान या कामी तरी आली पाहिजे.