महाराष्ट्राला कृतिशील विचारवंतांचा मोठा वारसा लाभला आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे महत्त्वाचे नाव आज या माळेतून गळाले. सामान्यजनांना आश्वासक विश्वासाची ऊर्जा देणारे धगधगते अग्निकुंड चिरविश्रांती घेत शांत झाले. शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत, ‘कमवा आणि शिका’ या योजनेचे आचरण करत ते एम.ए., एलएल.बी. झाले. शिक्षक-प्राध्यापक- प्राचार्यही झाले. नोकरीतून सुखी जीवनाची हमी असतानाच नोकरी सोडून, नाममात्र जीवन वेतनावर कार्यकर्ता म्हणून समाजकारणात व राजकारणात त्यांनी पदार्पण केले. परिवर्तनाच्या सर्व पातळय़ांवरील घटना, घडामोडींशी गेली सहा दशकांहून अधिक काळ ते जोडले गेले होते. समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ , महाराष्ट्र प्रबोधनाची ज्योत जिवंत ठेवणाऱ्या विज्ञानवादी, साम्यवादी, विवेकवादी चळवळीचे मार्गदर्शक आणि सक्रिय नेते, अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे अनमोल योगदान राहिले. राजकारणात व समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून ‘एन. डी. सरां’चा आदरपूर्वक उल्लेख केला जाई. अविश्रांत वाटचाल आणि एन.डी. हे समानार्थी शब्द होते. लोकांची गर्दी, कार्यक्रमाची आखणी व कृती, प्रचंड स्वरूपाचे अद्ययावत वाचन, अफाट व्यासंग, पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे होणारा प्रवास, सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत गाऱ्हाण्यांपासून संस्थात्मक अडचणीतून मार्ग काढण्याची धडपड , हे सारे वर्षांनुवर्षे नव्हे तर दशकानुदशके सुरू होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून ते मुंबईत राहिले, पण तेथून वास्तव्य कोल्हापूरला हलवल्यानंतरही ही धावपळ सुरूच होती. राज्यघटनेने रुजवलेल्या स्वातंत्र्य, संधीची समानता आणि धर्मनिरपेक्षता, समाजवाद या लोकशाही मूल्यांवर पूर्ण निष्ठा ठेवून तो विचार समाजात रुजवण्यासाठी ते कार्यरत होते.  गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, साराबंदी चळवळ, शेतकरी दिंडी, दुष्काळ निवारण मोर्चा, शेतकरी आंदोलने, शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठीचा लढा, सेझ विरोधी आंदोलन, उच्च न्यायालय खंडपीठ, शिक्षणविषयक श्वेतपत्रिका, एन्रॉन विरोधी आंदोलन, टोलविरोधी आंदोलन, वीजदरवाढ विरोधी आंदोलन, पिण्याच्या पाणीहक्काचे आंदोलन, कापूस दर आंदोलन, शिक्षण बचाओ आंदोलन, जागतिकीकरण विरोधी लढा यासारख्या कैक आंदोलनांतून त्यांनी अनेकदा लाठीमार, तुरुंगवास, गोळीबारही झेलून, जनतेचे बळ वाढविले. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊनही केवळ पक्षापुरते राजकारण न करणाऱ्या एन.डीं. नी विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद, आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. २३ वर्षे आमदार असलेल्या सरांनी सहकारमंत्रीपदही भूषवले. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या दीर्घकालीन हिताचे ठरलेले आहेत. तत्त्वांना कधी मुरड न घालणाऱ्या पाटील यांनी, राजकीय निष्ठांपुढे नातेसंबंधही महत्त्वाचे मानले नाहीत. समाजाशी नाते जोडणाऱ्या पाटील यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.