अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची गेल्या आठवडय़ातील क्युबा आणि अर्जेटिना भेट ऐतिहासिकच होती. मुळात या देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे ही ओबामांची देणगी. त्याआधी शीतयुद्धाच्या काळापासून हे संबंध केवळ तुटलेलेच नव्हेत तर बिघडत गेलेलेही होते. या दक्षिण अमेरिकी देशांमध्ये आता चीन आर्थिक ‘सहकार्या’ची मुसंडी मारू लागला असताना, किमान राजकीयदृष्टय़ा एकमेकांना अस्पृश्य न मानणे गरजेचे होतेच आणि ओबामांनी ती अमेरिकी गरज भागवली. मात्र ओबामा यांच्या भेटीनंतर क्युबावर १९५९ ते २००६ असा प्रदीर्घ काळ राज्य करणारे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी संतापून एक खरमरीत जाहीर पत्र लिहिले आणि ते सध्या माध्यमे व समाजमाध्यमांत सारखेच गाजते आहे. इतकेच नव्हे, तर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यानेही या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. वास्तविक ओबामा यांची ही भेट ‘मैत्री’, ‘शांती’, ‘सौहार्द’ वगैरे शब्द पेरून मधाचे बोट लावल्यासारखी भाषणे करण्यापुरतीच होती. या गोडबोलेपणावर कॅस्ट्रो खवळले आहेतच, पण आमच्या देशाने शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांत केलेली मानवी प्रगती तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल करीत फिडेल यांनी थेट ‘दक्षिण आफ्रिकेला वर्णभेदकाळातच अमेरिकी सहकार्यामुळे अण्वस्त्रे मिळालेली आहेत,’ असा आरोपही या पत्रात केला आहे. ‘क्युबन मिसाइल क्रायसिस’मागे मुळात फिडेल यांनी रशियाला केलेली ‘विनंती’ हे कारण होते, ते पाप अशा आरोपाने धुण्याआधी या पत्रात फिडेल यांनी क्युबातील तमाम क्रांतिकारकांच्या कार्याला सलाम केले आहेत आणि या पत्राचा रोख अखेर, ‘अमेरिकेकडून आम्हाला काही नको’- आम्हाला मदत देण्याच्या फंदात त्या देशाने पडू नये आणि आम्ही स्वयंपूर्ण व स्वाभिमानी आहोत, अशी तंबी अमेरिकेसकट स्वदेशातील उदारमतवाद्यांना देणे, हा आहे. पण हा स्वाभिमानी फुगा ओबामांनी क्युबातून अर्जेटिनात गेल्यावर, तेथील तरुणांशी संवाद साधताना फोडला होताच. क्युबाचे विद्यमान अध्यक्ष (व फिडेल यांचे बंधू) राउल कॅस्ट्रो यांच्या भेटीबद्दल ओबामा म्हणाले, ‘‘मी कॅस्ट्रोंपुढे त्यांच्या देशातील शिक्षणाची, आरोग्य सेवांची स्तुतीच केली.. पण क्युबाच्या रस्तोरस्ती मला दिसले की, त्या देशातील आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाही.. एक वेळ, १९५०च्या दशकात असेलही ती चांगली!’’ क्युबाच्या क्रांतीचा कणा कधीच मोडला आहे, हे कळण्यासाठी ओबामांच्या या वक्तव्यावरच विसंबावे लागेल, असेही नाही. खुद्द फिडेल यांच्यावरच ‘आज पर्यटनासारखा व्यवसायच आमच्या देशात वाढविला जातो आहे,’ अशी खंत याच पत्रात व्यक्त करण्याची वेळ आली आहे. पर्यटनातील गुंतवणुकीपुढे बंधू राउल यांना मान का तुकवावी लागली, याचे आत्मपरीक्षण फिडेल यांनी केले असते, तरीही त्यांना प्रतिक्रांतीच्या पाऊलखुणा पार पुढे गेलेल्या दिसल्या असत्या. जी प्रतिक्रांती १९८९ पासूनच अटळ ठरत गेली, ती थोपवता येणार नसून तिची विखारी नखे कापणे हेच हाती आहे आणि त्यासाठी मार्क्‍स-एंगल्स नव्हेत, तर नोम चॉम्स्कीपासून स्लावोय झिझेकपर्यंतचे नवडावे विचारवंत आपल्या उपयोगी पडणार आहेत, हे आता आजारी फिडेलना कोण सांगणार!