विजयादशमीच्या सणाला भाजपमध्ये दोन अर्थानी महत्त्व आहे. पहिले म्हणजे, भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ९१ वर्षांपूर्वी याच दिवशी झाली होती. संघानेच राजकीय पक्ष म्हणून जनसंघाला जन्म देऊन पहिले सीमोल्लंघन केले. त्यानंतर भाजपची स्थापना हे जनसंघाचे, म्हणजे मातृसंस्था असलेल्या संघाचे पहिले राजकीय सीमोल्लंघन ठरले. आता हाच भाजप देशात सत्तेवर असल्याने, सीमोल्लंघनाचे असंख्य प्रसंग या पक्षाच्या इतिहासात दिवसागणिक घडत असले, तरी दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या मुहूर्तावर होणाऱ्या सीमोल्लंघनाचे महत्त्व काडीमात्रही कमी झालेले नाही. यामुळेच दसऱ्याच्या आसपास महाराष्ट्र भाजपमध्ये सीमोल्लंघनाची होड लागली असावी. गेल्या आठ-दहा दिवसांत भाजपने ज्या ज्या सीमा ओलांडल्या, ते पाहून संघ परंपरेतील आणि जनसंघातून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या कपाळावर पडलेल्या आठय़ा अजूनही मावळलेल्या नाहीत. सत्ताकारण हेच राजकीय पक्षाचे ध्येय असल्याने, संघाने भाजपकडून संघीय साधनशुचितेचा आग्रह धरू नये, असा थेट इशारा देणारे नेते पक्षात होऊन गेले असले, तरीही संघाचे मातृत्व पक्षाने कधीच नाकारलेले नसल्याने संघीयांना या पक्षाबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेला आता नराश्याचे धुमारे फुटू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.  गेल्या काही दिवसांतील पक्षांतर्गत राजकीय घडामोडींमुळे ही अस्वस्थता थेट पक्षाच्या प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचली असली, तरी सत्ताकारणापुढे शहाणपण नाही या जाणिवेने जुने कार्यकत्रे मिठाची गुळणी घेऊन बसल्याचे दिसते. काही महिन्यांपूर्वी भाजपने प्रवीण दरेकर या मनसेच्या वादग्रस्त माजी आमदारास पक्षात पावन करून घेऊन मानाचे स्थान दिले, तेव्हाही या नाराजीला उघड तोंड फुटलेच होते. त्यानंतर राष्ट्रवादीतील प्रसाद लाड यांना पक्षात दाखल करून घेतले गेले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय नेत्यांनी त्यांचे महत्त्वही अधोरेखित करणारा संदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिला आणि अलीकडेच त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्तीही झाली. या बेरजेच्या राजकारणातून पक्षाची भावी वाटचाल स्पष्ट होत असल्याच्या जाणिवेने अस्वस्थतेचा कळस गाठलेला असतानाच संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेच्या पुणे शहरचे अध्यक्ष योगेश थोरात यांचे सहर्ष स्वागत करतानाचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकू लागले आहे. समाजमाध्यमांवर वावरणाऱ्या व भाजपचे कट्टर समर्थक असलेल्या अनेक निष्ठावंतांच्या यावरील प्रतिक्रिया कडवट आहेत.  काहींनी तर थोरात यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपचेच नामांतर करून ब्रिगेडी जनता पक्ष (बीजेपी) असा शालजोडीतील घरचा आहेर पक्षाला दिल्याने, भाजपमधील आयारामायण हा लवकरच पक्षांतर्गत नाराजीचा मुद्दा ठरणार असे दिसू लागले आहे. अर्थात, भाजपमध्ये कुणाला घ्यायचे, कुणाला मानाचे पान द्यायचे हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे, असा कचकडी दावा करणे पक्षश्रेष्ठींना सहज शक्य आहे; पण राजकीय पक्ष ही कोणा नेत्यांची खासगी मालमत्ता नसते. उद्या याच आयारामांच्या प्रतिमा मिरवत पक्षाला मतांसाठी जनतेसमोरच जावे लागणार असल्याने, असा दावा किती फोलपट ठरू शकतो, याची जाणीव राज्यातील जाणत्या नेत्यांना नसेल, असे म्हणता येणारच नाही. लाड, दरेकर, थोरातादी थोरांना पक्षात घेऊन पक्षाने स्वत:ला पावन करून घेतले आहे, असा श्रेष्ठींचा समज असेल, तर सामान्य कार्यकर्त्यांला ते पटवून देऊन त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.